IRCTC बुकिंग : रेल्वेने प्रवास करायचाय मग हे नियम माहीत असणं आवश्यक आहे

    • Author, सरोज सिंह
    • Role, बीबीसी हिंदी, नवी दिल्ली

आता महाराष्ट्रात रेल्वे प्रवासाला देखील मुभा देण्यात आली आहे. मध्य रेल्वेने एका पत्रक प्रसिद्ध करून त्याची माहिती दिली आहे. त्यानुसार 2 सप्टेंबरपासून लोकांना राज्यांतर्गत रेल्वे प्रवासासाठी बुकींग करता येणार आहे. त्यामुळे आता लोकांना राज्यांतर्गत रेल्वेनं प्रवास करता येणार आहे.

भारतीय रेल्वेवर सध्या 200 स्पेशल गाड्या धावत आहेत. या गाड्यांचं बुकिंग आता राज्यातल्या अंतर्गत प्रवासासाठी करता येणार आहे.

या गाड्यांचं करता येणार बुकिंग

सीएसटी ते वाराणसी

लोकमान्य टिळक टर्मिनन्स ते वाराणसी

लोकमान्य टिळक टर्मिनन्स ते गोरखपूर

लोकमान्य टिळक टर्मिनन्स ते दरभंगा

लोकमान्य टिळक टर्मिनन्स ते पाटणा

सीएसटी ते लखनऊ

लोकमान्य टिळक टर्मिनन्स ते पाटलीपुत्र

सीएसटी ते भुवनेश्वर

सीएसटी ते बेंगलुरू

सीएसटी ते हैदराबाद

सीएसटी ते हावडा

सीएसटी ते गदक

लोकमान्य टिळक टर्मिनन्स ते तिरूवअनंतपुरम्

12 मे पासून सरकारनं देशात रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. देशात लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वीच पॅसेंजर ट्रेन बंद करण्यात आल्या होत्या.

रेल्वे मंत्रालयानुसार, या सर्व 15 ट्रेन्समध्ये राजधानी सारखे एसी कोच असतील. नवी दिल्लीपासून पाटणा, रांची, हावडा, दिब्रूगढ, आगरतळा, बिलासपूर, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, थिरुअनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तावी पर्यंत प्रवास करतील.

या ट्रेनचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

ट्रेनमधील भाडे

मंगळवारपासून धावणाऱ्या या ट्रेन्ससाठी मंत्रालयानं रेल्वेचा मार्ग, तिकीट शुल्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांविषयी एक पत्रक जारी केलं आहे.

IRCTCचे मुख्य व्यवस्थापकीय संचायलक एम.पी.मल यांनी बीबीसीला याविषयी सांगितलं, या 15 ट्रेन्स राजधानी असतील आणि या मार्गांवर पहिले जितकं तिकीट शुल्क भरावं लागत असे, तितकचं शुल्क आता आकारलं जाईल. पण, केटरिंगसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत.

लॉकडाऊनपूर्वी राजधानी ट्रेन्समध्ये डायनामिक प्राइसिंग सुरू होती, याचा अर्थ जसं जसं आसनं आरक्षित केली जायची, तसं तसं शुल्क वाढत जायचं.

केटरिंगसाठी पाणी आणि अन्न पैसे देऊन प्रवासी खरेदी करू शकतील.

एका ट्रेनमध्ये राजधानीप्रमाणे 1 AC, 2AC, 3AC असे कोच असतील. 1 AC आणि 2AC मध्ये सोशल डिस्टन्सिंगची अडचण येणार नाही, पण 3AC कोच 72 आसनांचा असेल की नाही, हे आताच स्पष्ट करता येणार नाही.

याचं कारण श्रमिक स्पेशल ट्रेन्समध्ये आता 1200च्या ऐवजी 1700 प्रवासी न्यायची चर्चा सुरू आहे.

नवीन नियमांनुसार:

  • तिकीट बुकिंग आठवड्यापूर्वी सुरू होईल.
  • तत्काळ बुकिंगची पद्धत उपलब्ध नसेल,
  • RAC तिकीटसुद्धा मिळणार नाही.
  • एजेंट तिकीट बुक करू शकणार नाही.
  • प्रवाशांना 90 मिनिटे अगोदर स्टेशनवर पोहोचावं लागेल.
  • गाडी सुटण्याच्या 24 तासांपूर्वी तिकीट रद्द करण्याची परवानगी नसेल.

एका आठवड्यात किती दिवस ट्रेन्स चालतील?

याविषयीचं संपूर्ण वेळापत्रक अजून रेल्वेनं जारी केलं नसलं तरी, या 15 ट्रेन दररोज धावणार आहेत.

या गाड्या कमी अंतराचा पल्ला गाठणाऱ्या असतील आणि रात्रभर चालतील. लांब पल्ल्याच्या गाड्यांना आठवड्यातून दोनदा अथवा तीनदा चालतील. या गाड्यांचे थांबे नॉमर्ल ट्रेनपेक्षा कमी असतील. लॉकडाऊनपूर्वी जितके दिवस या गाड्या चालायच्या, तितकेच दिवस चालतील.

स्टेशनवर जाण्याची परवानगी कशी मिळेल?

ट्रेननं प्रवास करायचा असल्यास लोक घरातून रेल्वे स्टेशनपर्यंत कसे पोहोचतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याविषयीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे.

ट्रेनचं कंफर्म तिकीट दाखवल्यानंतर लोक आणि ड्रायव्हर यांना घर ते स्टेशन आणि स्टेशन ते घर प्रवासाची परवानगी दिली जाईल.

हॉटस्पॉट भागातील ट्रेन

या ट्रेन्स दिल्लीतून देशातल्या 15 शहरांतल्या मुख्य रेल्वे स्टेशन्सपर्यंत धावणार आहेत. यामध्ये मुंबई आणि अहमदाबादसारख्या कोरोनाच्या हॉटस्पॉटचा समावेश आहे.

ट्रेनमध्ये आलेले प्रवासी घरी सुखरूप पोहोचले याची खात्री करणं आणि नंतर त्यांची नियमितपणे तपासणी करणं, यामुळे राज्य सरकारसमोरील अडचणी वाढू शकतात.

यातच श्रमिक स्पेशल ट्रेन्सच्या मुद्द्यावरून पश्चिम बंगाल सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वाद सुरू आहेत. त्यामुळे आता पॅसेंजर ट्रेनविषयी ममता बॅनर्जी काय भूमिका घेतात, हेही पाहावं लागेल.

सोशल डिस्टन्सिंग कसं पाळणार?

स्टेशनवर प्रवाशांची स्क्रीनिंग केली जाईल. प्रवासांना सॅनिटायझर दिलं जाईल. तसंच प्रवासादरम्यान मास्क वापरणं अनिवार्य असेल.

स्टेशनवर उतरल्यानंतर तिथल्या राज्य सरकारच्या नियमांचं पालन प्रवाशांना करावं लागेल.

उदाहरणार्थ राज्य सरकारनं एखाद्याला क्वारंटाईन करण्याचा किंवा आयसोलेशनमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला, तर त्याचं पालन करावं लागेल.

ACविषयी सरकारचे नियम

या सगळ्या 15 ट्रेन्स AC असतील. यापूर्वी सेन्ट्रलाइज्ड एसीविषयी सरकारनं एक पत्रक जारी केलं होतं. त्यात सेन्ट्रलाइज्ड एसीमुळे त्रास होऊ शकतो, असं म्हटलं होतं.

याविषयी आम्ही पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष के श्रीनाथ रेड्डी यांच्याशी चर्चा केली.

ते म्हणाले, सरकार ज्या लोकांना विमानातून आणत आहेत, तिथंही एसी सुरूच आहे. अशात जर सराकर आजूबाजूच्या परिसराला साजेसं असा एखादं तापमान ('एम्बिएंट टेम्परेचर') ठरवत असेल, तर ते फायदेशीर राहिल.

प्रवासापूर्वी स्क्रीनिंग, प्रवासादरम्याम मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केल्यास कोरोनाचा धोका टळू शकतो, असं रेड्डी सांगतात.

आता आपल्याला कोरोनासोबत जगायची सवय करून घ्यावी लागेल. कायमस्वरूपी ट्रेन आणि फ्लाईट बंद नाही करता येणार. कुठूनतरी सुरुवात करावीच लागेल, ते पुढे सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)