कोरोना व्हायरस : घरबसल्या आपण काय करू शकतो?

    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

कोरोना व्हायरसमुळे लागू झालेला लॉकडाऊन वाढतच चाललाय. एकीकडे घरी बसल्याने किंवा कामं खोळंबल्याने अस्वस्थता वाढलीय. तर दुसरीकडे परिस्थिती सुधारावी म्हणून आपल्याला काही करता येईल का, असा प्रश्नही आता अनेकांच्या मनात येतोय.

सध्याच्या घडीला घराबाहेर पडून काही करणं शक्य नाही. राज्यात वेगवेगळ्या भागांमध्ये निर्बंध विविध स्वरूपामध्ये शिथील करण्यात येत आहेत. पण तरीही अजून सरसकट सगळ्यांना बाहेर पडता येणार नाही.

मग या सगळ्यामध्ये घरबसल्या आपण काय करू शकतो?

1. घरी बसा

सध्याच्या घडीला ही सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही राहता तो भाग कोणत्या झोनमध्ये येतोय (रेड, ऑरेंज की ग्रीन) हे तपासून घ्या. आणि त्यानुसार त्या त्या ठिकाणीसाठी असणारे नियम पाळा. पण एक महत्त्वाची गोष्ट - कोणत्याही भागात राहात असलात तरी कामाशिवाय बाहेर पडू नका, गर्दी करू नका. असं केल्याने कोरोना व्हायरसचं संक्रमण कमी करायला तुम्ही मदत कराल.

राज्यात आढळलेल्या कोरोना व्हायरसच्या पेशंट्सपैकी बहुतेकांमध्ये याच्या संसर्गाची लक्षण आढळली नव्हती, म्हणूनच अनेकदा लागण झाल्याचं अनेकांना जाणवतही नाही. अशा व्यक्तींकडून हा संसर्ग पसरण्याची शक्यता मात्र असते. म्हणूनच महत्त्वाचं काम नसेल, तर घरी बसलेलंच उत्तम.

2. रक्तदान करा किंवा त्यासाठी नोंदणी करा.

राज्यातल्या रक्तपेढ्यांना सतत रक्ताची गरज असते. थॅलेसेमियासारख्या रोगाच्या रुग्णांना ठराविक कालावधीनंतर रक्त चढवावं लागतं. त्यांचं आयुष्य यावर अवलंबून असतं. म्हणूनच तुमच्या जवळच्या रक्तपेढीशी संपर्क साधून तुमचं नाव तिथे नोंदवा. गरज असेल तर तिथे जाऊन रक्तदान करा. संपूर्ण महाराष्ट्रातल्या रक्तपेढ्यांविषयीची माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या (SBTC) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कोरोना विषाणूच्या संर्सगाच्या काळातही तुम्ही सगळी खबरदारी बाळगून सुरक्षितपणे रक्तदान करू शकता.

3. इतरांना मदत करा

घरबसल्या आपल्या परीने तुम्ही इतरांना मदत करा. यामध्ये तुमच्या घरी कामासाठी येणाऱ्या मदतनीस, सोसायटीचे वॉचमन, अत्यावश्यक सेवांमधले कर्मचारी या सगळ्यांना तुम्ही मदत करू शकता. अनेक स्थलांतरित मजूर सध्या अडकून पडलेले आहेत. त्यांना जेवण आणि अत्यावश्यक गोष्टी पुरवण्याचं काम अनेक गट करत आहेत. अनेक ठिकाणी पोलिस स्टेशन्सच्या मदतीने या लोकांसाठी अन्न पुरवलं जातंय. तुम्ही यामध्ये सहभागी होऊ शकता.

आपल्या घरी एरवी कामाला येणाऱ्या मदतनीसांपर्यंत आवश्यक गोष्टी, धान्य पोहोचवण्यासाठीही तुम्ही प्रयत्न करू शकता. महिनाभर कामाला आल्या नाहीत, म्हणून त्यांचा पगार कापू नका. राज्य सरकारनेही असं आवाहन केलेलं आहे.

ज्येष्ठ नागरिक, विविध व्याधींचा सामना करणारे शेजारी असतील तर त्यांना सामान - औषधं आणून द्यायला तुम्हाला मदत करता येईल. या लोकांमध्ये संसर्ग पटकन होण्याचा धोका असल्याने त्यांचं घराबाहेर पडणं योग्य नाही.

4. तुमची कौशल्यं वापरा किंवा शिका

घरी बसावं लागल्याने तुम्हाला तुमचं आयुष्य अगदी 'नॉर्मल' जरी जगता येत नसलं तरी तुम्ही तुमच्या कौशल्यांचा वापर करू शकता. सध्या इंटरनेट वा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून अनेक गोष्टी घडत आहेत. भाषा कौशल्यं, लहान मुलांसाठी क्राफ्ट, नृत्य, पेंटिंग अशा काही गोष्टी तुम्हालाही ऑनलाईन शिकवता येतील.

किंवा या कालावधीचा वापर तुम्ही नवीन गोष्टी शिकण्यासाठी करू शकता. सध्या अनेक विद्यापीठांनी आपले ऑनलाईन कोर्सेस मोफत उपलब्ध करून दिले आहेत. यातला तुमच्या आवडीचा कोर्स शोधून तुम्ही तो करू शकता.

तुमच्याकडच्या कौशल्यांचा वापर आणखी एका विशिष्ट पद्धतीने करू शकता - लोकांच्या मनोरंजनासाठी. स्पेन आणि इटलीमध्ये अनेक गायकांनी, वादकांनी गॅलरीमध्ये येऊन आपली कला सादर करायला सुरुवात केली होती. दडपण आणणाऱ्या सध्याच्या परिस्थितीत सगळ्यांनाच काहीसा विरंगुळा मिळावा, हा यामागचा हेतू होता. तुम्हीही हा प्रयोग करू शकता. किंवा घरच्या घरी व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसिद्ध करू शकता.

अनेक डॉक्टर्स आणि मानसोपचार तज्ज्ञांनी सध्या आपले फोन नंबर्स सर्वांसाठी जाहीर केले आहेत. कोणाला सल्ला हवा असल्यास वा मानसिक ताण आल्यास त्या व्यक्तींना मदत पुरवण्यासाठी अनेक संस्थांनी हेल्पलाईनही सुरू केलेल्या आहेत.

5. आर्थिक मदत

सध्याच्या घडीला अनेक संस्था आणि गट इतरांना मदत करत आहेत. अशा संस्था वा गटांना तुम्ही आर्थिक वा वस्तूंच्या रूपाने मदत करू शकता. पण मदत करायच्या आधी या संस्थांची खातरजमा करून घ्या. शिवाय पंतप्रधान आणि मुख्यमंत्री निधीलाही तुम्ही मदत देऊ शकता.

विविध समाज गटांसाठी, प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांनाही सध्या निधीची गरज आहे. अनेकजण सध्या मास्क वा PPE बनवण्याचं काम करत आहेत. अशांनाही तुम्ही मदत करू शकता.

6. गप्पा मारा

सध्याच्या काळात मनमोकळ्या गप्पा अनेकांसाठी सध्याच्या काळात मनाला उभारी देणाऱ्या ठरू शकतात. विशेषतः वयस्कर व्यक्ती वा घरी एकटे असणारे, यांच्याशी फोन वा व्हिडिओ कॉलवरून गप्पा मारल्यास एकटेपणा कमी व्हायला मदत होईल.

7. डायरी लिहा

डायरी लिहीण्याचे वा नोंदी ठेवण्याचे सध्याच्या काळात वेगवेगळे फायदे आहेत.

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी तिथल्या नागरिकांना अशा नोंदी करून ठेवण्याचं आवाहन केलं होतं. आपण कुठे कुठे गेलो, काय केलं, कुणाला भेटलो याची नोंद करून ठेवा.

कारण गरज भासल्यास या नोंदींचा फायदा तुम्ही कोणाच्या संपर्कात आला होतात, वा तुमच्या संपर्कात कोण आलं होतं हे शोधण्यासाठी होऊ शकतो.

शिवाय मनात येणारे विचार कागदावर उतरवल्याने अनेकदा मनावरचं दडपण कमी व्हायलाही मदत होते.

शिवाय काही वर्षांनंतर या नोंदी वाचून पाहताना तुम्हाला लॉकडाऊनच्या या दिवसांची सगळी आठवण, दिनक्रम आणि तपशील वाचता येईल.

8. चुकीची माहिती फॉरवर्ड करू नका

सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवरून सध्या भरपूर चुकीची माहिती पसरवली जात आहे. म्हणूनच तुमच्याकडे आलेला एखादा मजकूर पुढे पाठवताना आधी विचार करा.

सध्याच्या साथीवरचे विविध उपाय सुचवले जातायत. गरम पाणी पिणं, गरम पाण्याने आंघोळ करणं, लसूण खाणं, चहा पिणं असे अनेक उपाय या मेसेजेसमधून सुचवले गेले. पण या दाव्यांमध्ये काहीही तथ्य नाही. म्हणूनच तुमच्याकडे आलेल्या मेसेजची आधी खातरजमा करून घ्या.

आपल्याकडे आलेली माहिती खात्रीशीर वाटत असली, जवळच्या व्यक्तीकडून आलेली असली तरी ती तपासून घ्या.

किमान दोन विश्वासार्ह स्रोतांनी त्या गोष्टीला दुजोरा दिला असेल, तरच ती माहिती पुढे पाठवा.

तुम्ही न वाचलेला लांबच लांब मेसेज, न पाहिलेला व्हिडिओ जसाच्या तसा फॉरवर्ड करू नका.

आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे कोव्हिडच्या पेशंट्सचं नाव, पत्ता जाहीर करू नका. तुमच्या परिसरातल्या एखाद्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात येत असेल, तर त्याचा व्हिडिओ करून, तो पुढे फॉरवर्ड करू नका.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)