You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस लॉकडाऊन : 'वर्क फ्रॉम होम' उत्तमरीत्या करण्यासाठी 5 टिप्स
- Author, एलिअॅनोर लॅवरी आणि सारा पॅरी
- Role, बिझनेस प्रतिनिधी, बीबीसी न्यूज
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात लॉकडाऊन पाळला जातोय. त्यामुळे अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा म्हणजेच वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला आहे.
तुम्हीही एखादवेळला घरूनच काम करत असाल. तुम्हाला कोरोनाची लागण झालेली नसेल किंवा तुम्हाला होम क्वारंटाईन करण्यात आलेलं नसेल आणि तुमच्या ऑफिसने तुम्हाला घरूनच काम करण्याच्या सूचना केल्या असतील तर अशावेळी स्वतःचं मनोस्वास्थ्य ढळू न देता संपूर्ण कार्यक्षमतेने काम करण्यासाठी काय कराल?
त्यासाठी खाली दिलेल्या पाच टिप्स नक्की वाचा.
1. नीटनेटके कपडे घाला
घरून काम करायचं, म्हणजे आता घरच्या कपड्यांवर राहिलं तरी चालेलं, असा मोह अनेकांना होऊ शकतो. मात्र घरून काम करायचं असलं तरी नीटनेटके कपडे घातल्याने मन तर प्रफुल्लीत होतंच, शिवाय ही छोटीशी गोष्ट ऑफिसचं काम सुरू करण्यासाठी तुम्हाला मानसिकरीत्या तयार करते.
आता चांगले कपडे म्हणजे अगदी ऑफिसला जाण्यासाठीचे कपडे घालायचे का तर ते तुम्ही काय काम करता यावर अवलंबून आहे. कामानिमित्त व्हीडियो कॉल करायचे असतील आणि तुमच्या ऑफिसमधलं, टीममधलं वातावरण बघता जरा फॉर्मल किंवा स्मार्ट कॅझ्युअल घालणं संयुक्तिक ठरेल.
कपडे घालणं म्हणजे जे कपडे घालून झोपलो होतो, ते बदलून, स्नान करून तयार होणं, असं अनेकांना वाटतं. मात्र केवळ टी शर्ट आणि जीन्स बदलूनही काम होऊ शकतं.
नीटनेटके कपडे घातल्याने घरातून बाहेर पडायचंय, अशी एक जाणीव मेंदूला होते. त्याचप्रमाणे काम संपल्यानंतर कपडे बदलले की आजचं काम संपलं, ही भावना जाणवते.
2. नियम ठरवा
घरून काम करत असलात तरीसुद्धा तुम्ही ऑफिसला ज्यावेळी पोहोचता, त्याच वेळी कामाला सुरुवात करा आणि ऑफिसची वेळ संपते तेव्हा काम थांबवा.
ब्लॉगर आणि फ्रीलान्स लेखिका असणाऱ्या एम शेल्डॉन सांगतात की घरून काम करायचं असलं तरी त्या दिनक्रम काटेकोरपणे पाळतात. रात्री फारवेळ जागरण करू नका आणि झोपेच्या वेळी झोपा. म्हणजे दुसऱ्या दिवशी कामासाठी तुमच्या मेंदूला पुरेसा आराम मिळालेला असेल, असा सल्ला त्या देतात.
- वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग; पाहा सर्व ताजे अपडेट्स
- वाचा -कोरोना व्हायरस : वाचण्याची शक्यता असलेल्यांवरच होत आहेत उपचार
- वाचा -कोरोना व्हायरस महाराष्ट्रात असा पसरला
- वाचा -कोरोनाच्या संसर्गासोबतच का वाढू लागले आहेत मानसिक आजार?
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - मुंबईत लोकल ट्रेनमध्ये कसा रोखणार कोरोना व्हायरस?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?
त्या म्हणतात, "तुम्ही एखादी गोष्ट सातत्याने केली की त्याची सवय लागते. त्यामुळे पहिला आठवडा अवघड जाऊ शकतो. मात्र नियमित केल्यास तो तुमच्या दिनक्रमाचा भाग बनतो."
घरून काम करण्यासाठीसुद्धा घरातली एक विशिष्ट जागा निवडा. ऑफिसमध्ये असते तशी टेबल, खुर्चीची व्यवस्था तिथे करा. ऑफिसच्या वेळी तिथेच बसून किंवा त्याच खोलीत बसून काम करा आणि कामाचे तास संपले की तुमचा कॉम्प्युटर लॉग आउट करा आणि काम बंद करा.
बरं घरी कॉम्प्युटरवर काम करत असाल तर कीपॅड नीट हाताळता येईल, एवढी खुर्चीची उंची असायला हवी. नाहीतर सांधेदुखी, पाठदुखी असे त्रास होऊ शकतात. शिवाय, कामाचा वेग मंदावतो, हा भाग वेगळाच.
घरात इतर व्यक्ती असतील तर कामासाठीची स्वतंत्र जागा शोधणं तसं अवघड आहे.
बीबीसीचा एक व्हीडिओ तुम्ही बघितला असेल. 2017चा हा व्हीडिओ आहे. बीबीसी न्यूजवर प्रा. रॉबर्ट केली यांची ऑनलाईन मुलाखत सुरू होती. ते त्यांच्या खोलीत कॉम्प्युटरसमोर बसले होते. मुलाखत सुरू होती आणि तेवढ्यात त्यांची दोन लहान मुलं आत येऊन गोंधळ घालतात.
हा व्हीडिओ सोशल मीडियावर तीन कोटी वेळा बघण्यात आला आहे. तेव्हा घरात कामासाठीची स्वतंत्र आणि जिथे तुम्हाला कुणीही व्यत्यय आणणार नाही, अशीच जागा शोधा किंवा तशी सोय करा.
घरून काम करताना सारखं स्पष्टीकरणं देत बसू नका, असं इग्नाटा कन्सल्टिंग फर्ममध्ये फ्रीलान्सर्सची एक टीम हाताळणारे रॉस रॉबिनसन सांगतात.
ते म्हणतात, "घरून काम करताना बरेचजण ओव्हरकॉम्पेन्सेट करतात. म्हणजे सारखे फोन करून काहीतरी स्पष्टीकरण देत असतात. यामागे एक कारण 'दिखावा' असू शकतं किंवा मग ओव्हरकॉम्पेन्सेट असू शकतं. तुम्ही काय करत आहात, हे इतरांना माहिती असणं ठीक आहे. मात्र, त्यासाठी अतिरेक करू नका."
3. मोकळ्या हवेत फेरफटका मारा
घरून काम करण्याचा अर्थ तुम्ही स्वतःला घरात कोंडून ठेवा, असा होत नाही. ऑफिसला जायच्या निमित्ताने तुम्ही रोज घरातून बाहेर पडता. मात्र, घरून काम करायला मिळाल्याने बाहेर जायची तशी गरज उरत नाही. मात्र, तरीही मोकळ्या हवेत जाऊन एक फेरफटका मारून यावा. एरवी तुम्ही ऑफिसच्या निमित्ताने घराबाहेर पडत होतात. आता मात्र, ऑफिसला जायची गडबड नाही. हा फेरफटका तुम्ही स्वतःसाठी मारता. त्यामुळे तुमचा मानसिक ताण कमी होतो. शिवाय, तुमच्या ओळखीच्या त्याच रस्त्यावर यापूर्वी तुमचं लक्ष गेलं नव्हतं अशा कितीतरी नवीन गोष्टी दिसू लागतात.
बाहेर पडल्यामुळे काम सुरू करण्याची भावना जागृत होत असल्याचं सेल्फ एम्प्लॉईड आणि फ्रीलान्सर्सना समर्थन देणाऱ्या 'Leapers' या संघटनेचे संस्थापक मॅथू नाईट यांना वाटतं.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "प्रत्येकाचा एक स्वतंत्र मेंटल अँगल असतो ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की आता तुम्ही काम करत आहात. मी घरातून बाहेर पडतो. एक फेरफटका मारतो आणि त्यानंतर आता कामाची वेळ झाली, असं मला वाटतं. "
तुम्ही घराबाहेर पडू शकत नसाल तर ऑफिसचं वातावरण घरातही आणू शकता.
गिलीयन रॉचे-सॉन्डर्स यांची 'Adempi Associates' नावाची रेग्युलेटरी कन्सल्टन्सी फर्म आहे. या फर्मचं कार्यालय नाही. फर्ममध्ये काम करणारे सगळेच घरून काम करतात.
बीबीसीशी बोलताना गिलीयन म्हणतात, "मला लोकांमध्ये राहायला आवडतं. त्यामुळे आवाजाच्या मदतीने मी तशी वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न करते."
यासाठी गिलीयन एक अॅप वापरतात. या अॅपमध्ये रुळांवरून धावणारी रेल्वे, कॉफी शॉपमधला कोलाहल असे वेगवेगळे बॅकग्राऊंड साउंड आहेत.
4. अधूनमधून मोबाईलवर बोला
ऑफिसमध्ये तुम्ही सहकऱ्यांशी गप्पा मारता. थोडंफार हसणं खिदळणं होतं. मात्र, घरून काम करताना तुम्ही एकटे असता. संपूर्ण दिवस कुणाशीही न बोलता घालवता आणि हे एकप्रकराचं आयसोलेशनच आहे.
या एकाकीपणातून बाहेर पडायचा एक मार्ग म्हणजे मोबाईल उचला आणि ईमेल आणि मेसेजवरून संपर्क करण्याऐवजी थेट कॉल करून गप्पा मारा.
2018 पासून स्पेनमध्ये फ्रीलान्स PR कन्सल्टन्ट म्हणून काम करणारे ह्युगो मॉर्टिमर-हॅर्वे सांगतात, "अनेकजण सहकाऱ्यांशी आणि इतरांशी फोनवरून थेट बोलण्यापेक्षा ई-मेल करतात. मात्र, ईमेलवरून संपर्क करण्यापेक्षा कॉल करून प्रत्यक्ष बोलणं तुम्हाला स्टिम्युलेट करतं आणि तुमची उत्पादकताही वाढवतं."
जॅक ईव्हान्स 'रॉबर्टसन कूपर' या वर्कप्लेस वेलनेस कन्सल्टन्सीमध्ये बिझनेस सायकॉलॉजिस्ट आहेत. ही कन्सल्टन्सीही आपल्या सर्व कर्मचाऱ्याना तात्पुरतं वर्क फ्रॉम होम देण्याच्या विचारात आहे. या काळात सर्व कर्मचाऱ्यांनी एकमेकांशी दिवसातून 30 मिनिटं तरी व्हिडियो कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून गप्पा माराव्या, असा त्यांचा विचार आहे.
"लंच टाईममध्ये आम्ही व्हिडियो मेसेजवर गप्पा मारू. कुठल्याही विशिष्ट विषयावर नाही तर अवांतर. आम्ही कामाविषयी तर बोलूच. पण, सोशल कनेक्ट तुटू नये, यासाठी आमचा हा प्रयत्न असणार आहे."
5. छोटे-छोटे ब्रेक घ्या
घरून काम करताना नित्यक्रम ठरलेला असावा. मात्र, घरून ऑफिसचं काम करणं कंटाळवाणं होता कामा नये.
तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरच खिळून बसला आहात, असं होता कामा नये. यासाठीचा उपाय म्हणजे कामाच्या मधे छोटे-छोटे ब्रेक घ्या. ऑफिसमध्ये जसा थोडा फेरफटका मारता, तसा घरी मारावा.
कामाच्या वेळी जास्त वेळा छोटे-छोटे ब्रेक घेणं, एखाद-दुसरा मोठा ब्रेक घेण्यापेक्षा जास्त उपयुक्त असल्याचं संशोधनांमध्येसुद्धा आढळलं आहे.
घरून काम करणारे अनेकजण 'पोमोडोरो तंत्रा'चा सल्ला देतात. पोमोडोरो हे वेळेचं व्यवस्थापन करण्याचं एक तंत्र आहे. यात कामाच्या तासांना 25-25 मिनिटांच्या भागात विभागणी करून प्रत्येक 25 मिनिटांनंतर 5 मिनिटांचा छोटा ब्रेक घ्यायला सांगितलं आहे.
ऐली विलसन 'Vertalent' या व्हर्च्युअल असिस्टंट सर्विसच्या सहसंस्थापक आहेत. त्यांची 50 जणांची एक टीम आहे. हे सगळे घरून काम करतात.
त्या म्हणतात, "तुमच्या कामातून आणि स्क्रीनमधून ब्रेक घेण्यासाठी ताठ उभं राहणं, स्ट्रेचिंग करणं, इतकंच नाही तर एक छोटीशी फेरी मारून येणंही गरजेचं आहे."
त्या पुढे सांगतात, "ब्रेक न घेता कामाला जुंपन घेतल्याने तुमची उत्पादकता कमी होते, तुम्हाला थकवा येतो आणि जे काम तुम्हाला नेमून देण्यात आलेलं आहे ते करण्याचा उत्साह कमी होतो."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)