कोरोना रुग्णांवर इलाज करणाऱ्या या डॉक्टरला रडू का कोसळलं?

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

"मला इतकं असहाय्य आणि लाचार कधीच जाणवलं नाही. म्हणून तुमच्याशी काही गोष्टी बोलाव्याशा वाटल्या. जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहिलात, तर माझ्या मनाला शांती मिळेल."

हे आर्त आवाहन आहे लोकांचे प्राण वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या एका डॉक्टरचं. कोरोनाविरोधात लढणाऱ्या कोव्हिड योद्ध्याचं.

मुंबईतील संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. तृप्ती गिलाडा-बेहेती यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीपाहून आलेले विचार एका व्हीडिओच्या माध्यमातून मांडले आहेत.

मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोट्यावधी लोकांच्या या स्वप्ननगरीत, अॅम्ब्युलन्सच्या सायरनचे आवाज दिवसरात्र घूमू लागले आहेत. कोरोनाने हळूहळू आपला विळखा घट्ट केलाय.

दररोज डोळ्यादेखत होणारे मृत्यू, जीवाच्या आकांताने तडफडणारे रुग्ण पाहून आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये आजारासमोर निराशेची भावना निर्माण होऊ लागली आहे.

मुंबईतील हाताबाहेर जाणारी परिस्थिती, डॉ. तृप्ती त्यांनी एका व्हीडिओच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय.

त्या म्हणतात, "मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. रुग्णालयात ICU बेड्स वेटिंगवर आहेत. ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांवर घरीच उपचार करावे लागत आहे. हे चित्र भयावह आहे."

ही भयावह परिस्थिती मांडताना डॉ. तृप्ती यांनी आपल्या भावनांना अश्रूंच्या स्वरूपात वाट मोकळी करून दिली.

पाणावलेल्या डोळ्यांनी डॉ. तृप्ती विनंती करताना म्हणतात, "कृपा करून सुरक्षित रहा. एकवर्ष तुम्हाला कोरोना संसर्ग झाला नाही. म्हणजे, स्वत:ला सुपरहीरो समजू नका. तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. काहीच होणार नाही. या फाजील आत्मविश्वासात राहू नका."

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईत युवा वर्गात मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरल्याचं पहायला मिळतंय.

आपला अनुभव लोकांसोबत शेअर करताना डॉ. तृप्ती म्हणतात, "आमच्याकडे एक 35 वर्षांचा मुलगा व्हॅन्टिलेटरवर आहे. आता लोकांना आम्ही मदत करू शकत नाहीये. तुमच्यापैकी कोणावर ही पाळी येऊ नये. एवढीच अपेक्षा आहे."

"प्रत्येक डॉक्टर या भावनिक अनुभवातून जातोय. याचं कारण आम्ही इतके लाचार कधीच नव्हतो. कोव्हिड तुमच्या आसपास प्रत्येक ठिकाणी आहे. त्यामुळे काळजी घ्या," असं आवाहन डॉ. तृप्ती मुंबईकरांना करतात.

त्या पुढे म्हणतात, "घरातून बाहेर पडताना मास्क घाला. संसर्ग झाला नाही किंवा होऊन गेला म्हणजे पुन्हा होणार नाही असं नाही. त्यामुळे नाक आणि तोंड मास्कने पूर्ण झाकून घ्या."

देशात पसरलेला डबल म्युटंट रोगप्रतिकारशक्तीला चकवणारा असल्याने, संसर्ग झपाट्याने पसरतोय.

मुंबईकरांना डॉ. तृप्ती सांगतात, "तुमचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांना घाबरून रुग्णालयात दाखल होण्यास सांगू नका. बऱ्याच रुग्णालयात स्थिर प्रकृती असलेले रुग्ण दाखल होत आहेत. ज्यांना खरंच ऑक्सिजन बेड्सची गरज आहे त्यांच्यासाठी बेड्स नाहीत. त्यामुळे रुग्णांना घरीच ऑक्सिजन देऊन उपचार करतोय."

"त्यामुळे ऑक्सिजनची गरज, न्यूमोनिया असणाऱ्या रुग्णांना बेड्सची खरी गरज आहे. त्यांच्यासाठी बेड्स ठेवा," असं त्या म्हणतात.

कोरोनाविरोधी लशींबाबत अनेकांच्या मनात अजूनही प्रश्नचिन्ह आहेत. सोशल मीडियावर चुकीची माहिती वाचून लोक पुढे येत नाहीत, तर काहींच्या मनात लशीमुळे होणाऱ्या साइट इफेक्टची शंका आहे.

त्यांना उद्देशून डॉ. तृप्ती सांगतात, "कृपा करून लस घ्या. ज्या लोकांनी लशीचे दोन्ही डोस घेतलेत. त्यांना कोरोना संसर्गाचा गंभीर आजार होण्याचं प्रमाण कमी दिसून येत आहे. या लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासत नाही. लस खूप फायदेशीर आहे."

"कोरोनाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. स्वतःची काळजी घ्या. परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत काही आठवड्यांसाठी अजिबात बाहेर पडू नका. सध्या डॉक्टर आणि त्यांच्या नातेवाईकांना बेड्स मिळत नाहीयेत. या गोष्टी पाळल्या तर आपण दुसली लाट थोपवू शकतो," असं डॉ. तृप्ती म्हणतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)