You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
येस बँकेत गुंतवणूक केल्यास SBI च्या खातेदारांनी भीती बाळगावी का?
- Author, मोहम्मद शाहीद
- Role, बीबीसी प्रतिनिधी
YES बँकेला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)नं आपलं धोरण सादर केलं आहे.
वारेमाप कर्जवाटपामुळं YES बँक संकटात आली असून, RBI नं महिनाभरासाठी निर्बंध लादले आहेत. YES बँक भारतातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी खाजगी बँक आहे.
SBI चे चेअरमन रजनीश कुमार यांनी शनिवारी (7 मार्च) पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली की, YES बँकेशी संबंधित RBI च्या पुनर्गठन योजनेवर SBI ची टीम काम करते आहे.
रजनीश कुमार यांनी सांगितलं, YES बँकेतील 49 टक्के भाग SBI खरेदी करू शकते. RBI च्या योजनेअंतर्गत YES बँकेत 2,450 कोटींची गुंतवणूक केली जाईल.
"YES बँकेत गुंतवणूक करण्यास आणखीही गुंतवणूकदार तयार असून, त्यांनी आमच्याशी संपर्कही केलाय. गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेले गुंतवणूकदार पाच टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक करू शकतात," असंही त्यांनी सांगितलं.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याप्रमाणेच रजनीश कुमार यांनीही YES बँकेच्या ग्राहकांना उद्देशून म्हटलं की, तुमचे पैसे सुरक्षित असून, काळजी करू नये.
SBI का गुंतवणूक करतेय?
YES बँकेवर आर्थिक संकट कोसळल्यानंतर RBI नं निर्बंध लादले आणि ग्राहकांना आपल्या खात्यातून 50 हजार रूपयांपर्यंतची रक्कमच काढण्याची परवानगी दिलीय. 3 एप्रिल 2020 पर्यंत म्हणजे जवळपास महिनाभर तरी सध्या हे निर्बंध लागू असतील.
RBI नं YES बँकेला वाचवण्यासाठी एक योजनाही मांडली आहे. या योजनेत SBI नं रस दाखवलाय. त्यामुळं अनेकांना हाच प्रश्न पडलाय की, SBI ला YES बँकेत गुंतवणूक करण्यास एवढा रस का आहे?
केंद्र सरकारनं सांगितल्यानं SBI नं YES बँकेत गुंतवणूक करण्यात रस दाखवल्याचं आर्थिक विषयांचे जाणकार आलोक जोशी सांगतात.
आलोक जोशी पुढे म्हणतात, "SBI नं गुंतवणुकीस दाखवलेली उत्सुकता हा काही व्यावसायिक निर्णय नाहीय, जो बँकेच्या व्यवस्थापनानं घेतलाय. YES बँकेची आर्थिक स्थिती वाईट आहे. अगदीच कठोर शब्दात सांगायचं तर, बँक बुडालीय. RBI नं YES बँकेला आधार देण्यासाठी जो प्रस्ताव ठेवलाय, त्यात स्पष्ट म्हटलंय की, गुंतवणूकदार बँकच असेल."
RBI आणि सरकार
"RBI नं YES बँकेवर काही अचानक निर्बंध आणले नाहीत. सरकारला अंदाज होताच की, YES बँकेची स्थिती वाईट आहे आणि त्यामुळेच बँकेच्या व्यवस्थापनाला बाजूला करुन सरकारनं आपली माणसं तिथं नियुक्त केलीत. YES बँक एखादी छोटी बँक असती, तर कुठल्यातरी मोठ्या बँकेत विलीनही केलं गेलं असतं," असं आलोक जोशी म्हणतात.
बिझनेस स्टँडर्डचे कंसल्टिंग एडिटर शुभमय भट्टाचार्य हेही आलोक जोशींच्या म्हणण्याशी सहमत आहेत. भट्टाचार्य म्हणतात, "YES बँकेला वाचवण्यासाठी SBI ला आदेश देण्यात आलेत. कारण RBI आणि सरकारकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता."
"YES बँकेची आर्थिक स्थिती इतकी वाईट आहे की, वित्तसंस्था बँकेला डिफॉल्ट कॅटेगरीत टाकतायत. तसंच, बँकेची एकूण संपत्ती आजच्या घडीला नकारात्मक स्थितीत आहे. यावरूनच YES बँकेची सद्यस्थिती लक्षात येते," असं भट्टाचार्य सांगतात.
ते पुढे सांगतात, "भारतात बुडणाऱ्या बँकांना केवळ सरकारी कंपन्याच वाचवू शकतात. कारण खासगी बँकांना कर्ज देण्यास निधी देण्याची क्षमता सरकारकडे नाहीय. या स्थितीत सरकारसमोर LIC, SBI आणि PNB यांसारख्या कंपन्याच आहेत, ज्या बुडणाऱ्या कंपन्यांना वाचवण्यासाठी पुढे येतात."
SBI वर काय परिणाम होईल?
बुडणाऱ्या कंपन्यांना वाचवण्यासाठी सरकार आपल्या मोठ्या कंपन्यांचा वापर करत असते. त्यासाठी LIC हे मोठं उदाहरण आहे. मात्र, सरकार आता LIC लाच विकू पाहतंय.
SBI चाही LIC सारखाच वापर करून नंतर या बँकेचीही स्थिती तशीच केली जाईल?
यावर आलोक जोशी म्हणतात, "पुढे काहीही होऊ शकतो. त्याबाबत आता काहीच अंदाज वर्तवला जाऊ शकत नाही. कारण YES बँकेत गुंतवणुकीची बातमी समोर आल्यानंतर SBI च्या शेअर्सवर परिणाम झाल्याचं दिसून आलंय."
"YES बँके SBI गुंतवणूक करणार असल्याचं समोर आल्यानंतर SBI चे शेअर्स 12 टक्क्यांनी पडले. गुंतवणूकदारांना यामुळेच भीती वाटतेय. कारण सरकार नफ्यात असणाऱ्या बँकांचा पैसा बुडणाऱ्या बँकांसाठी वापरतंय," असं जोशी म्हणतात.
SBI च्या खातेदारांनी काळजी करण्याचं कारण आहे का?
LIC ज्यावेळी खासगी कंपन्यांना विकण्याची चर्चा सुरू झाली, त्यावेळी LIC च्या खातेदारांमध्ये भीती निर्माण झाली. आता SBI च्या खातेदारांनीही काळजी करायला हवी?
शुभमय भट्टाचार्य सांगतात, बँकेच्या खातेदारांनी काळजी करण्याचं कारण नाही, मात्र गुंतवणूकदारांसाठी चिंता नक्कीच असेल.
"SBI च्या गुंतवणूकदारांना पाहावं लागेल की, YES बँकेत 2,450 कोटी रुपये गुंतवल्यास त्याचा परतावा किती मिळणार आहे. अमेरिकेत सिटी बँकेचं राष्ट्रीयकरण केलं होतं, त्यावेळी तिथंही असंच केलं होतं. सरकारनं सिटी बँक चालवल्यानंतर बँक काही वर्षांनी तिच्या मूळ स्थितीत येऊ शकली," असं भट्टाचार्य सांगतात.
YES बँकेला टाळं का ठोकलं जात नाही?
YES बँकेच्या आजच्या स्थितीला संस्थापक राणा कपूर यांना जबाबदार ठरवलं जातंय. त्यांनी वारेमाप कर्जवाटप केल्यानं बँकेची आज ही स्थिती झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
मग बँकेला बंद का केलं जात नाही? शुभमय भट्टाचार्य म्हणतात, "कुठलीही मोठी अर्थव्यवस्था बँकांना बुडू देत नाही. कितीही मोठ्या कंपन्या बुडल्या तरी चालतील, मात्र अर्थव्यवस्थेत बँकेला बुडू दिलं जात नाही."
आलोक जोशीही या गोष्टीला दुजोरा देतात. ते म्हणतात, "भारताच्या इतिहासात स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत कुठलीच बँक बंद झाली नाहीय. काही सहकारी बँका बुडाल्या, मात्र तिथंही सरकार प्रयत्न करताना दिसतंय की, कुठल्याही प्रकारे खातेदारांचा पैसा सुरक्षित ठेवला जावा."
ते पुढं म्हणतात, "YES बँकेत खूप सारे लोक काम करतात आणि अनेक लोकांचे पैसे जमा आहेत. या बँकेचं बंद होणं म्हणजे संपूर्ण बँकिंग व्यवस्थेत गोंधळ निर्माण होईल. त्यामुळं बँकेला वाचवणं ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र, बँकेला वाचवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, असं म्हणणंही कठीण आहे."
बँका या कायमच अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातात. बँकांना बंद करणं म्हणजे अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवण्यासारखं आहे.
बँक कशी वाचवली जाऊ शकते?
आरबीआयच्या धोरणानुसार YES बँकेचे केवळ 49 टक्के शेअरच विकले जाऊ शकतात आणि त्यातील 26 टक्के शेअर्सना तीन वर्षांपर्यंत खरेदीदारानं स्वत:कडं ठेवणं बंधनकारक असेल. त्यानंतरच ते शेअर्स विकले जाऊ शकतात. या तीन वर्षात बँक पुन्हा उभारी घेईलच, याची शाश्वती काय?
आलोक जोशी म्हणतात, तीन वर्षे तरी शेअर्स न विकण्याच्या RBI च्या अटीमुळं खूप फरक पडेल.
"जर एक-दोन वर्षातच बँक सुस्थितीत आल्यानंतर एखादा गुंतवणूकदार बाहेर पडू इच्छित असेल, तर तो जाऊ शकतो आणि सरकार SBI ला ही जबाबदारी यासाठी देतंय, कारण SBI मध्ये ती क्षमता आहे, विश्वास आहे."
त्याचसोबत, आलोक जोशी सांगतात, "YES बँकेचं नवं मॅनेजमेंट विश्वासार्ह असायला हवं, नव्या जोमानं काम करायला हवं. जुनं कर्ज वसूल केल्यास बँक पुन्हा सुस्थितीत येऊ शकते."
कोरोना व्हायरसचा अर्थव्यवस्थेवर परिणाम
आलोक जोशी म्हणतात, "नवनवीन उपक्रमांच्या बाबतीत YES बँक नेहमीच चांगली मानली गेलीय. अनेक नव्या कंपन्यांचे पगाराचे खाते या बँकेतच आहेत. त्यामुळं बँकेला वाचवलं जाण्याची आशा आहे."
किंबहुना, अशा स्थितीतल्या एका बँकेला याआधीही वाचवलं गेलंय.
शुभमय भट्टाचार्य म्हणतात, "YES बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी बँकेचं मॅनेजमेंटच सर्वात मोठी भूमिका बजावेल. मात्र, त्यांचं म्हणणं आहे की, देशातील वातावरण आणि जागतिक स्थितीचाही YES बँकेवर मोठा परिणाम होईल."
कोरोना व्हायरसनं जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम केलाय. भारताची अर्थव्यवस्थाही सुस्थितीत आहे असं नाही. जीडीपीचे दर सातत्यानं घटताना दिसतंय. YES बँकेला पुन्हा उभारी घेण्यासाठी खूप वेळ लागू शकतो.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)