You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'14 वर्षांची असताना, आईनं माझं आयुष्य एका पुरुषाच्या हाती सोपवलं', अमेरिकेतील बालविवाहांची धक्कादायक गोष्ट
- Author, आयलेन ऑलिवा
- Role, बीबीसी न्यूज मुंडो
पॅट्रिशिया लेन यांचं बालपण अमेरिकेतील मिनेसोटाच्या बाहेरच्या बाजूस असणाऱ्या ईडन प्रेअरी या छोट्याशा शहरात गेलं. हिरव्यागार टेकड्या आणि नदीचा परिसर अशा दृश्यांनी हे शहर आणि त्याचा परिसर नटलेला आहे.
अनेकांसाठी ते एक रम्य, शांत ठिकाण आहे. मात्र प्रॅट्रिशिया यांच्या दृष्टीनं हे ठिकाण म्हणजे त्यांच्या जगापासून दूर घालवलेल्या बालपणाचं प्रतीक आहे.
"माझा भाऊ आणि मी, एकाकी झालो होतो. आम्ही अमेरिकेतील एका मोठ्या शहराच्या उपनगरात राहत होतो, तरी देखील माझं आयुष्य अत्यंत कठोर आणि स्वातंत्र्य नसलेलं, दडपलेलं होतं," असं पॅट्रिशिया लेन म्हणतात.
लैंगिक शोषणातून एकाकीपण आणि बालविवाह
पॅट्रिशिया लेन या अतिशय लहान वयापासून लैंगिक शोषणाच्या पीडित होत्या. त्यातून त्या तीव्र नैराश्यात गेल्या. त्यामुळे वयाच्या 12 व्या वर्षी त्यांनी एका हेल्पलाइनची मदत घ्यावी लागली.
त्यांची आणि टिमची भेट इथेच झाली. त्यांनी त्या हेल्पलाइनवर फोन केल्यावर ज्या माणसानं एके दिवशी फोन उचलला, तो व्यक्ती म्हणजेच टिम होता. काही महिन्यानंतर तोच तिचा पती होणार होता.
टिम 25 वर्षांचे होते आणि सेमिनरीमध्ये (पाद्री, धर्मगुरूंना प्रशिक्षण देणारं धार्मिक विद्यालय) शिकत होते. मिशनरी बनण्याच्या त्यांच्या धार्मिक प्रशिक्षणाचा भाग म्हणून त्यांना फोन कॉलला उत्तर देणाऱ्या एका छोट्या संस्थेत नेमण्यात आलं होतं.
लवकरच त्यांनी भेटायचं ठरवलं. काही काळानंतर पॅट्रिशिया लेन गरोदर झाल्या आणि त्यांचं लग्न ठरलं. त्यावेळेस त्या अवघ्या 14 वर्षांच्या होत्या.
पॅट्रिशिया लेन इव्हेंजेलिकल कुटुंबातील होत्या. इव्हेंजेलिकल म्हणजे प्रोटेस्टंट ख्रिश्चन गटांशी संबंधित आणि बायबल, ख्रिस्तावर तीव्र श्रद्धा असणारा गट.
त्या म्हणतात, "माझ्या लक्षात आलं की प्रार्थना गर्भनिरोधकासारखं काम करत नाही. मी गरोदर होते आणि मला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं."
आईनं लावला बालविवाह
टिम तळघरात रडत असताना, पॅट्रिशिया लेन यांनी त्यांच्या आई-वडिलांना या अनपेक्षित गोष्टीबद्दल सांगितलं. मात्र ते ऐकून त्यांच्या आईनं जी प्रतिक्रिया दिली, त्याची पॅट्रिशिया यांनी अपेक्षा केलेली नव्हती. 'कुटुंबाची बदनामी' होण्याच्या नावाने पॅट्रिशिया यांनाच दोष देण्यात आला.
"माझ्या आईची स्पष्ट भूमिका होती. कुटुंबाच्या या बदनामीसाठी मीच जबाबदार होते. यातून मार्ग काढण्याचा, सर्वकाही ठीक करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मी त्या माणसाशी लग्न करणं आणि एक चांगली पत्नी होणं," असं पॅट्रिशिया लेन म्हणतात.
जर त्यांना बाळाला जन्म द्यायचा असेल, तर त्यांना लग्न करावंच लागणार होतं.
पॅट्रिशियाच्या वडिलांनी एका संमतीपत्रावर सही केली. दुसऱ्या दिवशी पॅट्रिशिया लेन, त्यांची आई आणि टिम, दक्षिणेच्या दिशेला प्रवासाला निघाले. ते अशा राज्यातील कोर्टच्या शोधात निघाले होते, जिथे पॅट्रिशिया लेन ज्या वयाच्या होत्या, त्या वयाच्या व्यक्तीला लग्न करण्याची परवानगी होती. कारण मिनेसोटामध्ये त्याला मनाई होती.
पॅट्रिशिया लेन म्हणतात, "माझ्याकडं दुसरा कोणताही पर्याय आहे, असं मला वाटत नव्हतं. मला त्या माणसाशी लग्न करायचं नव्हतं, पण मला ते बाळ मात्र हवंच होतं. त्या बाळाला वाढवायचं होतं. मला माहिती होतं की, मी एक चांगली आई होऊ शकते."
गर्भधारणा, एक पळवाट
लेन, त्यांची आई आणि टिम आधी केंटुकीमध्ये पोहोचले. लेन यांच्या वयात लग्नाला परवानगी देणारं हे मिनेसोटाच्या सर्वात जवळचं राज्य होतं. मात्र स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांची विनंती फेटाळली.
"अजिबात नाही. ते खूपच लहान आहेत," असं अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं लेन यांना आठवतं.
त्या म्हणतात, "ते बरोबर होते. अगदी बरोबर होते. मी खूपच लहान होते."
मग ते अलाबामा या राज्याकडे गेले. त्यावेळेस तिथे पॅट्रिशिया लेन त्यांच्या पालकांच्या संमतीनं लग्न करू शकत होत्या. काही मिनिटांमध्येच लॉडरडेल काउंटीमध्ये पॅट्रिशिया लेन आणि टिम यांचं लग्न झालं.
लग्न असलं तरी पॅट्रिशिया लेन यांनी लग्नात घालतात तसा पांढरा गाऊन परिधान केला नव्हता किंवा त्यांच्या केसांमध्ये फुलं माळली नव्हती. या लग्नाची एकमेव साक्षीदार म्हणजे पॅट्रिशिया यांची आई होती.
"ते सगळं अविश्वसनीय गतीनं घडलं. मला तिथे राहायचं नव्हतं. मला तो माणूस आवडत नव्हता आणि माझी आई अतिशय संतापली होती. ते सर्व अतिशय भयंकर होतं," असं लेन यांनी बीबीसीला सांगितलं. त्या आता 58 वर्षांच्या आहेत.
विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर काही मिनिटांतच, पॅट्रिशिया लेन कोर्टहाऊसच्या समोर असलेल्या बागेत गेल्या आणि एका झोपाळ्यावर बसल्या. कोणताही विचार न करता केलेली ती एक बालिश कृती होती. त्यामुळे त्यांची आई आणि त्यांचा नवीन पती, दोघेही संतापले.
"मी माझ्या लग्नाची जी कल्पना केली, त्यापैकी काहीही घडलं नव्हतं," असं पॅट्रिशिया म्हणतात. त्यावेळेस पॅट्रिशिया यांचे गर्भधारणेचे सुरुवातीचे आठवडे होते. नंतर त्यांनी एका बाळाला जन्म दिला. ते बाळ दत्तक देण्यात आलं.
पॅट्रिशिया लेन म्हणतात, "मी माझ्या विवाहाच्या नोंदणीच्या प्रमाणपत्रावर सही केली नव्हती. त्यावर माझं नाव आहे. मात्र मी त्यावर सही करण्याची आवश्यकता नव्हती. माझ्यासाठी माझ्या आईनं सही केली होती. तिनं माझं आयुष्य एका पुरुषाच्या हाती सोपवलं होतं."
"ही लग्न अशीच होतात. इतर लोक तुम्हाला दुसऱ्यांच्या स्वाधीन करतात आणि 18 वर्षांचे होईपर्यंत तुमची त्यातून सुटका होऊ शकत नाही."
अमेरिकेतील बालविवाहाची समस्या आणि कायद्यातील त्रुटी
पॅट्रशिया यांनी टिम यांच्याशी लग्न केल्यापासून 46 वर्षांमध्ये अलाबामा राज्याच्या नियमात फारसे बदल झालेले नाहीत. आज, 14 वर्षांची मुलगी लग्न करू शकत नाही. मात्र लग्नासाठीचं किमान वय 18 वर्षे असूनही, 16 वर्षांची मुलगी तिच्या एका पालकाच्या संमतीनं लग्न करू शकते.
"कोणतेही अतिरिक्त संरक्षणात्मक उपाय नाहीत. राज्याच्या प्रशासनाला अल्पवयीन व्यक्तीकडून स्वतंत्र संमती आवश्यक नसते. तसंच त्यासाठी न्यायालयीन परवानगीदेखील लागत नाही," असं अनास्टाशिया लॉ स्पष्ट करतात.
2025 मध्ये अमेरिकेतील फक्त 16 राज्यांनी तसंच वॉशिंग्टन डीसीनं, कोणत्याही अपवादाशिवाय लग्नाचं किमान वय 18 वर्षे निश्चित केलं आहे. मानवाधिकार गट याच मर्यादेची मागणी करतात.
इतर राज्यांमध्ये जे कायदेशीर अपवाद देण्यात आले आहेत, त्यात भावी जोडीदाराकडून गर्भधारणा, त्या व्यक्तीच्या बाळाला आधीच जन्म दिलेला असणं आणि पालकांची संमती यांचा समावेश आहे.
ज्या राज्यांमध्ये गर्भधारणा हे लग्नाच्या किमान वयासाठी अपवादाचं कारण म्हणून यशस्वीरित्या मांडलं गेलं आहे, त्यामध्ये आर्कान्सा, न्यू मेक्सिको आणि ऑक्लाहोमा या राज्यांचा समावेश आहे.
'इक्वॅलिटी नाऊ' या लिंग-हक्क संघटनेच्या अनास्टाशिया लॉ यांचा युक्तिवाद आहे की, "ज्या नात्यांना आणि शोषणाच्या कृत्यांना एरवी कायदेशीर बलात्कार किंवा बाल अत्याचार मानलं गेलं असतं, अशांना हे अपवाद, कायदेशीर ठरवण्या"पलीकडे काहीही करत नाहीत.
अमेरिकेसह जगभरातील बालविवाहाचं वास्तव
संयुक्त राष्ट्रसंघानुसार, 2025 मध्ये जगभरात अजूनही दरवर्षी जवळपास 1.2 कोटी मुलींचं वयाची 18 वर्षे होण्याआधीच लग्न केलं जातं. 18 वर्षे हे वय बालविवाह म्हणून ठरवण्यासाठीची मर्यादा आहे, शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांनुसार, ही प्रथा जर 2030 पर्यंत संपुष्टात आणायची असेल तर प्रयत्न मोठ्या प्रमाणात वाढवले पाहिजेत, असा इशारा या संघटनेनं दिला आहे.
ही प्रथा आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवाधिकारांचं उल्लंघन म्हणून ओळखली जाते.
'अनचेन्ड ॲट लास्ट', ही संस्था अमेरिकेत ही प्रथा संपुष्टात आणण्यासाठी काम करते. या संस्थेच्या नोंदींनुसार, एकट्या अमेरिकेतच, जिथे केंद्र सरकारनं लग्नासाठीचं किमान वय निश्चित केलेलं नाही, तिथे 2000 ते 2021 दरम्यान 3 लाखांहून अधिक अल्पवयीनांची कायदेशीर लग्नं झाली.
यातील काहीजणांचं लग्नं तर अवघ्या 10 व्या वर्षी झालं होतं. अर्थात यातील बहुतांश जण 16 किंवा 17 वर्षांचे होते. बहुतांश मुलींचं लग्न प्रौढ पुरुषांशी झालं होतं.
"लग्नाच्या नावाखाली होणारे बालविवाह आणि मुलांची तस्करी यांना सध्या परवानगी देणाऱ्या आणि प्रोत्साहन देणाऱ्या पळवाटा एका केंद्रीय कायद्यामुळे बंद होतील," असं लॉ म्हणतात.
'मी अजूनही एकाकीपणाशी संघर्ष करते आहे'
लेन यांना त्यांच्या लग्नानंतरच्या वर्षांमध्ये, अतिशय कठीण निर्णयांना सामोरं जावं लागलं. यात त्यांच्या मुलीला दत्तक देणं आणि पतीला घटस्फोट देणं यांचा समावेश होता. नंतर त्यांनी पुन्हा लग्न केलं. यावेळेस मात्र त्यांनी ते स्वत:च्या इच्छेनं केलं होतं.
अमेरिकेत सक्तीचे आणि बाल विवाह रोखण्यासाठी काम करणाऱ्या संस्थांनुसार, पीडित मुली अनेकदा एकाकी होतात आणि त्यांनी शालेय शिक्षण सोडण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे त्या त्यांच्या पतीवर अधिक अवलंबून होतात.
"माझी शिक्षणाची काही वर्षे वाया गेली. नंतर मी ती भरून काढली. मात्र ते पूर्वीसारखं राहिलं नाही," असं लेन म्हणतात.
"माझ्या पतीनं मला मैत्री करण्याची परवानगी दिली नव्हती. त्यामुळे मी पूर्णपणे एकाकी होते. आजही मी एकाकीपणाचा सामना करते.
मला गटात राहण्यापेक्षा एकटं राहणं अधिक सोयीचं वाटतं. कारण मला अजूनही लोकांवर विश्वास ठेवायला कठीण जातं," असं त्या म्हणतात.
अमेरिकेत कायदेशीर सुधारणांची आवश्यकता?
पीडित आणि नागरी समाजाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, 2018 पासून 16 राज्यांनी बालविवाहावर बंदी घालण्यासाठी त्यांच्या कायद्यात बदल केले आहेत. मात्र अजूनही बरंच काही करायचं बाकी आहे.
"(लोकांना) वाटतं की हे फक्त विकसनशील देशांमध्ये किंवा विशिष्ट धर्मांमध्येच होतं. मात्र नाही, ते अमेरिकेतदेखील होतं," असं लेन म्हणतात.
यासाठी मोहीम चालवणाऱ्यांचं म्हणणं आहे की, अमेरिकेत बालविवाह ही एक समस्या आहे याबद्दलच्या जागरुकतेचा अभाव तसंच खोलवर रुजलेला लिंगविषयक पूर्वग्रह, यामुळे कायदेशीर सुधारणा करणं अधिक कठीण होतं.
"या पुरुषांसाठी विवाह हा फौजदारी आरोपांपासूनच बचाव करण्याचा एक मार्ग आहे. मी कायदे तयार करणाऱ्यांना विनंती करते त्यांना या गोष्टीला परवानगी देऊ नये," असं लेन म्हणतात.
"आणि जे लोक असा युक्तिवाद करतात की 16 किंवा 17 व्या वर्षीच खरं प्रेम होतं. ठीक आहे. जर ते खरं प्रेम असेल, तर ते 18 वर्षांचे झाल्यावर देखील, ते खरं प्रेमच राहील," असं त्या म्हणतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)