You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: स्थलांतरित मजुरांची गावी परतण्यासाठी 300 किमीची पायपीट
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी 24 मार्चला देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि त्याच रात्रीपासून शहरांमधून बाहेर पडणारे माणसांचे जत्थेच्या जत्थे दिसू लागले.
शहरांमधून जमेल तितकं सामान डोक्यावर घेऊन गावाची वाट पकडणारा हा वर्ग मजुरांचा होता. लॉकडाऊनमुळे शहरं बंद झाली, त्यामुळे हाताला काम नाही आणि पोटाचा प्रश्न तीव्र होताच. त्यामुळे गावचं घर गाठलेलं बरं, असं म्हणत ही माणसं रात्रीचा दिवस करून, अनवाणी आणि उपाशीपोटी वाट चालू लागली आहेत.
प्रत्येक जिल्ह्यांनी आणि राज्यांनी सीमा बंद केल्यानं कुणी पोलिसांच्या लाठीचा मार चुकवत पायीच जातोय, तर कुणी शक्कल लढवून पाण्याचे टँकर किंवा रुग्णवाहिकांमधून प्रवास करून आपापलं गाव गाठण्याचा प्रयत्न करतोय. ध्येय एकच - आपलं घर गाठायचं.
आणि हे दृश्य फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील प्रत्येक मोठ्या वस्तीच्या शहरात पाहायला मिळतंय. त्यामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून स्थलांतरितांचा प्रश्न अधिक तीव्र झालाय.
‘300 किमी पायपीट केली खरी, पण गावात प्रवेश मिळेल का?’
हा परतीचा प्रवास करणाऱ्या काही जणांशी बीबीसी मराठीच्या प्रतिनिधींनी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या बोलण्यात हतबलता आणि अस्वस्थता जाणवत होती.
- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?
नाशिक ते नंदुरबर असा 300 किलोमीटरची पायपीट करून घरी परतलेल्या एका मजुराशी बीबीसी मराठीच्या प्रवीण ठाकरेंनी संवाद साधला.
समोर उभ्या ठाकलेल्या जगण्याच्या अनिश्चिततेचं ओझं डोक्यावर सांभाळत तो म्हणाला, “आता पुन्हा शहरात कधीच कामाला जाणार नाही. यापुढे गावातच उदरनिर्वाह करेन.”
नाशिकमधल्या एका कारखान्यात मजूर म्हणून काम करणारे हे सात जण मूळचे अक्कलकुवा आणि अक्राणी या दुर्गम तालुक्यांमधले रहिवाशी आहेत. गावाकडे हाताला काम नसल्याने वर्षभरापूर्वीच यांनी नाशिक शहरात पाय ठेवला होता.
मात्र अवघ्या वर्षभरात आलेल्या या संकटामुळे या सातही जणांवर उपासमारीचीच वेळ ओढवली. नाशिकमध्ये पैसे नसल्याने दोन वेळच्या जेवणाची पंचायत झाली.
"आम्ही आमच्या कॉन्ट्रॅक्टरला विचारलं तर ते म्हणायचे, सध्या परिस्थितीच अशी आहे की मी पैसे देऊ नाही शकत. आम्ही एक-दोन वेळा विचारलं, पण ते नाहीच म्हणाले. आमच्याकडे पैसे नव्हते आणि खायलापण काहीही नव्हतं. म्हणून आम्ही एकच निर्णय घेतला की घरी परत जाऊ या," असं यांच्यापैकीच एक सुभाष वसावळ म्हणाले.
शहरातील दत्तमंदीर परिसरात राहणाऱ्या या मजुरांना पुढे घरभाड्याठी पैस उरले नव्हते. त्यामुळे अखेरीस घराकडे परतण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नसल्याचे या मजुरांच्या लक्षात आलं.
परतीसाठी कुठलंही साधन नसल्याने अखेर गुरुवारी पहाटे चार वाजता उठून या आदिवासी मजुरांनी नंदुरबारच्या दिशेने पायी प्रवास सुरू केला. गुरुवारी रात्री देवळा तालुक्यापर्यंतचा प्रवास करून एक बिस्कीटच्या पुड्यावर सातही मजुरांनी गुजारा करत रात्र काढली.
त्यामुळं नंदुराबारमधील या मजुरांनी दोन दिवस उपाशीपोटी पायी प्रवास केला आणि नंदुरबार गाठलं. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी करत सुटकेचा श्वास टाकला, असं त्यांनी सांगितलं.
मात्र अनिश्चितता अजून संपलेली नव्हती.
नंदुराबर शहरात तर पोहोचलेत, पण राज्यातल्या दुर्गम भागांमध्येसुद्धा गावबंदी झाल्याने गावातील इतर लोक गाव प्रवेश देतील का, हा प्रश्न आणि त्याची चिंता या तरुणांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
या सात मुजरांप्रमाणेच नाशिक, सुरत, अंकलेश्वर, बडोदा आणि अहमदाबादमधून अशाच पद्धतीने पायपीट करुन नंदुरबार गाठणाऱ्या मजुरांची संख्या दिवसेगणिक वाढतच आहे.
रोजगाराचा प्रश्न चिंतेची तलवार बनून डोक्यावर टांगती
अशी काही स्थिती मेळघाटातील आदिवासी तरुणांवर ओढवली. होळीनंतर मेळघाटातील नागरिक कामाच्या शोधात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत असतात. खरंतर हे दरवर्षी असं सुरू असतं. पण यंदा नशिबात काही वेगळंच लिहिलं होतं.
बीबीसी प्रतिनिधी नितेश राऊत यांना अमरावतीमध्ये मूळ मेळघाटातले 11 तरुण भेटले, जे कामाच्या शोधात वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर गावामध्ये होते. तेवढ्यात लॉकडाऊन जाहीर झाला नि सर्वत्र गोंधळ उडाला. बस वा रेल्वेही बंद झाल्यामुळे अखेर यांनाही आपल्या गावी पायीच निघावं लागलं.
"कर्फ्यू लागल्यामुळे आम्हाला खायला काहीच मिळालं नाही. तिथून गावाला निघायचा प्रयत्न केला, पण सर्व साधनं बंद होती. त्यामुळे आम्ही पायी निघालो," असं यांच्यापैकीच एक मुन्ना बेसेकर म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावरील थकवा स्पष्ट दिसत होता.
हे तरुण समुद्रपूरहून निघाले आणि जवळपास 150 किलोमीटरचं अंतर कापून धामणगावमध्ये रात्री थांबले. स्थानिक तहसीलदारांच्या मदतीने सामाजिक संघटनानी पुढाकार घेऊन त्यांची व्यवस्था केली खरी, मात्र रोजगाराचा प्रश्न तसाच डोक्यावर चिंतेची तलावर बनून टांगता आहे.
रुग्णवाहिकेतून प्रवास
27 मार्च रोजी कोल्हापूर पोलिसांनी किणी टोलनाक्यावर तीन रुग्णवाहिकांना अडवलं आणि त्यांची चौकशी केली, तेव्हा त्यात 24 जण सापडले.
महाराष्ट्रातून कर्नाटकच्या दिशेनं जाण्यासाठी निघालेल्या या लोकांनी पोलिसांपासून स्वतःला वाचवण्यासाठी रुग्णवाहिकेतून प्रवासाचा मार्ग अवलंबला होता. पोलिसांनी पकडलं तर काय, अगदी याचा विचार करून हे सगळेजण खोटी मलमपट्टी बांधून रुग्णवाहिकेत बसले होते.
या प्रवाशांकडून रुग्णवाहिका चालकानं प्रत्येकी पाच हजार रूपये घेतले होते, असं त्यांनी नंतर सांगितलं.
अशीच घटना वाशिममध्येही घडली. औरंगाबादहून यवतमाळच्या दिशेनं निघालेली रुग्णवाहिका पोलिसांनी अडवली तर त्यात रुग्ण नसून काही धडधाकट लोक आढळले. कामाच्या शोधात औरंगाबादला गेलेले काहीजण लॉकडाऊनमुळं अशा पद्धतीने पुन्हा त्यांच्या गावाच्या दिशेनं निघाले होते.
कुलूपबंद कंटेनरमधून जवळपास 300 जणांचा प्रवास
तर यवतमाळमध्ये नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांनी एका कुलूपबंद कंटेनरला थांबवलं. अशा कंटेनरमधून जनावरांची तस्करी केली जाते, हे माहिती असल्यामुळे पोलिसांनी जरा संशय आला.
पोलिसांनी कंटेनरचं कुलूप उघडण्यास सांगितलं तर आतलं दृश्य भयावह होतं. कुलूपबंद कंटेनरमध्ये जवळपास 300 जणांना कोंबून भरलं होतं! तेलंगणातून महाराष्ट्राच्या दिशेनं हा कंटेनर निघाला होता.
"जीवनावश्यक वस्तूंची वाहने, टँकर्स, कंटेनरमधून लोकांची वाहतूक होणार नाही याची दक्षता घ्या. एखादा अपघात घडल्यास दुर्दैवी प्रसंग ओढवू शकतो," असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पोलिसांना दिले आहेत.
राज्याअंतर्गत स्थलांतरही वाढलं
अमरावतीत अशाच 70 ते 80 जणांना पोलिसांनी पकडलंय. राजस्थानहून महाराष्ट्रात लाकडी फर्निचरच्या कामासाठी आलेल्या 70 ते 80 कारागीरांना मोर्शी तालुक्यातील शिरखेड पोलीस स्टेशनअंतर्गत पकडण्यात आलंय. हे सर्व कारागीर एका ट्रकमध्ये बसून राजस्थानच्या दिशेनं जात होतं.
ट्रकचा चालक-मालक पताराम केसाराराम चौधरी हा मूळचा जोधपूरमधील शेरगढचा. त्याच्याशी बोलल्यावर कळलं की, ओरिसा ते महाराष्ट्र दरम्यान विखुरलेल्या कारागीरांना तो आपल्या गावी राजस्थानला घेऊन जात होता.
आणि हे केवळ महाराष्ट्रातच घडतंय असं नव्हे. देशातील प्रत्येक राज्यात, कुणी कामानिमित्त तर कुणी वाहतूक क्षेत्रात काम करत असल्यानं, वेगवेगळ्या राज्यात अडकून पडलाय. ज्याला-त्याला आपापल्या गावापर्यंत-घरापर्यंत पोहोचयाचंय.
दिल्ली, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक... देशातलं एकही राज्य असं नाही जिथं वेगवेगळ्या राज्यातील कामगार, मजूर, कारागीर नाहीत. या सगळ्यांचं पोट दिवसाच्या मेहनतीवर अवलंबून असतं. मात्र लॉकडाऊनमुळं सर्वकाही बंद असल्यानं रोजच्या जगण्याची तारांबळ झालीय.
दुसऱ्या राज्यात अडकून राहण्यापेक्षा आपल्या गावी गेलेलं बरं, असं म्हणत अनेकजण शेकडो किलोमीटरची पायपीट करण्यासही तयार आहेत. तेही उपाशीपोटी.
सरकारकडून स्थलांतरितांची दखल
सोशल मीडिया आणि विविध माध्यमांनी रस्त्यांवर रांगेत जाणाऱ्या लोकांची दृश्यं प्रसारित केल्यानंतर विविध सरकारांनीही या मजूर आणि स्थलांतरितांची दखल घेतल्याचं दिसतंय.
देशातील सर्व रस्त्यांवरील टोलनाक्यांवर स्थलांतरितांसाठी राहण्याखाण्याची व्यवस्था करावी, आणि या लोकांना त्यांच्या-त्यांच्या ठिकाणी पोहोचवण्याची व्यवस्थाही करावी, असे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही इतर राज्यांमधील कामगारांची राज्यात काळजी घेतली जाईल, असं आश्वासन दिलंय.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विभागीय आयुक्तांना उद्देशून पत्रक जारी केलंय आणि नागरिकांचे स्थलांतर थांबवण्याचे आदेश दिलेत.
“करोना संक्रमण थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच राज्यातून इतरत्र स्थलांतर करत असलेल्या लोकांना ते जेथे असतील तेथे थांबवण्यासाठी पावलं उचलण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना द्यावे,” अशी सूचना राज्यपालांनी विभागीय आयुक्तांना केली आहे.
स्थलांतरितांना थांबवण्यासाठी किंवा त्यांना आपापल्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होतीलही. आणि ते गरजेचंही आहे, कारण परदेशातून आलेला हा रोग आता महाराष्ट्राच्या मोठ्या शहरांमध्ये आणि नंतर छोट्या शहरांमध्ये आपले पाय पसरतोय.
त्यातच या शहरांमधून लोक गावांमध्ये परतले तर हा आजार ग्रामीण भागांमध्ये पसरण्याची भीती आहे, म्हणूनच जिल्ह्यांच्या, गावांच्या सीमा बंद केल्या जात आहेत.
केंद्र सरकारने या वर्गासाठी विशेष पॅकेजची घोषणा केली आहे, आणि गरजूंच्या खात्यांमध्ये पैसे थेट ट्रान्सफर केले जातील, असंही सांगण्यात आलं आहे. मात्र रोजच्या कामावर पोट असलेल्या अशा कामगारांचं काय, त्यांच्या जगण्याचा प्रश्न कसा सोडवला जाईल, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)