कोरोना: राज्यात आणखी कडक लॉकडाऊन लागणार, लवकरच नियमावली जाहीर होईल - राजेश टोपे

राज्यात असलेला लॉकडाऊन आणखी कडक केला जाणार अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. सध्या राज्यात जागोजागी नियमांचं उल्लंघन होताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं शेख यांनी सांगितलं. या संबंधातली नियमावली लवकरच राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात येईल.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील अस्लम शेख यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. राज्यात कडक लॉकडाऊन लावून राज्यातील नागरिकांचे लसीकरण व्हावे अशी मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली.

लॉकडाऊनबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील असंही त्यांनी सांगितलं. केंद्राकडे आम्ही जास्त ऑक्सिजनची मागणी केली आहे, असं ते पुढे म्हणाले.

दहावीच्या परीक्षा रद्द

दहावीच्या परीक्षा रद्द होणार असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही मागणी केली होती त्यानुसार दहावीच्या परीक्षा रद्द व्हाव्यात असं ठरलं असल्याचं राजेश टोपे म्हणाले. बारावीच्या परीक्षा मात्र होणार आहेत, असंही ते म्हणाले.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहून हा निर्णय घेण्यात आल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांचं अंतर्गत मूल्यांकन करून त्यांनी पुढील वर्गात बढती देण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

किराणा मालाची दुकानं सकाळी 7 ते 11 पर्यंतच

राज्यामध्ये 14 एप्रिलच्या रात्रीपासून लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. एप्रिल महिना संपेपर्यंत हा लॉकडाऊन असेल. या कालावधीसाठीच्या नियमांमध्ये आज सकाळीच काही बदल करण्यात आले.

किराणा मालाची दुकानं, भाज्यांची दुकानं, फळविक्रीकेंद्र, डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी यांच्यासह सर्वप्रकारची अन्नधान्य विक्री केंद्र (यामध्ये चिकन, मटन, पोल्ट्री, अंडी, मासे विक्रेत्यांचा समावेश आहे), शेतमालाशी निगडीत खरेदी-विक्री केंद्र, पाळीव प्राण्यांचे अन्नविक्री केंद्र, पावसाळी हंगामाच्या दृष्टीने आवश्यक वस्तूविक्री केंद्र सकाळी 7 ते 11 या वेळेपुरतीच खुली राहतील.

या दुकानांमधून होम डिलिव्हरी अर्थात घरपोच वस्तू पोहोचवण्याची सुविधा सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहील. परिस्थितीचा अंदाज घेऊन स्थानिक प्रशासन या वेळांमध्ये बदल करू शकतं.

आज रात्रीपासून सुधारित नियम लागू होतील. 1 मे पर्यंत नागरिकांना लॉकडाऊन नियमांचं पालन करायचं आहे.

स्थानिक आपात्कालीन यंत्रणा, राज्य आपात्कालीन व्यवस्थापनाच्या अनुमतीनंतर अत्यावश्यक सेवांमध्ये काही अतिरिक्त गोष्टींचा समावेश करू शकते.

नव्या नियमासह 13 एप्रिल रोजी लागू करण्यात आलेले नियम तसेच कायम लागू होतील असं राज्य सरकारने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

या काळात सार्वजनिक वाहतूक बंद होणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं.

अचानक लॉकडाऊन लागू केल्यास, गोंधळ निर्माण होऊ शकतो हे जाणून सरकारने यासंदर्भात घोषणा करण्यापूर्वी पुरेसा वेळ घेतला. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सशी चर्चा केली. त्यानंतरच लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात आला.

राज्यात वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र तरीही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने प्रदीर्घ लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)