महाराष्ट्र कोरोना : विरारमधल्या कोव्हिड हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

पालघर जिल्ह्यातल्या विरार येथील कोव्हिड हॉस्पिटलला आग लागून यात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आगीची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. तसंच आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी 1 लाख रुपये मदत उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे

विरारमधल्या विजय वल्लभ हॉस्पिटलच्या इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये रात्री उशीरा आग लागली. यावेळी रुग्णालयात एकूण 17 रुग्ण होते. त्यापैकी 13 रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती विरार कोव्हिड कंट्रोल रूमने दिली आहे.

आता ही आग पूर्णपणे आटोक्यात आल्याचं अग्निशमन विभागाने म्हटलं आहे. शॅार्ट सर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या आगीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नेमकं काय घडलं?

प्राथमिक माहितीनुसार हॉस्पिटलमध्ये सेंट्रलाईज एसी होता आणि तो आयसीयूच्या छतावर होता. या एसीचा स्फोट झाल्याने सगळं छत उडलं. आयसीयूमध्ये एकूण 17 पेशंट होते, त्यातल्या 13 जणांच्या मृत्यू झाला आहे.

विजय वल्लभ कोव्हिड केअर हॉस्पिटलचे अधिकारी डॉ. दिलीप शहा यांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार, "इंटेन्सिव्ह केअर युनिट (ICU) मध्ये पहाटे 3 वाजता लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू झालाय. 21 रुग्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं असून यामध्ये काही अत्यवस्थ रुग्णांचाही समावेश आहे."

या चार मजली हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती.

घटनास्थळी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, "रात्री सव्वातीन वाजेच्या सुमारास आयसीयुमधल्या एसीचा स्फोट होऊन आग लागली. त्यावेळी आयसीयूमध्ये 17 पेशंट होते. 4 पेशंट आणि स्टाफ बाहेर आला, पण बाकीचे आग लागल्यामुळे वाचू शकले नाहीत. इथे 13 लोकांचा मृत्यू झालेला आहे. इतर जे नॉन-कोव्हीड 80 पेशंट्स आहेत ते सुरक्षित आहेत. आयसीयूमधले जे 4 पेशंट वाचले त्यांना दुसरीकडे हलवलेलं आहे. बाकी इथे पालिकेचे उच्चाधिकारी उपस्थित आहेत आणि ते बाकीच्या उपाययोजना करत आहेत."

या घटनेत मरण पावलेल्यांमध्ये 5 महिला आणि 8 पुरुषांचा समावेश आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)