You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस: भारतीय औषधी कंपन्यांची भूमिका अशी ठरणार मोलाची
- Author, सौतिक बिश्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा बीमोड करण्यासाठी लस तयार होणं महत्त्वाचं आहे. भारत आणि अमेरिकेची अशा लसीच्या निर्मितीत भूमिका मोलाची आहे, असं अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पाँपेओ यांनी म्हटलं आहे.
माईक यांचे उद्गार आश्चर्यकारक वाटायला नको. गेल्या तीन दशकांपासून विविध आजारांवर लस शोधून काढण्यासाठी दोन्ही देशांचे संयुक्त उपक्रम आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू आहेत.
डेंग्यू, टीबी, हिवतापासारख्या आजारांवर अशाच प्रयत्नांमधून लस शोधून काढली आहे. तर कोरोना व्हायरसवरील लसीची चाचणी लवकरच सुरू होते आहे.
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
औषध निर्मितीत जगातल्या सर्वाधिक उत्पादक देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो. जगातले 5-6 मोठे औषधी आणि लस बनवणारे निर्माते भारतात आहेत. पोलिओ, मेनिन्जायटीस, न्युमोनिया, रोटाव्हायरस, रुबेला अशा अनेक आजारांवर भारतात लस तयार केली जाते.
सध्याच्या कोव्हिड-19 या आजारावरही अर्धा डझन भारतीय कंपन्या लस शोधण्याचं काम करत आहेत.
यापैकीच एक आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. ही कंपनी लस निर्मिती आणि विक्रीच्या बाबतीत जगातली सगळ्यांत मोठी कंपनी आहे. 53 वर्षांपासून ही कंपनी कार्यरत आहे. पुण्यात या कंपनीच्या दोन केंद्रांमध्ये दरवर्षी 1.5 अब्ज लसींचे डोस तयार होतात.
याशिवाय, या कंपनीचे दोन अन्य प्लाँट्स नेदरलँड्स आणि चेक रिपब्लिक इथे आहेत. एकूण या कंपनीत साधारण 7,000 माणसं काम करतात.
या कंपनीतर्फे 165 देशांना वीसहून अधिक प्रकारच्या लसींचा पुरवठा केला जातो. सुमारे 40 रुपयाला ही एक लस असते आणि अशा 80 टक्के लस निर्यात केल्या जातात.
तर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आता अमेरिकेतल्या कोडाजेनिक्स कंपनीशी टाय अप केलं असून, ते कोरोनावरच्या लसीवर काम करत आहेत. कोरोनाग्रस्तांच्या शरीरातील पेशी वापरून त्या विषाणूंपासून लस बनवण्याचे असे अनेक प्रयत्न जगभरात सुरू आहेत.
आम्ही लवकरच प्राण्यांवर याची चाचणी सुरू करू. सप्टेंबरपासून माणसांवर या लसीचे प्रयोग सुरू होतील, असं सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सांगितलं.
घाऊक प्रमाणावर लसीची निर्मिती करण्यासाठी पूनावाला यांच्या कंपनीने ऑक्सफर्ड विद्यापीठाशी टाय-अप केलं आहे. युके सरकारनेही या संयुक्त उपक्रमाला मदतीचा हात देऊ केला आहे.
नव्या लसीकरिता जनुकीयदृष्ट्या निर्मित चिंपाझी व्हायरस मूळ असेल. गेल्या आठवड्यात ऑक्सफर्ड इथं मानवी चाचण्यांना सुरुवात झाली. सगळं काही शिस्तबद्ध पद्धतीने घडून आलं तर सप्टेंबरपासून या लसीचे दशलक्ष डोस तयार केले जातील.
जगाला या लशीचे अब्जावधी डोस लागतील. पॅन्डेमिक म्हणजेच जागतिक आरोग्य संकट म्हणून जाहीर झालेल्या कोव्हिड-19 या रोगाला रोखण्यासाठी प्रचंड प्रमाणावर लसीची निर्मिती करावी लागेल, असं ऑक्सफर्ड विद्यापीठातील जेनर इन्स्टिट्यूटच्या संचालक प्रा. अड्रियन हिल यांनी बीबीसीचे आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी जेम्स गॅलाघर यांना सांगितलं.
पूनावाला यांची कंपनी 40 ते 50 कोटी लशीचे डोस तयार करू शकते. "आमची लस तयार करण्याची क्षमता प्रचंड आहे, आम्ही त्यासाठी गुंतवणूक केली आहे," असं पुनावाला यांनी स्पष्ट केलं.
हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीने विसकॉन्सिन विद्यापीठ आणि अमेरिकास्थित फ्ल्यूगेन यांच्या सहकार्याने काम करणार असल्याचं जाहीर केलं आहे. 30 कोटी लसीचे डोस तयार करून जगात त्याचं वितरण केलं जाईल.
झायडस कॅडिला ही कंपनीसुद्धा दोन लसीवर काम करत आहे. बायॉलॉजिकल-ई आणि म्याइनव्हॅक्स लशीसाठी प्रयत्न करत आहे. आणखी चार ते पाच कंपन्या लस तयार करण्याच्या प्रक्रियेत गुंतल्या आहेत.
घाऊक प्रमाणात लस तयार होऊ शकेल, यावर विश्वास ठेऊन गुंतवणूक करणारे उद्योजक तसंच फार्मा कंपन्या यांना श्रेय द्यायला हवं. जगातल्या लोकांचं भलं व्हावं असं या कंपनीच्या मालकांसमोरच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक आहे. त्याचवेळी घाऊक प्रमाणात परिणामकारक लस बनवून त्यांना व्यवसायही करायचा आहे. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत सर्वांचंच भलं होणार, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितलं.
मात्र झटपट ही लस बाजारात येईल अशा भ्रमात राहू नका, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
जगभरातल्या माणसांना नजीकच्या भविष्यात तरी कोरोनाच्या धोक्यासह जगावं लागेल. कारण हमखास परिणामकारक ठरेल अशी लस तयार होण्याची शाश्वती नाही, असं लंडनमधील इम्पिरिअल कॉलेजात जागतिक आरोग्य या विषयाचे प्राध्यापक डेव्हिड नबारो यांनी सांगितलं.
कोरोनावर जी लस तयार होईल त्यातून रोगप्रतिकारक क्षमताही कमी होण्याची शक्यता आहे.
कोरोनाचे जगभरात आता तीस लाखांच्या आसपास रुग्ण झाले आहेत तर 206,000 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जवळपास संपूर्ण जगाला व्यापणाऱ्या या आजारावर घाऊक प्रमाणात लस निर्मिती करणं वेळखाऊ प्रक्रिया असणार आहे.
लस निर्माण करण्यापूर्वी रासायनिकदृष्ट्या आणि जैविकदृष्ट्या त्याची प्रत्येक तपासणी आवश्यक आहे. आम्हाला खात्री आहे की सुरक्षित अशी लस दोन वर्षात तयार होईल असं पुनावाला यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)