द हंट फॉर वीरप्पन : जेव्हा वीरप्पनने वनाधिकाऱ्याच्या डोक्याचा फुटबॉल केला होता

    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी हिंदी

नेटफ्लिक्सवर 'द हंट फॉर वीरप्पन' ही डॉक्युसीरिज प्रदर्शित झाली आहे. वीरप्पन कोण होता? थंड डोक्याचा गुन्हेगार की बंडखोर? या प्रश्नांभोवती चार भागांची ही सीरिज फिरते. सेल्वामणी सेल्वाराज यांनी ही डॉक्युसीरिज दिग्दर्शित केली आहे.

या सीरिजच्या निमित्ताने वीरप्पन हे नाव पुन्हा चर्चेत आलं आहे.

कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनला ठार करणाऱ्या पथकाचे प्रमुख आयपीएस के. विजय कुमार यांनी 'चेसिंग द ब्रिगांड' नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. वीरप्पनला कसं ठार करण्यात आलं याची रंजक कथा त्यांनी पुस्तकामध्ये लिहिली आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने बीबीसीने विजय कुमार यांची मुलाखत घेतली होती. त्याचाच संपादित अंश पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

वीरप्पनचं नाव सर्वांना माहीत होण्यापूर्वी तामिळनाडूमध्ये पोलिसांचं एक जंगल पेट्रोल पथक होतं. त्या पथकाचे प्रमुख होते लहीम शहीम गोपालकृष्णन.

त्यांचे दंड इतके पीळदार होते की, त्यांना त्यांचे सहकारी 'रॅम्बो' म्हणत असत. रॅम्बो गोपालकृष्णन यांच्याबद्दल आणखी एक खास गोष्ट होती ती म्हणजे ते देखील वीरप्पनच्याच वन्नियार समाजातील होते.

9 एप्रिल 1993ला त्यांच्या गावात कोलाथपूरमध्ये मोठे पोस्टर लावण्यात आलं होते. हे पोस्टर्स वीरप्पनने लावलं होतं. या पोस्टरवर गोपालकृष्णन यांना घाणेरड्या शिव्या देण्यात आल्या होत्या.

तसेच, "दम असेल तर मला पकडून दाखव," असं आव्हान वीरप्पननं गोपालकृष्णन यांना दिलं होतं. हे पोस्टर्स पाहून चवताळलेल्या गोपालकृष्णन यांनी वीरप्पनला पकडण्याचा निश्चय केला.

पलार पुलाजवळ पोहोचताच त्यांची जीप खराब झाली. ती जीप त्यांनी तिथेच सोडली आणि पुलावर असलेल्या पोलिसांच्या दोन बस घेऊन ते पुढे निघाले. पहिल्या बसमध्ये त्यांच्यासोबत 15 साथीदार, 4 पोलीस सहकारी आणि 2 वनरक्षक होते.

मागून येणाऱ्या दुसऱ्या पोलिसांच्या बसमध्ये सहा पोलिसांसह तामिळनाडू पोलीस दलाचे निरीक्षक अशोक कुमार होते. जंगलाकडे येणाऱ्या भरधाव बसचा आवाज ऐकून वीरप्पन त्याचे साथीदार काहीसे गोंधळून गेले. त्यांना वाटलं होतं की रॅम्बो गोपालकृष्णन मोजक्या साथीदारांसह जीपमध्ये येतील. त्यांचा हा अंदाज खोटा ठरल्यामुळं तो काहीसा गोंधळला.

पण वीरप्पनने परिस्थितीचा अंदाज घेतला. त्याने दुरुनच पाहिलं की गोपालकृष्णन समोरच्याच सीटवर बसलेले आहेत. त्याने शिटी वाजवली आणि त्याच्या इशाऱ्यानंतर भूसुंरुग स्फोट झाला. बस अक्षरशः हवेत उडाली.

या स्फोटामुळे अग्नीचा एक मोठा गोळा तयार झाला त्याचं तापमान कदाचित 3000 डिग्री इतकं असावं.

हा स्फोट इतका भयंकर होता की बस खालची जमीन पूर्ण हादरली. पूर्ण बसचं हवेत उडाली आणि छिन्न-विछिन्न झालेले देह 1000 किमी प्रती तासाच्या वेगाने जमिनीवर येऊन आदळले.

के. विजय कुमार यांनी आपल्या 'चेंसिंग द ब्रिगांड' या पुस्तकात म्हटलं आहे, "हा स्फोट पाहून वीरप्पनदेखील भेदरून गेला होता. त्याला घाम फुटला आणि कंप सुटला होता. थोड्या वेळाने जेव्हा तिथं अशोक कुमार पोहोचले त्यावेळी त्यांना 21 मृतदेह दिसले."

त्यांनी ते मृतदेह बसमध्ये ठेवले आणि परत निघाले. बस थोडी दूर गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, त्यांचा एक साथीदार बेपत्ता आहे. त्याचं नाव सुगुमार होतं. स्फोट झाल्यावर तो उडून दूर फेकला गेला होता.

त्यामुळे तो कुणाला दिसला नाही. काही वेळानंतर त्याने आपले प्राण सोडले. या घटनेनंतर वीरप्पनची सर्व भागात दहशत निर्माण झाली.

18 जानेवारी 1952 ला वीरप्पनचा जन्म झाला होता. 17 वर्षांचा असताना त्याने पहिल्यांदा हत्तीची शिकार केली होती असं म्हटलं जातं. हत्तीला मारण्याची त्याची एक खास पद्धत होती. हत्तीच्या डोक्याच्या मधोमध तो गोळी घालत असे.

के. विजय कुमार सांगतात, "एकदा वन अधिकारी श्रीनिवास यांनी वीरप्पनला ताब्यात घेतलं होतं. त्याने डोकं दुखत असल्याचा बहाणा करून मालिश करण्यासाठी तेल मागितलं. त्याला तेल देण्यात आलं. पण ते डोक्याला लावण्याऐवजी त्याने हातकडीला लावलं. हातकडी गुळगुळीत झाली. आपले हात मोकळे करून घेऊन त्याने तिथून धूम ठोकली."

वीरप्पनच्या हाताचे ठसे घेतले गेले असते तर पुढील तपासात ते कामाला आले असते. पण अनेक दिवस पोलिसांच्या ताब्यात असूनही त्याच्या हाताचे ठसे का घेण्यात आले नाहीत हे एक कोडंच आहे.

त्या भागात वीरप्पनच्या क्रौर्याची खूप चर्चा असे. एकदा त्याने वन अधिकारी पी. श्रीनिवास यांची हत्या केली आणि त्यांचं डोकं कापून फुटबॉल खेळला होता. हे तेच श्रीनिवास होते ज्यांनी वीरप्पनला पहिल्यांदा अटक केली होती.

श्रीनिवास यांचा भाऊ अर्जुनन हा वीरप्पनच्या नेहमी संपर्कात असे. त्याने अर्जुननला सांगितले की मला शरण यायचं आहे. तू आणि तुझा भाऊ जर जंगलात आला तर मी माझी हत्यारे टाकून शरण येईल.

त्याच्या या भूलथापांना श्रीनिवास आणि अर्जुनन बळी पडले. ते आपल्या काही साथीदारांसह जंगलाकडे रवाना झाले. रस्त्यामध्ये त्यांच्या एक-एक साथीदाराने त्यांची साथ सोडली आणि शेवटी फक्त दोघं भाऊच उरले.

ते एका तलावाजवळ पोहचले त्यावेळी वीरप्पन त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला. त्यांना आधी वाटले की तो आपली हत्यारे टाकून शरण येईल पण वीरप्पन जोरजोरात हसायला लागला.

त्याने श्रीनिवास यांच्यावर गोळीबार सुरू केला आणि त्यांची हत्या केली. इतक्यावरच तो थांबला नाही तर त्यांचं डोकं कापून ट्रॉफीप्रमाणे ते आपल्या घरी नेलं आणि त्या डोक्याला फुटबॉलप्रमाणे खेळण्यासाठी वापरलं.

गुन्हेगारी जगतात क्रौर्याची अनेक उदाहरणे दिसतील पण कुणी आपल्या पोटच्या पोरीला मारल्याचं उदाहरण सापडणार नाही. वीरप्पनने आपल्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीला मारून टाकलं होतं.

विजय कुमार सांगतात, "1993 मध्ये त्याला एक मुलगी झाली होती. ती वेळी अवेळी रडत असे. मुलीच्या रडण्याचा आवाज जंगलात घुमत असे. मुलीच्या रडण्याचा आवाज 110 डेसिबल असतो."

"रात्रीच्या वेळी जर जंगलात बाळ रडत असेल तर हा आवाज अडीच किमी इतक्या अंतरावर देखील जाऊ शकतो. एकदा या आवाजामुळेच तो चांगलाच अडचणीत आला होता."

"यातून धडा घेऊन त्याने आपल्या मुलीचा आवाज कायमचा बंद करण्याचा निर्णय घेतला. 1993मध्ये कर्नाटक एसटीएफला मारी माडुवूमधील जंगलात एका ठिकाणी लहान मुलीचा मृतदेह सापडला होता," असं विजय कुमार म्हणाले.

2000मध्ये वीरप्पनने प्रसिद्ध अभिनेता राजकुमार यांचं अपहरण केलं होते. ते 100 हून अधिक दिवस वीरप्पनच्या ताब्यात होते. यावेळी त्याने कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांना आपल्या अटी मान्य करण्यास भाग पाडले होते. अटींची पूर्तता झाल्यावर त्याने राजकुमार यांना सोडलं.

जून 2001मध्ये आयपीएस अधिकारी विजय कुमार यांना जयललिता यांचा फोन आला आणि त्या म्हणाल्या "मी तुम्हाला स्पेशल टास्क फोर्सचा प्रमुखपदाची जबाबदारी देत आहे. उद्यापर्यंत तुमच्या हाती नियुक्तीपत्र येईल."

एसटीएफची सूत्रं हाती घेतल्यानंतर विजय कुमार यांनी वीरप्पनबाबत गोपनीय माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्यांच्या असं लक्षात आलं की वीरप्पनला डोळ्यांचा त्रास आहे. मिशांना डाय लावत असताना त्याच्या डोळ्यात काही थेंब गेले होते.

आपले ऑडियो टेप किंवा व्हिडिओ टेप पाठवण्याची वीरप्पनला भारी हौस होती. एकदा विजय कुमार त्याचा व्हिडिओ पाहत होते त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की वीरप्पनला वाचताना त्रास होत आहे. हे पाहून विजय कुमार यांच्या डोक्यात एक युक्ती आली.

विजय कुमार सांगतात, "आम्ही निर्णय घेतला की आम्ही आमची टीम छोटी ठेऊ. मोठ्या टीममुळं आमच्यावर नजर ठेवणं वीरप्पनला सहज शक्य होतं. जेव्हा आम्ही किराणा भरत असू तेव्हा मोठी टीम असली की आमचा ठावठिकाणा सहज त्याला कळत होता. म्हणून आम्ही 6-6 जणांच्या टीम बनवल्या."

"वीरप्पनसाठी सापळा रचला गेला. तो आपल्या डोळ्यांवर उपचार करण्यासाठी शहरात येईल हे लक्षात घेऊन योजना आखण्यात आली. आम्ही बरेच दिवस त्याच्या मागावर राहिलो आणि एकेदिवशी तो आमच्या सापळ्यात अडकला. गोपनीय माहितीच्या आधारावर त्याच्यासाठी एका खास रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. त्या रुग्णवाहिकेवर एसकेस हॉस्पिटल सेलम लिहिलेलं होते," अशी माहिती विजय कुमार यांनी दिली.

पुढं ते सांगतात, "त्या रुग्णवाहिकेत एसटीएफमधील दोन जण होते. पोलीस निरीक्षक वैल्लईदुरई आणि चालक सरवनन हे दोघे त्या गाडीत आधीच बसलेले होते. कुणाला ओळखू येऊ नये म्हणून वीरप्पनने आपली भरदार मिशीदेखील ट्रिम केली होती."

"वीरप्पन आणि साथीदारांना घेऊन रुग्णवाहिका ठरलेल्या ठिकाणी आली. तेव्हा चालक सरवनन यांनी रुग्णवाहिकेचं ब्रेक करकचून दाबलं. सरवनन जलदगतीने येत होते. त्यांनी ब्रेक इतकं जोरात दाबलं की टायर आणि जमिनीच्या घर्षणातून धूर निघाला होता. आम्हाला टायर जळल्याचा वास आला. गाडी थांबवताच सरवनन पळत माझ्याकडे आले," विजय कुमार सांगतात.

"मी सरवनन यांचे शब्द स्पष्ट ऐकले. ते म्हणाले वीरप्पन अॅंबुलसमध्ये आहे. त्याच वेळी माझ्या सहकाऱ्याने मेगाफोनवरुन घोषणा केली, हत्यारे टाका. आम्हाला शरण या. पण या घोषणेला वीरप्पननं जुमानलं नाही. वीरप्पनने फायरिंग अॅंबुलंसमधून फायरिंग सुरू केली. मग आम्ही त्यांच्यावर पलटवार केला. मी एके 47चं एक बर्स्ट अॅंबुलसवर चालवलं. थोड्या वेळानंतर फायरिंगचा आवाज बंद झाला," विजय कुमार म्हणाले.

"आम्ही त्यांच्यावर एकूण 338 राउंड फायर केले. नंतर आमच्या सहकाऱ्यांपैकी एक जणाने ऑल क्लियर दिला. 20 मिनिटांत वीरप्पन आणि त्याचे तीन साथीदार मृत्युमुखी पडले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वीरप्पनला केवळ दोनच गोळ्या लागल्या होत्या," असं विजय कुमार यांनी बीबीसीला सांगितलं.

जेव्हा तुम्ही अॅंबुलन्समध्ये पाहिलं तेव्हा वीरप्पन जिवंत होता का? असा प्रश्न बीबीसीने विजय कुमार यांना विचारला.

"त्याचा श्वास तेव्हा सुरू होता. मला कळत होतं की त्याचे प्राण केव्हाही जातील. त्याच वेळी मी त्याला रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेतला. एक गोळी तर त्याच्या डोळ्यातून आरपार निघून गेली होती."

"बिना मिशांचा तो एखाद्या सामान्य माणसाप्रमाणेच दिसत होता. नंतर त्याचे पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टर वल्लीनायगम यांनी मला सांगितले की तो 52 वर्षांचा होता तरी त्याचं शरीर एखाद्या 25 वर्षांच्या युवकाप्रमाणं होतं," पुढं ते म्हणाले.

वीरप्पनचे प्राण गेल्यावर एसटीएफमधील लोकांना विश्वासच बसेना की असं काही खरंच झालं आहे. त्यांनी एसटीएफचे प्रमुख विजय कुमार यांना आपल्या खांद्यावर उचललं.

त्यानंतर विजय कुमार यांनी मुख्यमंत्री जयललिता यांना फोन केला. त्यांच्या सचिव शीला बालकृष्णन यांनी तो फोन उचलला आणि सांगितलं "मॅडम, आराम करत आहेत." तेव्हा विजय कुमार म्हणाले, "माझ्याजवळ अशी बातमी आहे ज्यामुळं मॅडम आनंदी होतील."

दुसऱ्याच क्षणी जयललिता फोनवर आल्या. मी त्यांना म्हटलं, "मॅडम वुई हॅव गॉट हिम. जयललितांनी माझं आणि माझ्या टीमचं अभिनंदन केलं. त्या म्हणाल्या मुख्यमंत्री असताना याहून अधिक आनंदाची बातमी मी ऐकली नाही."

फोन ठेवल्यानंतर विजय कुमार यांची नजर अॅंबुलन्सवर गेली. अजूनही निळा दिवा सुरुच होता. गंमत म्हणजे त्या दिव्याला एकही गोळी लागली नव्हती. हा दिवा बंद करा अशी सूचना त्यांनी दिली. सहकाऱ्याने दिवा बंद केला, जणू तो बंद दिवा हे सांगत होता की मिशन पूर्ण झालं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)