You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लॉकडाऊन: बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांसमोर काय आहेत अडचणी?
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठीसाठी
"मेलो तरी पर्वा नाही पण कुटुंबाला वार्यावर सोडू नका," एका मुंबई पोलीस कर्मचार्याच्या तोंडचं हे वाक्य. त्यांनी त्यांच्या मनातले विचार लिहून काही पोलिसांना व्हॉट्सअॅपवर पाठवले होते.
ते लिहितात :
"कोरोनाच्या संकटात कर्तव्य बजावताना कसलाच विचार मनी नव्हता. डोक्यात अन् डोळ्यांदेखत केवळ खाकी अन् कर्तव्य ठेवून रोज घराबाहेर पडत होतो. एवढ्या दिवस काही वाटलं नाही, पण काल आणि आज कोरोनामुळे दोन सहकारी साथ सोडून गेले... अन् मनात विचारांचा घालमेल सुरू झाला.
डोळ्यांसमोर आईवडिलांचा, बायकापोरांचा चेहरा दिसू लागला. मात्र स्वत:च्याच मनाची समजूत काढू लागलो. खरं पाहता कोणतेही युद्ध सहज जिंकता येत नाही. युद्धात प्राणाची आहुती द्यावी लागते. हे सत्य नाकारून चालणार नाही.
दोन सहकारी गेले. भीती वाटत नाही. तरीही खंबीरपणे कर्तव्य बजावत आहोत. फक्त एकच सांगणे, कोरोना संकटात कर्तव्य बजावताना मृत्यूच्या खुशीत गेलो तरी परवा नाही. परंतु आमच्या मागे कुटुंबीयाला वाऱ्यावर सोडू नका. पैशांपुढे मनुष्याच्या जिवाची काय किंमत?
पण आमच्या पगारामुळे संसाराचा गाडा सुरळीत चालू आहे. आमचं बरंवाईट झालं तर कुटुंबीयांवर दुहेरी संकट कोसळेल. एकतर आमच्या नसल्यामुळे तर दुसरे आर्थिक संकटामुळे कुटुंब हादरून जाईल."
ही भीती फक्त या एका पोलीस कर्मचार्याच्या मनातली नाही तर असंख्य पोलीसांना वाटते. पण कोणीही समोर येऊन बोलू शकत नाहीये.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
कोरोनाच्या संकटात रात्रंदिवस लोकांसाठी काम करणाऱ्या पोलीसांभोवतीच आता कोरोनाचा विळखा आवलला जात आहे. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 107 पोलीसांना कोव्हिड-19ची लागण झाली आहे.
मुंबई, पुणे, ठाणे, मुंब्रामधले हे पोलीस आहेत.
गेल्या दोन दिवसांत दोन पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला. 107 पोलिसांपैकी 7 जण पूर्णपणे बरे झाले आहेत, तर 98 जण उपचार घेत आहेत. पण पोलीस जसे तत्परतेने जीव धोक्यात घालून काम करतायत, तीच तत्परता ते आजारी पडल्यावर प्रशासन दाखवतंय का? लॉकडाऊनच्या या काळात पोलिसांच्या समस्या-व्यथा काय आहेत?
एका पोलिसानं नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांना सामोरं जावं लागणाऱ्या अडचणींबद्दल सांगितलं.
उपचारांसाठीची कसरत...
वडाळ्याचा बरकत अली भाग... एका ट्राफिक पोलीस शिपायाला ड्युटी करत असताना अस्वस्थ वाटू लागल्याने ते पोलीस हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांच्यावर उपचार सुरू केले. पण नंतर त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं दिसू लागली. त्यांना तातडीने केईएम रुग्णालयात जाण्यास सांगितलं.
केईएममध्ये तपासणी केल्यावर त्यांना डॉक्टरांनी कस्तुरबा रुग्णालयात जाण्यास सांगितलं. पण त्यांच्या अस्वस्थ प्रकृतीमुळे त्यांना एकट्याला केईएम ते कस्तुरबा जाणं शक्य होत नव्हतं. त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाकडे अॅम्ब्युलन्सची मागणी केली.
पण हॉस्पिटलबाहेर उभ्या असलेल्या चार अॅम्ब्युलन्सपैकी एकही अॅम्ब्युलन्स मिळाली नाही. प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांसाठीच या अॅम्ब्युलन्स आहेत, त्यामुळे आम्ही त्या देऊ शकत नाही, असं उत्तर त्यांना हॉस्पिटल प्रशासनाने दिल्याचं ते सांगतात.
या सगळ्या प्रकारानंतर त्यांनी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेशी संपर्क साधला आणि प्रसारमाध्यमांची मदत घेऊन अॅम्ब्युलन्स मिळवली.
"हा पोलीस कर्मचारी ज्या ठिकाणी काम करतो तो वडाळ्याचा भाग हाय अलर्टवर असतानाही आम्ही जनतेसाठी 24-24 तास काम करतो. पण आम्हाला काही झालं तर अशी वागणूक मिळते," ही खंत पोलीस कर्मचाऱ्याने व्यक्त केली आहे.
सध्या या पोलीस शिपायांवर उपचार सुरू आहेत.
पोलीस उपनिरीक्षकाची उपचारांसाठी फरपट
पुण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करणार्या व्यक्तीलाही उपचारासाठी धावाधाव करावी लागते.
आम्ही त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क केला, तेव्हा त्यांनी सांगितलं, "24 एप्रिलला सकाळी मामांची तब्येत खूप बिघडली. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून त्यांना पुण्याच्या केईएम हॉस्पिटलमध्ये आणलं. डॉक्टरांनी तपासलं पण बेड खाली नाही म्हणून दुसरीकडे घेऊन जा असं सांगितलं. कुठे न्यावं, काय करावं काहीच कळत नव्हतं."
"आम्ही मुंबईत असल्याने फोन करून शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांना ऑक्सिजनची गरज होती. हॉस्पिटल अॅम्ब्युलन्स देत नव्हतं. माझ्या भावाने तीन-चार हॉस्पिटलमध्ये चौकशी केली कुठेच बेड रिकामे नव्हते.
"मग मी माझ्या पत्रकार मित्राची मदत घेतली. त्याने सहाय्यक पोलीस आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना मदतीसाठी फोन केला. मग पोलिसांची टीम आली. त्यांनी भारती हॉस्पिटलमध्ये मामांना हलवण्यास मदत केली."
"डॉक्टरांनी मामांना तातडीने म्हणजे अर्ध्या तासात दुसर्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यास सांगितलं होतं. दुपारी 12 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत ते पुण्याच्या केईएम हॉस्पिटलमध्येच अॅम्ब्युलन्सची वाट बघत होतो. आता ते पुण्याच्या भारती हॉस्पिटलमध्ये उपचार घेतायत."
"पोलीस दिवस रात्र काम करतायत. माझे मामा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहेत. पण त्यांची ही अवस्था असेल तर सामान्य माणसांच काय होत असेल. पोलीस जीव ओतून काम करतात. सर्वांना मदत करतात पण त्यांना गरज असेल तेव्हा कोणीच त्यांचा विचार करत नाही. त्यांना अॅम्ब्युलन्स मिळवण्यासाठी 4 तास लागतात यापेक्षा वाईट परिस्थिती काय असू शकेल."
'कधी उपाशीच ड्युटी करावी लागते'
"सध्या पोलिसांना 12 तास दिवस रात्र ड्युटी करावी लागते. रात्रीची ड्युटी असताना डबा घेऊन यावा लागतो, पण तरी भूक लागते. बाहेर असताना खाण्यासाठी काहीच मिळतं नाही. मग उपाशीच राहावं लागतं," अशा अनेक पोलिसांच्या अडचणी असल्याचं महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुभाले सांगतात.
त्याचबरोबर पोलीस बाहेर काम करत असताना बाहेर व्यवस्था असेल तर चांगलं होईल, पण घरी आल्यावर कुटुंबाची काळजी वाटते. अनेक पोलीसांमुळे त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकतर त्यांच्या कुटुंबीयांना गावी जाण्याची परवानगी द्यावी किंवा पोलीसांची बाहेर व्यवस्था करावी अशी मागणी राहुल दुभाले यांनी केलीये.
पोलिसांसाठी कोरोना विशेष कक्ष आणि हॉस्पिटल राखीव
दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लोकांची संवाद साधला.
त्यांनी म्हटलं, "कोरोना प्रादूर्भावामुळे राज्यातील दोन पोलीस बांधवांचा मृत्यू झाला, ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्र शासन त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. दोघांच्याही कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत आणि योग्य ती शासकीय नोकरी, तसंच नियमानुसार मिळणारी मदत दिली जाईल," असं त्यांनी सांगितलं.
"कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सुरू असलेल्या लढाईमध्ये आपले पोलीस दल अत्यंत कठीण अशा परिस्थितीत काम करत आहे. पोलीसांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे," असं सांगत प्रकृतीची कोणतीही तक्रार असलेल्या पोलीसाला तातडीने उपचार मिळावेत याकरिता एक स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष निर्माण करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबईसाठी सहपोलीस आयुक्त नवल बजाज तर महाराष्ट्रासाठी अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसं जिल्हा स्तरावर देखील संबंधित पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक हे अशा प्रकारचे कक्ष निर्माण करतील. तसंच मुंबईमध्ये दोन हॉस्पिटल हे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)