कोरोना व्हायरस खरंच हवेतून पसरतो, WHO चं काय म्हणणं आहे?

हवेत तरंगणाऱ्या अतिशय छोट्या अशा कणांमधूनही कोरोना व्हायरस पसरू शकतो यासंबंधीचे काही नवीन पुरावे समोर येत असल्याच्या गोष्टीला जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दुजोरा दिला आहे.

गर्दीच्या असलेल्या, बंदिस्त आणि कोंदट जागेच्या ठिकाणी हवेतून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हवेतून कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे पुरावे सिद्ध झाले तर जागतिक आरोग्य संघटनेच्या कोरोनासंदर्भातील निर्देशांमध्ये बदल होऊ शकतो.

दोनशेहून अधिक शास्त्रज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला यासंदर्भात पत्र लिहून कोरोनाचा हवेतून प्रसार धोका होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली होती.

कोरोना हवेतूनही संक्रमित होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेत कोव्हिड-19 संदर्भात टेक्निकल लीड म्हणून कार्यरत डॉक्टर मारिया वा केरखोव यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

कोरोना हवेच्या माध्यमातूनही पसरतो याचे संकेत मिळाले आहेत मात्र ठामपणे त्याबाबत सांगता येणार नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेच्याच बेनेदेत्ता आल्लेग्रांजी यांनी सांगितलं.

सार्वजनिक ठिकाणी, विशेषत्वाने गर्दीच्या ठिकाणी संकुचित अशा जागेत कोरोना पसरू शकतो हे नाकारता येत नाही. यासंदर्भात पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. हे काम सुरू राहील असं त्यांनी सांगितलं.

तर बरंच काही बदलेल

आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग संक्रमित व्यक्तीच्या नाकातून, तोंडातून बाहेर पडणाऱ्या तुषारांच्या माध्यमातून होत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.

माणसांमध्ये तीन फूटांचं अंतर असेल तर कोरोनाचा संसर्ग रोखणं शक्य असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं. परंतु कोरोना हवेच्या माध्यमातून पसरत असेल तर एकमेकांमधील अंतर तसंच सोशल डिस्टन्सिंगचे नियमही बदलतील.

जागतिक आरोग्य संघटना येत्या काही दिवसात यासंदर्भात नवे नियम जाहीर करेल.

कोरोनाला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्नांची आवश्यकता आहे. केवळ सोशल डिस्टन्सिंग नव्हे तर मास्त आणि अन्य नियमांचंही पालन होणं अत्यावश्यक असं त्यांनी सांगितलं.

क्लिनिकल इंफ्केशिअस डिसिज जर्नलमध्ये सोमवारी प्रसिद्ध झालेल्या एका पत्रानुसार, 32 देशांच्या 239 वैज्ञानिकांनी कोरोना हा फ्लोटिंग व्हायरस म्हणजेच हवेच्या माध्यमातून पसरणारा व्हायरस असल्याचं म्हटलं होतं. कोरोना हवेत स्थिरावू शकतो आणि श्वास घेताना त्याचा संसर्ग होऊ शकतो असं त्यांनी म्हटलं होतं.

जागतिक आरोग्य संघटनेला लिहिलेल्या जाहीर पत्रात डॉक्टरांच्या समूहाने जागतिक आरोग्य संघटनेला कोरोनाच्या संसर्गाबाबत निश्चित करण्यात आलेल्या मानकांचा पुनर्विचार करण्याची मागणी केली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)