You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना संकटात पुण्यातल्या येरवडा कारागृहातून 'असं' पलायन करतायत कैदी
पुण्यातल्या येरवडा कारागृहानजीक उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहातून खिडकीचे गज उचकटून 5 कैदी पळून गेल्याची घटना आज पहाटे (16 जुलै) घडली. हे पाचही कैदी मोकासारख्या गंभीर कायद्याखाली अटक असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून येरवडा कारागृहाशेजारील जात पडताळणी कार्यालयाच्या आवारातील शासकीय वसतिगृहात तात्पुरता तुरुंग उभारण्यात आला आहे. इथल्या इमारत क्रमांक 4 मधून देवगण चव्हाण, गणेश चव्हाण, अक्षय चव्हाण, अजिंक्य चव्हाण, सनी पिंटो हे पाच कैदी 16 जुलैच्या पहाटे पळून गेले.
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
येरवडा कारागृहात असलेल्या कैद्यांमध्ये कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून तुरुंग व्यवस्थापनाने शेजारील शासकीय इमारतीत तात्पुरतं कारागृह उभारलं आहे. इथे कच्च्या कैद्यांना ठेवलं जातं. गंभीर गोष्ट म्हणजे अवघ्या एक ते दीड महिन्याच्या कालावधीत या तात्पुरत्या कारागृहातून तब्बल 8 कैदी पळून गेले आहेत. त्यामुळे इथल्या सुरक्षा व्यवस्थेबद्दलचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
असे पळाले कैदी
देवगण चव्हाण, गणेश चव्हाण, अक्षय चव्हाण, अजिंक्य चव्हाण, सनी पिंटो हे पाचही कैदी पुणे जिल्ह्यातले रहिवासी आहेत. 16 जुलैच्या पहाटे है कैदी तात्पुरत्या कारागृहातल्या 4 क्रमांकाच्या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर होते.
या मजल्यावरच्या खोली क्रमांक 5 च्या खिडकीचे गज त्यांनी पहाटेच्या सुमारास उचकटले. याचा थांगपत्ता त्यावेळी कोणालाच लागला नाही. हे गज उचकटून कैदी बाहेर आले आणि त्यांनी धूम ठोकली. या पाचही जणांवर मोका आणि हत्येचे गुन्हे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना हे कैदी पळून गेल्याबद्दल सूचित केलं आहे. एका महिन्यात पळाले 8 कैदी
गेल्याच रविवारी अनिल वेताळ हा कैदी स्वच्छतागृहातून पळून गेला होता. त्याच्यावर इथल्या शिक्रापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल होता. त्यामुळे त्याला या तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आलं होतं. त्याने स्वच्छतागृहाची कडी तोडून व्हरांड्यातून पलायन केलं. बराच वेळ आवाज दिल्यावर तो न आल्याने स्वच्छतागृहात पाहिलं असता तो नसल्याचं आढळून आलं. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
यापूर्वी जून महिन्यात दोन कैद्यांनी पलायन केल्याची घटना घडली होती. बाथरूमच्या खिडकीचे गज उचकटून दोघे पळाले होते. हर्षद सय्यद, आकाश पवार अशी या दोघांची नावे होती. दोघेही गुन्हेगार असून, त्यांच्यावर जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न करणे अशा प्रकराचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, त्यानंतर लगेचच फरार झालेल्या कैद्यांपैकी एका कैद्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने पिंपळे सौदागर इथून अटक केली होती.
मात्र, कोरोनाच्या काळात तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या या कारागृहातून है कैदी पसार झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सगळ्या प्रकरणांबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही येरवडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना वारंवार संपर्क केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)