कोरोना महाराष्ट्र: मुंबई- पुणे येथील परिस्थिती सुधारली, असं म्हणता येईल का?

    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढायला लागली. यात मुंबई-पुणे यांसारखी शहरं रुग्णसंख्येचा नवीन रेकॉर्ड दररोज प्रस्थापित करताना दिसून आली. राज्य सरकारच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या आकडेवारीवरून ते स्पष्ट व्हायला लागलं.

पण, गेल्या काही दिवसांपासूनची या शहरांमधील आकडेवारी पाहिल्यास एक आशादायक चित्र निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.

19 एप्रिलपासून मुंबई-पुणे या शहरांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

पण, यामागची कारणं काय आहे आणि असं असेल तर या शहरांमधील परिस्थिती खरंच सुधारली, असं आताच म्हणणं योग्य ठरेल का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आधी या दोन शहरांमधील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवर नजर टाकूया.

आकडे काय सांगतात ?

मुंबई आणि पुण्याची आकडेवारी पाहिल्यास 19 एप्रिलपासून या शहरांमध्ये नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे.

मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार, 19 एप्रिलला शहरात कोरोनाचे 7,381 नवे रुग्ण सापडले आणि 8,583 इतके रुग्ण बरे झाले.

तर 22 एप्रिलला मुंबईत 7,410 नवे रुग्ण आढलले, तर बरे झालेल्यांची संख्या होती 8,090.

याचा अर्थ मुंबईत नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

पुणे महापालिकेच्या आकडेवारी पाहिल्यास, पुण्यात 19 एप्रिलला 4,587 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले, तर 6,473 इतके रुग्ण बरे झाले.

22 एप्रिलला पुण्यात 4,539 नवे रुग्ण आढळले, तर 4,851 रुग्ण बरे झाले आहेत.

याचा अर्थ पुणे शहरातही बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

बाधित रुग्णांची संख्या स्थिर

मुंबईत दररोज बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या मधल्या काळात 10 हजारांच्यावर गेली होती, तर पुण्यातही ती 6 हजारांच्या पुढे होती. आता या परिस्थितीत बदल होत असून रोज नवीन वाढणाऱ्या रुग्णांची संख्या स्थिर झाल्याचं आकड्यांवरुन दिसून येतंय.

राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे याविषयी बोलताना म्हणाले, ''सध्या बाधित रुग्णांची संख्या स्थिर असल्याचं पाहायला मिळतंय. 100 बाधितांमध्ये 80 ते 85 टक्के रुग्ण हे सौम्य लक्षणे असेलेले आहेत. बरेच लोक हे घरच्या घरी बरे होतात. त्यामुळे बरं होण्याचं प्रमाणही वेगाने वाढतंय संसर्गाची तीव्रता ही सौम्य स्वरुपाची आहे.''

इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांच्या मते, ''नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण पुढच्या आठवड्यातही वाढत गेलं तर परिस्थिती नियंत्रणात आहे असं म्हणता येईल.

ते सांगतात, "सध्या वाढणाऱ्या रुग्णांचा आलेख हळूहळू स्थिर होतोय. पुढील तीन आठवड्यात हा आलेख कुठल्या दिशेने जातोय हे पाहिल्यानंतरच नेमका संसर्ग आटोक्यात येतोय का हे सांगता येईल."

निर्बंधांमुळे रुग्णवाढ कमी होतेय का?

कोरोना रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे सध्या राज्यात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.

राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधांमुळे रुग्णवाढ कमी होत आहे का यावर भोंडवे म्हणाले, ''नवीन रुग्णसंख्या स्थिर राहण्यामध्ये 14 एप्रिलपासून घातलेल्या निर्बंधाचा फायदा होत आहे. रस्त्यावरची, बाजारपेठांमधील गर्दी कमी झाल्याने संसर्गाचं प्रमाण कमी झालं आहे हे निश्चित. नवीन कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यासाठी तसेच बरे होणाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी 1 मेनंतर देखील हे निर्बंध आणखी पंधरा दिवस पुढे चालू ठेवायला हवेत.''

तर, ''कोरोनाच्या या लाटेच्या सुरुवातीच्या 15 दिवसांमध्ये बरे होणाऱ्यांच प्रमाण कमी असतं, नंतर बरे होणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढत जाते. हे चक्र नंतर सुरु राहतं. सध्याच्या निर्बंधांचा परिणाम सध्या बरे होणाऱ्यांच्या संख्येत दिसतोय असं म्हणता येणार नाही,'' असं आवटे यांचं मत आहे.

''कोरोनाची वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात येण्यासाठी अजून 3 ते 4 आठवड्यांचा काळ लागेल. जेव्हा लोकांना बेड्स आणि ऑक्सिजन सहजतेने मिळेल तेव्हा संसर्ग नियंत्रणात आला आहे, असं म्हणता येईल,'' असं आवटे यांना वाटतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)