कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवायला काय करावं, काय करू नये?

    • Author, जारिया गोवेट
    • Role, बीबीसी फ्युचर

कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कसा टाळायचा याबद्दल अनेक सूचना केल्या जात आहेत. रोगप्रतिकारक्षमता टिकविण्यासाठी प्रयत्न करणे, हे या काळात महत्त्वाचं समजलं जात आहे. म्हणूनच प्रतिकारक्षमता वाढवण्याचे उपाय वेगवेगळ्या माध्यमांमधून आणि सोशल मीडियावरून सुचवले जात आहेत.

अर्थात हे काही पहिल्यांदाच घडत नाहीये. जेव्हा अशा साथी किंवा आरोग्य संकटं येतात, तेव्हा अशा गोष्टीही दिसून येतात. 1918 साली जेव्हा स्पॅनिश फ्लू आला होता तेव्हासुद्धा अशाचप्रकारच्या घटना, चर्चा होत होत्या. आणि आता 2020मध्येही तेच दिसून येत आहे.

पण हो, या शंभर वर्षांमध्ये वैद्यकशास्त्रात माणसानं मोठी प्रगती मात्र केलीय हे नक्की.

सध्या सोशल मीडियावर एक अफवा पसरवली जात आहे, की अनेकदा हस्तमैथुन केल्याने रक्ताच्या पेशींमध्ये वाढ होते. व्हिटॅमिन-C असलेली फळं भरपूर खा, प्रोबायोटिक्स घ्या, असेही सल्ले तर तुम्हीही ऐकले असतीच. तर काही लोकांनी ग्रीन-टी आणि लाल मिरची खाल्ल्यास कोव्हिड-19पासून रक्षण होतं, असं सांगायला सुरुवात केली आहे.

सुपरफूड हे बाजारपेठेनं तयार केलेलं आभासी मिथक आहे, असं संशोधक सांगतात. या पदार्थांनी प्रतिकारक्षमता वाढते असा कोणताही पुरावा संशोधनातून मिळालेला नाही.

आपल्या प्रतिकारक्षमतेमध्ये त्वचा, श्वसन मार्ग आणि म्युकस मेंब्रेन या तिघांची महत्त्वाची भूमिका असते, असं येल विद्यापीठामधील इम्युनोलॉजिस्ट अकीको इवासाकी सांगतात. "कोणत्याही प्रकारचा संसर्ग रोखण्यासाठी या तीन घटकांची मदत आपल्या शरीराला होत असते. जर एखादा विषाणू या तीन अडथळ्यांना किंवा संरक्षकांना भेदून आत घुसला तर आतल्या कोशिकांमधली सतर्कता वाढते. त्यातली हालचाल वाढते आणि त्या विषाणूशी लढाई सुरू करतात."

आता ही लढाई इथंच थांबली नाही तर अडॉप्टिव्ह इम्यून सिस्टिमची फौज लढाईत उतरवली जाते. अडॉप्टिव्ह इम्यून सिस्टिम काही विशिष्ट प्रकारच्या विषाणूंविरोधातच लढू शकते.

यामध्ये कोशिकांबरोबर प्रथीन पेशी, आणि प्रतिजैविकं सहभागी झालेली असतात. एखाद्या रोगाविरोधात प्रतिकार क्षमता तयार होण्यासाठी काही दिवसांपासून एका आठवड्यापर्यंत वेळ लागू शकतो.

थोडासा खोकला, सर्दी, ताप, डोकेदुखी याची लक्षणं काही कोणत्या विषाणूमुळे दिसत नाहीत. खरंतर हे सर्व प्रकार आपल्या प्रतिकारक्षमतेचे एक भाग आहेत. ती आपल्याला जन्मतःच मिळालेली असते.

कफातून बॅक्टेरिया बाहेर काढण्यासाठी मदत होते. विषाणू वाढू नये यासाठी ताप एक विशिष्ट परिस्थिती शरीरात तयार करतो. अशा स्थितीत एखाद्याने प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी तत्सम पदार्थांचं सेवन केलं तरी त्याला वास्तवात काही फायदा होणार नसतो.

काही लोक मल्टिव्हिटॅमिनच्या गोळ्या प्रतिकारक्षमता वाढावी म्हणून घेत असतात. पण ज्यांचं आरोग्य चांगलं आहे, अशा लोकांना त्याची गरज नाही, असं संशोधनातून स्पष्ट झालंय.

अतिरिक्त सप्लिमेंट घेण्याची सवय फक्त सामान्य माणसांनाच असते, असं नाही तर शिकले-सवरलेले लोकही या जाळ्यात अडकतात.

उदाहरण म्हणून, आपण नोबेल विजेते लायन्स पॉलिंग यांच्या अनुभवाकडे पाहू. ते पडसं होऊ नये म्हणून दररोज 18 हजार मिलीग्रॅम व्हिटॅमिन-C घेऊ लागले होते. हे प्रमाण गरजेपेक्षा 300 पट जास्त होतं. क जीवनसत्वाची पडशाविरोधात फारच थोडी मदत होते.

या सगळ्याभोवती बाजारपेठेनं एक मायाजाल पसरवलेलं दिसून येतं. विकसित देशांमध्ये जे लोक संतुलित आहार घेतात त्यांना आपल्या आहारातूनच शरीराला आवश्यक असणारं क जीवनसत्व मिळतं असं जाणकार सांगतात. तसेच व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात घेतल्यामुळे मूत्रपिंडात खडे होण्याची (किडनीस्टोन) शक्यता जास्त असते.

जोपर्यंत शरीरातलं व्हिटॅमिन-Cचं प्रमाण कमी होत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं सप्लिमेंट (पूरक औषध, खाद्य) घेणं हानिकारक ठरू शकतं, असं तज्ज्ञ सांगतात. फक्त व्हिटॅमिन-Dचं सप्लिमेंट फायदेशीर ठरू शकतं.

व्हिटॅमिन-Dचं प्रमाण कमी होण्यामुळे श्वसनासंबंधी रोग होण्याची शक्यता वाढते, असं अभ्यासातून दिसून आल्याचं अकीका इवासाकी सांगतात. तसेच त्याचं प्रमाण कमी झाल्यानं ऑटोइम्युनवाले (स्वयंप्रतिकारक) आजारही होऊ शकतात.

आता व्हिटॅमिन-D कमी असणं ही समस्या काही फक्त गरीब देशांमध्ये नाही तर चांगल्या श्रीमंत देशांतही ही एक गंभीर समस्या बनलेली आहे. एका अभ्यासात जगभरात 2012 पर्यंत एक अब्ज लोकांमध्ये व्हिटॅमिन-D कमी असल्याचं लक्षात आलं होतं. जे लोक सूर्यकिरणांपासून वाचून घरांमध्ये आत राहतात, त्यांना व्हिटॅमिन-Dची कमतरता जाणवते.

हस्तमैथुनामुळे तर कित्येक शतकांपासून समाजात गैरसमजुती पसरलेल्या आहेत. हस्तमैथुनाला अनेक आजारांचं मूळ मानलं जात होतं, परंतु आधुनिक अभ्यासात त्याचे आरोग्याच्यादृष्टीने काही फायदे असल्याचं दिसून आलं आहे.

परंतु त्यामुळे कोव्हिड-19 पासून आपलं रक्षण होतं, हे अगदी खोटं आहे. याचप्रकारे अँटीऑक्सिडंट्ससुद्धा खाण्याची गरज नाही.

शरीरातले विषारी पदार्थ बाहेर काढण्याचं काम पांढऱ्या पेशी करत असतात. त्या दुधारी तलवारीसारख्या काम करत असतात.

एका बाजूला त्या शरीरात एखादा बॅक्टेरिया किंवा व्हायरस वाढू नये यासाठी काम करतात आणि दुसऱ्या बाजूला त्या निरोगी कोशिकाही संपवत असतात आणि रोगप्रतिकारक्षमताही कमी होत असते. त्यामुळेच सर्व कोशिकांचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्या सुरक्षित राहाव्यात यासाठी अँटिऑक्सिडंटची गरज असते.

ही अँटीऑक्सिडंटंस फळांमधून आणि भाज्यांमधून विपुल प्रमाणात आपल्याला मिळतात. रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी अँटिऑक्सिडंट्स कितपत उपयोगी आहेत याचा अभ्यास सुरू आहे. मात्र संशोधनातून अद्याप कोणतंही अनुमान निघालेलं नाहीये.

काही बॅक्टेरिया आपल्या शरीराचे मित्रही असतात. आपल्या आरोग्यासाठी त्यांची फार गरज असते. कधीकधी या बॅक्टेरियाचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे प्रोबायोटिक्सची सप्लिमेंट्स घ्यावी लागतात.

काही वेबसाईटवर ही प्रोबायोटिक्स कोव्हिड-19 विरोधात लढण्यासाठी उपयोगी पडतात असा दावा केला जात आहे. मात्र हे सर्व दावे खोटे आहेत. या दाव्यांबाबत अद्याप संशोधनातून भक्कम पुरावे मिळालेले नाहीत.

आता शेवटी कोव्हिड-19 पासून संरक्षण कसं करायचं हा प्रश्न उरतोच. सध्या तरी जितकं होऊ शकेल तितकं सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळणं, स्वच्छता ठेवणं, याकडे आपण लक्ष द्यायला हवं.

संतुलित आहार घ्या, नियमित व्यायम करा. एखाद्या वेलनेस एक्स्पर्टच्या बोलण्याला भुलून स्वतःच डॉक्टर होण्याचा मोह टाळा. काही त्रास होऊ लागला तर तात्काळ डॉक्टरांची मदत घ्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)