INS विक्रांतला बुडवायला आलेल्या पाकिस्तानी पाणबुडी 'गाझी'लाच मिळाली जलसमाधी

    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

तारीख- 8 नोव्हेंबर 1971. पीएनएस गाझी या पाकिस्तानी पाणबुडीचे कॅप्टन जफर मोहम्मद खान यांनी ड्राय रोडवरील गोल्फ क्लबमध्ये गोल्फ खेळायला सुरुवात केली, इतक्यात त्यांना तत्काळ लियाकत बराकमधील नौदलाच्या मुख्यालयात हजर होण्याचा संदेश मिळाला.

तिथे नौदल कल्याण आणि कारवाई नियोजन विभागाचे संचालक कॅप्टन भोम्बल यांनी त्यांना सांगितलं की, भारतीय नौदलाचं आयएनएस विक्रांत हे विमानवाहू जहाज उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी नौदलप्रमुखांनी त्यांच्यावर (जफर यांच्यावर) दिली आहे. त्यांनी एक लिफाफा जफर यांच्याकडे दिला आणि आयएनएस विक्रांतसंबंधी शक्य तेवढी माहिती त्यात नमूद केल्याचं सांगितलं.

गाझीवर तैनात असलेल्या सर्व नौसैनिकांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांनी पुढील दहा दिवसांच्या आत दिलेलं काम पूर्ण करण्यासाठी रवाना व्हावं, असा आदेश जफर यांना देण्यात आला.

युद्धानंतर 20 वर्षांनी प्रकाशित झालेल्या 'द स्टोरी ऑफ द पाकिस्तान नेव्ही' या पुस्तकात म्हटलं आहे की, 'पाकिस्तानी नौदलाने 14 ते 24 नोव्हेंबर या दिवसांमध्ये आपल्या सर्व पाणबुड्यांना आधीपासून निश्चित केलेल्या गस्तीच्या प्रदेशाकडे जायचा आदेश दिला होता. गाझी या पाणबुडीला सर्वांत दूर बंगालच्या खाडीमध्ये जाण्यास सांगण्यात आलं. तिथे विक्रांत या भारतीय विमानवाहू नौकेला शोधून उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी गाझीवर होती.'

'या निर्णयामागील राजकीय समजुतीवर कधीच प्रश्न उपस्थित करण्यात आले नाहीत. इतक्या दूर शत्रूच्या नियंत्रणाखालील जल क्षेत्रात जाऊन आपलं लक्ष्य साधण्याची क्षमता पाकिस्तानकडील केवळ गाझी या एकाच पाणबुडीमध्ये होती. विक्रांतला बुडवण्यात किंवा तिची हानी करण्याती गाझीला यश मिळालं असतं, तर त्याने भारताच्या नाविकी मोहिमांचं बरंच नुकसान झालं असतं.

यातील संभाव्य यशाचा मोह इतका मोठा होता की अनेक शंका बाजूला सारून ही मोहीम पुढे नेण्याला मंजुरी देण्यात आली होती.'

विक्रांतच्या बॉयलरमध्ये बिघाड

कमांडर जफर व कॅप्टन भोम्बल यांच्यात झालेल्या या चर्चेच्या एक वर्ष आधी आयएनएस विक्रांतचे प्रमुख अधिकारी कॅप्टन अरुण प्रकाश त्यांच्या मुख्य अभियंत्याने पाठवलेला अहवाल वाचत होते. विक्रांतच्या बॉयरलमधील वॉटर ड्रममध्ये चीर गेली असून त्याची दुरुस्ती भारतात करता येणार नाही, असं या अहवालात म्हटलं होतं.

1965 सालीसुद्धा आयएनएस विक्रांतमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही नौका युद्धात सहभागी झाली नव्हती.

या वेळी बॉयलरमध्ये चीर गेल्यामुळे आयएनएस विक्रांत जास्तीतजास्त 12 नॉट्सच्या वेगाने पुढे जाऊ शकत होती. कोणत्याही विमानवाहू जहाजातून विमानाला हवेत झेपावायचं असेल, तर त्यासाठी ते जहाज 20 ते 25 नॉट्सच्या वेगाने पुढे जात असणं गरजेचं आहे.

विक्रांतचं आधीचं नाव एचएमएस हरक्यूलस होतं. ते जहाज भारताने 1957 साली ब्रिटनकडून विकत घेतलं. मूळ जहाज 1943 साली तयार करण्यात आलं, पण दुसऱ्या महायुद्धात ते सहभागी होऊ शकलं नाही. त्या वेळी विक्रांत पाश्चात्त्य ताफ्यामध्ये तैनात होतं, पण त्याची अवस्था वाईट असल्यामुळे नौदलाने ते पूर्वेकडील ताफ्यात सहभागी करण्याचं ठरवलं.

विक्रांत अचानक मुंबईतून गायब झालं...

इयान कारडोझो यांनी '1971 स्टोरीज् ऑफ ग्रिट अँड ग्लोरी फ्रॉम इंडो-पाक वॉर' या पुस्तकात लिहिल्यानुसार, 'नोव्हेंबर 1971 मध्ये मुंबईतील एका हॉटेलात राहणाऱ्या पाकिस्तानी गुप्तहेरांनी त्यांच्या वरिष्ठांना सांगितलं की, आयएनएस विक्रांत मुंबईतच उभं आहे. पण 13 नोव्हेंबरला त्यांना विक्रांत कुठेच दिसलं नाही. अचानक ते जहाज गायब झालं. दरम्यान, पाकिस्तानबाबत सहानुभूती राखणाऱ्या एका पाश्चात्त्य देशाच्या नौदलातील अधिकाऱ्याने पाश्चात्त्य कमांडचे मुख्य फ्लॅग ऑफिसर के. ए.डी.सी. यांना विक्रांतचा ठावठिकाणा विचारण्याचा प्रयत्न केला.'

"लगेचच भारतीय नौदलाच्या गुप्तचर विभागाला याची माहिती देण्यात आली. कालांतराने पाकिस्तानी गुप्तहेरांना कळलं की आयएनएस विक्रांत चेन्नईला नेण्यात आलं आहे. नेमकं त्याच दिवशी पाकिस्तानच्या त्या समर्थक पाश्चात्त्य देशाचं एक विमान चेन्नईला गेलं आणि तिथे त्यात काही बिघाड झाल्यामुळे चेन्नई बंदराजवळ तपासणीसाठी अनेक घिरट्या मारल्या, हा केवळ योगायोग होता का? आयएनएस विक्रांत चेन्नईत आहे की नाही हे तपासणं हा या घिरट्यांमागचा उद्देश होता का?"

भारतीय गुप्तचर विभागाने पाकिस्तानच्या गोपनीय संकेताची फोड केली

गुप्तरित्या वायरलेस संदेश ऐकणारे मेजर धर्म देव दत्त त्यांच्या रकाल आरए 150 रेडिओ रिसिव्हरची बटणं फिरवून 8 नोव्हेंबर 1971 रोजी कराची व ढाका दरम्यानचे संदेश ऐकण्याचा प्रयत्न करत होते. त्या दिवशी अचानक संदेशांची संख्या वाढली, त्यामुळे काहीतही मोठी घटना घडणार आहे आणि भारताला त्याची पूर्ण माहिती असायला हवी, असा त्यांनी अंदाज बांधला.

धरम यांना एनडीएत असतानाच्या काळातील त्यांचे सहकारी 'थ्री डी' या नावाने हाक मारत, कारण बहुतेकशा कागदपत्रांमध्ये ते स्वतःचं नाव धर्म देव दत्त असं लिहीत. त्यांचा टेप रेकॉर्डर आयबीएमच्या मेनफ्रेम कम्प्युटरशी जोडलेला होता. अचानक, 10 नोव्हेंबरला त्यांना पाकिस्तानी नौदलाच्या सांकेतिक संदेशाची फोड करण्यात यश मिळालं आणि सगळं कोडं एका क्षणात सुटलं.

त्यांनी पूर्व कमांडचे स्टाफ अधिकारी जनरल जेकब यांना हा सांकेतिक शब्द सांगितला. पाकिस्तानी नौदलाच्या सांकेतिक संदेशाची फोड करण्यात आली आहे, असा त्याचा अर्थ होता. भारतीय जहाज आयएनएस विक्रांत बुडवणं, हे पाकिस्तानी नौदलाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं तेव्हा उघड झालं. शिवाय, स्वतःकडील पाणबुड्यांचा ताफा वापरून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील जहाजं बुडवणं, हा त्यांचा दुसरा उद्देश होता.

भारतात येण्यापूर्वी श्रीलंकेत गाझीमध्ये इंधन भरण्यात आलं

गाझी पाणबुडी 14 नोव्हेंबर 1971 रोजी कराचीहून मोहिमेवर निघाली. आधी 18 नोव्हेंबरला ती श्रीलंकेतील त्रिंकोमाली इथे गेली. तिथे पाणबुडीत इंधन भरवून घेण्यात आलं. तिथून गाझी चेन्नईला निघायला तयार असतानाच कराचीतून त्यांना संदेश मिळाला की विक्रांत आता चेन्नईला नाही.

मग आम्ही पुढे काय करू, असं जफर यांनी कराचीला विचारलं. कराचीतून पाकिस्तानचे पूर्व किनाऱ्याचे कमांडर रिअर अॅडमिरल मोहम्मद शरीफ यांना सांकेतिक संदेश पाठवण्यात आला आणि विक्रांतच्या ठावठिकाण्याबद्दल त्यांना काही माहिती आहे का अशी विचारणा करण्यात आली. या सर्व संदेशांवर 'थ्री डी' यांचं लक्ष होतं आणि ते या संदेशांचा अर्थ सांकेतिक भाषेत भारतीय नौदलाच्या मुख्यालयाकडे पाठवत होते.

पण पाकिस्तानसुद्धा भारतीय संदेशांवर लक्ष ठएवून होताच. विक्रांत आता विशाखापट्टणमला पोचलं आहे, असं पाकिस्तानने जफर खान यांना कळवलं. विक्रांत विशाखापट्टणममध्ये असतानाच ते उद्ध्वस्त करण्याची सर्वांत योग्य संधी मिळेल, हे पाकिस्तानी नौदलाच्या मुख्यालयाला आणि गाझीचे कॅप्टन जफर या दोघांच्याही लक्षात आलं. 'थ्री डी' यांना याबद्दल कळल्यावर ते खूप अस्वस्थ झाले.

इयान कारडोजो लिहितात, "पाकिस्तानी नौदलाने स्वतःच्या संदेशांमधून उद्देश जाहीर करून मूर्खपणा केला आहे, तसाच मूर्खपणा भारतीय नौदलानेही केला आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी सैन्यदलांच्या संदेशविषयक गुप्तचर यंत्रणेला याबद्दल सावध केलं आणि विक्रांतचा ठावठिकाणा पाकिस्तान्यांना कळल्याचं सांगितलं. यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी भारताला काही आगाऊ पावलं उचलणं गरजेचं होतं."

गाझी 1 डिसेंबरला रात्री विशाखापट्टणमला पोचली

गाझीने 23 नोव्हेंबर 1971 रोजी त्रिंकोमाली इथून विशाखापट्टणमच्या दिशेने प्रवास सुरू केला. २५ नोव्हेंबरला ही पाणबुडी चेन्नई पार करून 1 डिसेंबरच्या रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी विशाखापट्टणम बंदराच्या नाविकी मार्गात दाखल झाली.

मेजर जनरल फझल मुकीम खान यांनी 'पाकिस्तान्स क्रायसिस इन लीडरशिप' या पुस्तकात लिहिल्यानुसार, तिथल्या नाविकी मार्गाची खोली कमी असल्यामुळे गाझीला बंदरापासून 2.1 समुद्री मैलांपर्यंतच जवळ जाणं शक्य होतं, ही मोठी अडचण होती.

आपण आहोत तिथेच थांबायचं आणि आयएनएस विक्रांत बाहेर येईल त्याची वाट पाहायची, असं कॅप्टन जफर यांनी ठरवलं. दरम्यान, गाझीमधून निघणाऱ्या धुरामुळे केवळ त्यातील नाविकी कर्मचाऱ्यांच्या तब्येतीलाच नव्हे तर खुद्द पाणबुडीच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाल्याचं गाझीवरील वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितलं. गाझीने रात्री वर येऊन ताजी हवा आत घ्यावी, त्या दरम्यान बॅटऱ्याही बदलाव्यात, असा सल्ला या अधिकाऱ्याने दिला.

गाझीमधील नाविकांची तब्येत बिघडली

पाणबुडीतील हायड्रोजनची पातळी निर्धारित सुरक्षित प्रमाणाहून वाढला तर गाझी स्वतःच उद्ध्वस्त व्हायचा धोका वाढेल, याचा अंदाज कॅप्टन जफर यांनाही आला होता. पण पाणबुडी सूर्यप्रकाश असताना दुरुस्तीसाठी वर आणली तर ती लगेचच भारतीय नौदलाच्या नजरेत येईल, हेही त्यांना माहीत होतं. गाझी ही मोठी पाणबुडी होती आणि ती दुरूनसुद्धा दृष्टीस पडायची.

संध्याकाळी पाच वाजता पाणबुडीचे कार्यकारी अधिकारी व वैद्यकीय अधिकारी या दोघांनीही कॅप्टन जफर यांना सांगितलं की, पाणबुडीतील हवा खूपच दूषित झाली आहे, त्यामुळे एक नाविक बेशुद्ध पडला आहे.

रात्रीपर्यंत वाट न बघता त्याच वेळी गाझीला वर न्यावं, असा सल्ला त्यांनी दिलं. या दरम्यान पाणबुडीतील हवा सातत्याने प्रदूषित होत होती. अनेक नाविकांनी खोकायला सुरुवात केली, त्यांच्या डोळ्यांवरही याचा परिणाम होऊ लागला.

भारतीय जहाज गाझीच्या दिशेने येताना दिसलं

गाझीला पेरिस्कोपच्या पातळीवर नेऊन बाहेरच्या परिस्थितीचा आढावा घ्यावा, असा आदेश कॅप्टन जफर यांनी दिला. हळूहळू गाझी समुद्री पृष्ठभूमीच्या 27 फूट अंतरापर्यंत आली. तिथून पेरिस्कोपने बाहेरच्या परिस्थितीचा अंदाज घेत असताना कॅप्टन जफर यांना धक्का बसला. जेमतेम एक किलोमीटर अंतरावर एक मोठं भारतीय जहाज त्यांच्याच दिशेने येत असल्याचं त्यांना दिसलं.

जफर यांनी अजिबात वेळ न घालवता गाझीला खाली बुडी मारायचा आदेश दिला. जफर यांच्या आदेशानंतर ९० सेकंदांमध्ये गाझी पुन्हा समुद्रतळाशी निघून गेली. एका मिनिटाने भारतीय जहाज गाझीच्या वरून निघून गेलं. कॅप्टन जफर खालीच परिस्थिती निवळण्याची वाट पाहत थांबले.

दरम्यान, पाणबुडीतील परिस्थिती बिघडत असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांना येऊन सांगितलं. पाणबुडी पृष्ठभागापर्यंत जाणं गरजेचं होतं. त्या वेळी असं ठरवण्यात आलं की, गाझी 3-4 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता वर जाईल आणि चार तास दुरुस्तीचं काम करून सकाळी चार वाजता पुन्हा खाली येईल. या वेळात नाविकांनी इच्छा असेल तर आपापल्या कुटुंबियांना पत्र लिहावं, ही पत्रं परत जाताना त्रिंकोमालीमध्ये टपालात टाकता येतील, असं जफर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सुचवलं.

पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करत असताना मोठा स्फोट

दरम्यान, 3 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्याची बातमी जफर यांच्यापर्यंत पोचली नव्हती.

पाकिस्तानचे व्हाइस अॅडमिरल मुझफ्फर हुसैन कराचीमधील त्यांच्या कार्यालयात येरझारा घालत होते. जफर यांच्याकडून विक्रांत उद्ध्वस्त झाल्याची बातमी येईल, याची ते वाट पाहत होते. पण गाझीकडून कोणतीही वार्ता येत नव्हती.

3-4 डिसेंबरच्या मध्यरात्री पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाला संबोधित करून पाकिस्तानने हल्ला केल्याचं सांगितलं.

पंतप्रधानांचं भाषण सुरू असताना विशाखापट्टणमच्या बंदरापासून थोड्या अंतरावर एक मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की बंदराजवळच्या घरांच्या काचा फुटल्या.

समुद्राचं पाणी खूप उंचापर्यंत उडून खाली आल्याचं लोकांना दुरून दिसलं. भूकंप झाला असावा असं काही लोकांना वाटलं, तर काहींना वाटलं की, पाकिस्तानी हवाई दलाने वरून बॉम्बवर्षाव केला असावा.

मध्यरात्री 12 वाजून 15 मिनिटांनी हा स्फोट झाला. त्यानंतर गाझीतून मिळालेलं घड्याळ याच वेळी बंद पडलं होतं. चार डिसेंबरला दुपारी काही मच्छिमारांना समुद्रात गाझीचे काही अवशेष मिळाले.

आयएनएस विक्रांतला गुप्तरित्या अंदमानला पाठवण्यात आलं

या घटनाक्रमातील सर्वांत विशेष गोष्ट म्हणजे आयएनएस विक्रांत हे जहाज विशाखापट्टणमच्या किनारपट्टीवर नव्हतंच. हे कळल्यावर पाकिस्तानी पाणबुडीला तत्काळ विक्रांतच्या शोधासाठी अंदमान बेटाकडे पाठवण्यात आलं. विक्रांत विशाखापट्टणमच्याच किनाऱ्यावर आहे असं पाकिस्तान्यांना दाखवण्यासाठी आयएनएस राजपूत हे जुनं जहाज तिथे लावून ठेवण्यात आलं.

1971 मध्ये पूर्व कमांडचे प्रमुख असणारे व्हाइस अॅडमिरल एन. कृष्णन यांनी 'अ सेलर्स स्टोरी' या त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की, "आयएनएस राजपूतला विशाखापट्टणमपासून 160 किलोमीटर अंतरावर नेण्यात आलं. आयएनएस विक्रांतच्या कॉल साइनचा वापर करून त्याच

रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे बरीच रसद मागवावी, अशी सूचना राजपूतवरील कर्मचाऱ्यांना करण्यात आली."

"विशाखापट्टणमच्या बाजारपेठेतून मोठ्या प्रमाणात धान्य, मटण व भाज्या विकत घेण्यात आल्या, जेणेकरून तिथे उपस्थित पाकिस्तानी गुप्तहेरांना आयएनएस विक्रांत विशाखापट्टणमच्या किनाऱ्यावरच उभं आहे असं भासावं. शिवाय, वायरलेस संदेशांची देवाणघेवाण वाढवण्यात आली, त्यामुळे किनाऱ्यावर एक मोठं जहाज उभं असल्याचं पाकिस्तान्यांना वाटत राहिलं. विक्रांतवरील सुरक्षाविषयक नियमांचा जाणीवपूर्वक भंग करून तिथल्या एका नाविकाला त्याच्या आईची तब्येत विचारण्यासाठी एक तारसंदेश पाठवायला सांगण्यात आला.

भारतीय नौदलाचा हा प्रयत्न यशस्वी झाल्याचा दाखला गाझीच्या अवशेषांमध्ये मिळाला. कराचीहून गाझीकडे आलेल्या एका संदेशात म्हटलं होतं की, विक्रांत जहाज अजून बंदरापाशीच असल्याची गुप्तचर माहिती आहे आहे."

हायड्रोजनची पातळी वाढल्याने गाझीचा स्फोट झाला का?

गाझी पाणबुडी का बुडाली याबद्दल केवळ अंदाजच बांधणं शक्य आहे. सुरुवातीला भारतीय नौदलाने याचं श्रेय घ्यायचा प्रयत्न केला, आणि आयएनएस राजपूतने गाझीला बुडवलं असं सांगितलं गेलं. गाझी स्वतःच लावलेल्या सुरुंगाचा स्फोट झाल्याने उद्ध्वस्त झाली, अशीही एक शंका वर्तवण्यात आली.

तिसरा अंदाज असा होता की, पाणबुडीमधील सुरुंगांच्या साठ्यात अचानक स्फोट झाल्यामुळे गाझीला जलसमाधी मिळाली. शिवाय, पाणबुडीत गरजेपेक्षा जास्त हायड्रोजन वायू गोळा झाल्यामुळे स्फोट घडला, असाही एक चौथा अंदाज वर्तवण्यात आला.

गाझीच्या अवशेषांचा तपास करणाऱ्या बहुतांश भारतीय अधिकाऱ्यांच्या मते यातील चौथी शक्यता जास्त वास्तवाला धरून आहे. गाझीच्या अवशेषांमधील सुट्या भागांचा तपास करणारे अधिकारी सांगतात की, गाझीचा सांगाडा मधल्या भागात तुटला होता, ज्या ठिकाणी पाणतीर ठेवलेले असतात. पाणतीर किंवा सुरुंग यांचा स्फोट झाला असता तर पाणबुडीच्या पुढच्या भागाचं जास्त नुकसान झालं असतं. शिवाय, पाणबुडीत गरजेपेक्षा जास्त हायड्रोजन वायू निर्माण झाल्याचं तिथून पाठवण्यात आलेल्या बहुतांश संदेशांमध्ये नमूद केल्याचं दिसून आलं.

गाझी बुडाल्यानंतर उपस्थित झालेले प्रश्न

गाझी पाणबुडी बुडाल्याची बातमी पहिल्यांदा भारतीय नौदल मुख्लयाने 9 डिसेंबर रोजी दिली. वास्तविक गाझी 3-4 डिसेंबरलाच बुडाली होती.

व्हाइस अॅडमिरल जी. एम. हिरानंदानी यांनी 'ट्रान्झिशन टू ट्रायन्फ: इंडियन नेव्ही 1965-1975' या पुस्तकात लिहिलं आहे, "भारताने गाझी बुडाल्याची घोषणा प्रत्यक्ष घटना घडल्यावर सहा दिवसांनी केली, याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले. ही पाणबुडी युद्धाची घोषणा होण्याच्या आधीच बुडवली गेली असावी, या शक्यतेला यातून आधार मिळाला.

शिवाय, 26 नोव्हेंबरनंतर गाझीला कराचीतील नौदल अधिकाऱ्यांशी संपर्क साधता आला नाही, त्यामुळेसुद्धा या शक्यतेचा निर्देश झाला. तर, इतर काहींनी असं म्हटलं की, 9 डिसेंबरला भारताचं खुखरी हे जहाज बुडवण्यात आलं, त्या घटनेवरून लक्ष हटवण्यासाठी गाझीच्या बुडण्याची घोषणा त्या दिवशी करण्यात आली."

परंतु, गाझी बुडाल्याची घोषणा करण्यापूर्वी आपल्याला सर्व पुराव्यांची उलटतपासणी करायची होती, असं स्पष्टीकरण भारताने दिलं. समुद्रात जाऊन गाझीचा तपास करण्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या, कारण त्या वेळी समुद्रातील लाटांचा वेग खूप जास्त होता.

भारतीय पाणबुड्या शोधकांना 5 डिसेंबरला ठोस पुरावे मिळाले, आणि बुडालेली पाणबुडी खरोखरच गाझी आहे यावर शिक्कामोर्तब झालं. तिसऱ्या दिवशी पाणबुड्या शोधकांना गाझीच्या कोनिंग टॉवरचं हॅच काढण्यात यश मिळालं आणि त्याच दिवशी पाणबुडीतून पहिलं शव बाहेर काढण्यात आलं.

भारताने अमेरिकेचा व पाकिस्तानचा प्रस्ताव नाकारला

गाझी अजूनही विशाखापट्टणम बंदराजवळच्या भागात बुडालेली आहे. आपण स्वतःच्या खर्चाने गाझीला समुद्रातून बाहेर काढू, असा प्रस्ताव अमेरिकेने भारत सरकारसमोर ठेवला होता. मुळात ही पाणबुडी अमेरिकी होती आणि ती पाकिस्तानला भाडेकरारावर देण्यात आली होती, असा युक्तिवादही यासाठी करण्यात आला.

परंतु, भारताने हा प्रस्ताव नाकारला. गाझी पाणबुडी बेकायदेशीररित्या भारतीय जलक्षेत्रात घुसली होती, आणि पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्यानंतर ही पाणबुडी उद्ध्वस्त करण्यात आली, असं भारताने सांगितलं.

पाकिस्ताननेही स्वतःच्या खर्चाने गाझी बाहेर काढण्याचा प्रस्ताव ठेवला, पण भारताने त्यांनाही तसंच उत्तर दिलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)