जागतिक रक्तदान दिन : कोरोनाच्या काळात कसं करता येईल रक्तदान?

    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हा रक्तपेढ्यांना बसला आहे लॉकडाऊनमुळे राज्यभरातून फारसं रक्त संकलन झालेलं नाही.

रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासंबंधी सरकारतर्फे देण्यात आलेल्या सगळ्या सूचनांचं पालन करून रक्तदान करावं असं आवाहन करण्यात आलं.

पुरेशी काळजी घेऊन रक्तदान केल्यास रक्तदात्याला कोणताही धोका नसल्याचंही सरकारने म्हटलंय.

किती रक्ताची गरज?

राज्य रक्त संक्रमण परिषद (State Blood Transfusion Council) च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये दररोज 4500 ते 5000 रुग्णांनी रक्ताची गरज भासते.

गंभीर आजारांसाठी करण्यात येणाऱ्या तातडीच्या शस्त्रक्रिया, अपघातग्रस्त, विविध आजारांचे रुग्ण, थॅलेसिमियाचे रुग्ण आणि हिमोफिलिया या रक्ताच्या आजाराच्या रुग्णांना रक्ताची गरज असते.

यापैकी थॅलेसिमिया आणि हिमोफिलियाच्या रुग्णांना नियमितपणे रक्त संक्रमण करून घ्यावं लागतं.

संकलित करण्यात आलेलं रक्त 35 दिवसांपर्यंत वापरता येऊ शकतं, यामुळेच रक्तपेढ्यांमध्ये सध्या पुरेसा साठा करणं आवश्यक आहे.

राज्यभरामध्ये सध्या फक्त अत्यावश्यक सर्जरीच केल्या जात असल्याने गेल्या 2-3 दिवसांमध्ये रक्ताची मागणी कमी झालेली आहे. पण तरीही नियमित रक्त लागणाऱ्या रुग्णांच्या दृष्टीने परिस्थिती चिंताजनक आहे.

थॅलेसिमियाचे रुग्ण अडचणीत

रक्ताची सर्वात जास्त गरज भासते ती थॅलेसिमियाच्या रुग्णांना. जिवंत राहण्यासाठी दर 15 दिवसांनी रक्त संक्रमण करून घेणं, म्हणजेच नवीन रक्त शरीरात चढवून घेणं या रुग्णांसाठी गरजेचं असतं.

याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना थिंक फाऊंडेशनचे विनय शेट्टींनी सांगितलं, "महाराष्ट्रामध्ये 8 ते 10 हजार थॅलेसेमिक रुग्ण आहेत. एकट्या मुंबईमध्ये सुमारे 2400 रुग्ण आहेत. यांच्यासाठी रक्त हा जीवनमरणाचा प्रश्न आहे.

या सगळ्यांना दर 15 ते 21 दिवसांनी रक्त लागतं. शिवाय एकदा 'ट्रान्सफ्युजन' करताना म्हणजेच रक्त चढवताना फक्त 1 युनिटच रक्त लागतं असं नाही. वयाने मोठ्या रुग्णांना 3 युनिट्स रक्तही लागू शकतं. प्रत्येक रुग्णासाठी हे प्रमाण वेगवेगळं असतं. आणि हे आयुष्यभर करावं लागतं.

राज्यभरातल्या विविध संस्था सध्या रक्त संकलनाचं हे प्रमाण वाढवण्यासाठी, लोकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

रक्ताचा वापर या कालावधीत होत होता, पण तितक्या प्रमाणात संकलन झालं नाही. फक्त थॅलेसिमियाग्रस्तच नाहीत, तर विविध आजारांच्या रुग्णांना रक्ताची गरज आहे, सर्जरी, अॅक्सिडेंट, डिलीव्हरीज या सगळ्यासाठी ब्लड बँकेत रक्त हवंच.”

“थॅलेसेमियाच्या मुलांसाठी रक्त ही त्यांची लाईफलाईन आहे. रक्त नाही मिळालं तर हिमोग्लोबिन खाली येऊन त्यांचा जीवही जाऊ शकतो. तातडीने गरज नसलेलं एखादं ऑपरेशन पुढे ढकलता येईल, पण थॅलेसिमिक मुलांना रक्त घेणं टाळता येणार नाही. म्हणूनच लोकांनी पुढे येऊन रक्तदान करणं गरजेचं आहे," असं सुजाता रायकर यांनी सांगितलं.

लालबागचा राजा मंडळ, सिद्धीविनायक मंदीर न्यास या मुंबईतल्या संस्थांनी पुढाकार घेत कामाला सुरुवात केली आहे.

मुंबईमध्ये सिद्धीविनायक ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतंय. यासाठी रक्तदात्यांनी नोंदणी केल्यानंतर रक्त संकलन करणारी व्हॅन त्यांच्या घराजवळ जाऊन तिथे रक्त संकलन करण्यात येतं.

एक एप्रिलपासून अशा प्रकारे रक्तसंकलनाला सुरुवात करण्यात येणार आहे. पण त्या आधी रक्तदान करण्यासाठी इच्छुक व्यक्ती वा सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी नोंदणी करणं आवश्यक आहे.

तर प्रदेश युवक काँग्रेसने 10,000 पिशव्या रक्त संकलन करण्याचं उद्दिष्टं ठेवलंय. त्यानुसार अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरं घेतली जात आहेत. यामध्ये रक्तदात्यांना टोकन देऊन, गर्दी होऊ न देता रक्त संकलन करण्यात येतंय.

रक्तदात्यांच्या मनातली भीती

आपण रक्तदानासाठी घराबाहेर पडलो तर आपल्याला कोरोना व्हायरसचं संक्रमण होऊ शकतं, किंवा सध्याच्या परिस्थितीत हे कितपत सुरक्षित आहे, पोलिसांनी पकडलं तर काय करायचं यासारख्या शंका लोकांच्या मनात आहेत. पण पुरेशी काळजी घेतली तर सुरक्षितपणे रक्तदान करता येणं शक्य असल्याचं विनय शेट्टी सांगतात.

शेट्टी पुढे म्हणतात, "सरकारच्या नियमांचं पालन करून आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून रक्तपेढ्या वा रक्तदान शिबिरं संकलनाचं काम करत आहेत. म्हणूनच गटाने एकत्र बाहेर न पडता, शक्यतो एकट्याने जाऊन रक्तदान करावं असं आवाहन आम्ही करतोय. शिवाय मोठ्या सोसायट्यांमध्ये रक्त संकलन करणाऱ्या व्हॅन्स नेऊन लोकांना फार दूर न जाताही रक्तदान करता यावं यासाठीही आमचे प्रयत्न सुरू आहेत."

राज्यभरामध्ये शुक्रवारपासून रक्तदान शिबिरांच्या आयोजनाला सुरुवात झालेली आहे. पण एकदा जमा केलेलं रक्त 35 दिवसच टिकत असल्याने हे सगळं रक्त संकलन एकाचवेळी होण्यापेक्षा टप्याटप्याने - नियमित होणं गरजेचं आहे.

रक्तदान कसं कराल?

संपूर्ण महाराष्ट्रातल्या रक्तपेढ्यांची माहिती राज्य रक्त संक्रमण परिषद (SBTC) च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे

  • तुमच्या जवळच्या रक्तपेढीला फोन करून त्यांची गरज जाणून घ्या.
  • तुमचा प्रवासाचा इतिहास जाणून घेण्यात येईल, तुमची वैद्यकीय माहितीही विचारण्यात येईल.
  • ब्लड बँकेला आता गरज असल्यास तुम्हाला रक्तदानासाठीचा टाईमस्लॉट देण्यात येईल.
  • यासाठीचा एक मेसेज तुमच्या फोनवर येईल. रक्तदानासाठी बाहेर पडल्यावर पोलिसांनी अडवल्यास तुम्ही हा संदेश पोलिसांना दाखवू शकता.

रक्तदानासाठी काम करणाऱ्या संस्थांनी मिळून मुंबईतल्या रक्तदात्यांसाठी एक प्रणाली स्थापन केली आहे.

https://youtoocanrun.com/races/?ee=2012 या लिंकवर क्लिक करून मुंबईतले रक्तदाते नोंदणी करू शकतात.

शिवाय मुंबईमध्ये सोसायटीमध्ये जाऊन रक्त संकलनकरणाऱ्या व्हॅनद्वारेही ही मोहीम राबवण्यात येत आहे.

रक्त संकलन करताना दात्यांची गर्दी होणार नाही, रक्तदात्यांची 'ट्रॅव्हल हिस्ट्री' तपासली जाईल, स्वच्छतेचे आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जातील याची काळजी रक्तपेढ्या आणि मोबाईल ब्लड बँक व्हॅन्समध्ये घेण्यात येतेय.

प्लाझ्मा थेरपी पण महत्त्वाची

कोरोनाच्या काळामध्ये रक्तदान तर महत्त्वाचं आहेच पण प्लाझ्मा थेरपीही महत्त्वाची आहे.

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तींच्या शरीरातल्या प्लाझ्माचा वापर यामध्ये केला जातो.

तर एखादा विषाणू शरीरात शिरला की आपलं शरीर त्याला हुसकावून लावण्यासाठी जोरदार प्रयत्न करतं. विषाणू आणि आपल्यात होणाऱ्या या लढाईत आपले सैनिक असतात ते अँटिबॉडीज. एका विशिष्ट विषाणूला मारण्यासाठी आपलं शरीर विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीज तयार करतं.

या अँटीबॉडीज आपल्या रक्तातल्या प्लाझ्मामध्ये असतात. कोव्हिडमधून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढू शकणाऱ्या अँटीबॉडीज मुबलक असतात. त्या काढून कोरोनाशी लढणाऱ्या एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या शरीरात सोडल्या तर मग त्या वृद्ध व्यक्तीचं शरीर कोरोनाशी चांगल्या पद्धतीनं दोन हात करू शकतं.

बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून प्लाझ्मा गोळा करताना त्याच्या शरीरातून काढलेल्या रक्तातून मशीनद्वारे प्लाझ्मा वेगळा केला जातो. आणि उरलेले रक्त घटक पुन्हा त्या व्यक्तीच्या शरीरात सोडले जातात.

भारतासोबतच जगातल्या अनेक देशांमध्ये सध्या प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात येतोय.

पण प्लाझ्मा दान करण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.

कोरोना व्हायरसची लागण झालेला हा रुग्ण पूर्णपणे बरा झालेला असावा. कोरोनासाठीची टेस्ट निगेटिव्ह आल्याच्या 28 दिवसांनंतर त्याला प्लाझ्मा दान करता येऊ शकतो. आणि त्यासाठी त्याच्या रक्तातल्या हिमोग्लोबिनची पातळी 12.5ग्रॅम प्रति डेसीलीटरच्या वर असायला हवी.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)