You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : शुभमंगल आता जरा जास्तच 'सावधान'
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"लग्नाला येऊ नका. कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने माझ्या मुलीच्या लग्नाला येऊ नका. आम्ही लग्न थोडक्यात करायचं ठरवलं आहे. रिसेप्शन रद्द केलंय. त्यामुळे तुम्ही तुमचं आरोग्य धोक्यात घालून प्रवास करून लग्नाला येऊ नका," असं सांगायची वेळ आता एका वडिलांवर आली आहे.
कोल्हापुरातील संजय शेलार यांच्या मुलीचं 18 मार्चला लग्न आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणतात, "वर आणि वधूकडून आतापर्यंत जवळपास 3 हजार पत्रिकांचं वाटप आम्ही केलं. सगळ्यांना आग्रहाने लग्नाला बोलवलं. पण गर्दी करु नका असं सरकारकडून सांगण्यात आल्याने आम्हीही सामाजिक भान राखत लग्न केवळ कुटुंबीयांच्या समोर करून बाकी सगळे कार्यक्रम रद्द केलेत. अशी वेळ कुणावरही येऊ नये."
- वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग; पाहा सर्व ताजे अपडेट्स
- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - मुंबईत लोकल ट्रेनमध्ये कसा रोखणार कोरोना व्हायरस?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?
लग्नकार्य ही कुठल्याही वधू-वरासाठी आयुष्यातली सगळ्यांत खास घटना असते. कोल्हापूरचे ऋतुजा आणि किरण हे सुद्धा आपल्या लग्नासाठी खूप उत्सुक होते. लग्न ठरल्यापासून लग्नाच्या दिवसाची प्रतीक्षा दोघंही करत होते. लग्नाच्या साड्या आणि दागिन्यांच्या खरेदीनंतर कधी एकदा तयार होतेय असं ऋतुजाला वाटत होतं. तसेच किरणही ऋतुजाच्या साडीला मॅच होईल असा सूट घेण्याची तयारी करत होता.
दुसरीकडे दोघांच्याही घरात दिवस-रात्र लग्नाचीच धामधूम. मंडप, मिठाई, आचारी, भटजी ठरवण्याची लगबग सुरु होती. ऋतुजा आणि किरणने पत्रिका कशी असेल हेही ठरवलं. पत्रिका छापूनही आल्या.
दोघांच्याही कुटुंबीयांनी उत्साहात पाहूण्यांना आग्रहाचं निमंत्रण दिलं. ऋतुजा आणि किरणने व्हॉट्सअॅपवरही सगळ्यांना लग्नाचं निमंत्रण पाठवलं. लग्नाची बऱ्यापैकी सगळी तयारी झाली. पण या आनंदाच्या वातावरणात पुण्यात कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळला. बघता बघता महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.
सरकारकडून मॉल्स, थिएटर्स, शाळा, महाविद्यालयं सगळं 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आलंय. गर्दीत जाऊ नका, शक्यतो घराबाहेर पडणं टाळा असं आवाहन सरकारकडून करण्यात आलंय. अशी बातमी येताच या परिस्थितीत लग्न समारंभ कसा करायचा? असा प्रश्न दोन्ही कुटुंबांना पडला. दोघांच्याही घरात काळजी वाढू लागली. तेव्हा लग्न थोडक्यात आटोपून रिसेप्शन आणि बाकी कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय दोघांच्याही कुटुंबियांनी घेतला.
ऋतुजाने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "आमचा साखरपुडा 4 फेब्रुवारीला पार पडला. तेव्हापासून लग्नासाठी खासकरुन रिसेप्शनसाठी मी खूप उत्सुक होते. कारण लग्नात विधी तर होतात पण रिसेप्शनसाठी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी खूपजण येतात. आता कुणीही येणार नाही याचं वाईट वाटतंय."
"आम्ही जवळपास 3 हजारहून अधिक पत्रिका वाटल्या आहेत. गेल्या दोन दिवसापासून आम्ही पाहुण्यांना आता येऊ नका म्हणून सांगतोय. रिसेप्शनसाठी दागिनेही घेतले होते. पण लग्नासारखा सोहळा आता थोडक्यात करावा लागेल याचं दु:ख आहे. सगळ्यांच्या आरोग्याचा विचार करता हे महत्त्वाचं आहे असंही मला वाटतं," असं ऋतुजा सांगते.
'खूप दु:ख होतंय'
मुंबईत राहणारा रिझवान शेख याचंही एक एप्रिल रोजी लग्न आहे.
रिझवानने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. "एक एप्रिलला लग्न आणि रिसेप्शन आहे. तर तीन एप्रिलला वलीमा आहे. पण आम्ही अगदी मोजक्याच कुटुंबीयांच्या साक्षीने लग्न करणार आहोत. रिसेप्शन आणि वालिमा आम्ही सध्या रद्द केलाय.
अडचण अशी आहे की लग्नपत्रिका सगळ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्येकाला लग्नाला येऊ नका असं सांगणं कठीण जात आहे. हा निर्णय आम्ही सगळ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीनेच घेतला आहे"
हनिमूनचे बुकिंगही रद्द
मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत राहणाऱ्या निकिता पडावेचं 18 मे रोजी लग्न ठरलंय. लग्न पुढे ढकलण्याबाबत निकिताने अद्याप विचार केला नसला, तरी हनिमूनचं तिकीट रद्द केलं आहे.
निकीताने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "हनिमूनसाठी आम्ही बालीला जायचं ठरवलं होतं. 19 मे रोजी रात्रीची फ्लाईट बुक केली. पण सध्या कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने आम्ही लग्नानंतर बाहेरगावी जाण्याचं टाळलं आहे. आम्ही सहल रद्द करण्याची विचारणा खासगी टुर्सला केली. पण ते पैसे परत देण्यास तयार नाहीत.
62 हजार रुपये आम्ही फ्लाईट बुकिंगसाठी दिले आहेत. पण मोठं आर्थिक नुकसान होत असलं, तरी आम्ही आता बुकिंग रद्द केलंय. लग्नानंतर हनिमूनला बाहेरगावी जाणं हे स्वप्न होतं. त्यासाठी आम्ही खूप तयारी केली होती. आम्ही दोघांनीही त्यासाठी सुट्टी घेतली होती. आम्ही नंतर बाहेरगावी जाऊ शकतो. पण लग्नानंतर पहिल्यांदा बाहेर जाणं ही भावना वेगळी असते. पण आता जाता येत नाही. याचं खूप वाईट वाटतंय."
लग्नसंबंधी व्यवसायांना मोठा फटका
तुळशीच्या लग्नानंतर महाराष्ट्रात लग्नकार्यांना सुरुवात होते. पण जास्तीत जास्त लग्नकार्य मार्च, एप्रिल, मे या कालावधीत होतात. कारण शाळा, महाविद्यालयांच्या उन्हाळी सुटीत सगळ्यांसाठीच लग्नाला येणं सोयीचं होतं.
पण राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना सरकारकडूनही निर्बंध घालण्यात आलेत. अशात लग्नकार्य पुढे ढकलली जात असल्याने याचा आर्थिक फटका संबंधित व्यावसायिकांनाही बसतोय.
ऑनलाइन भटजी ठरवता यावेत यासाठी वेबसाईट चालवणाऱ्या मृदुला बर्वे सांगतात, "गेल्या आठवड्यापासून आतापर्यंत दोन लग्नकार्यं रद्द झाली आहेत. या दोन्ही प्रकरणांमध्ये वर, वधू परदेशातून येणार असल्याने लग्न पुढे ढकलण्यात आली आहेत.
शिवाय, दरवर्षी या काळात जितक्या प्रमाणात बुकींग होतं त्याचं प्रमाणही फार कमी झालंय. गेल्या महिन्याभरापासून जागतिक पातळीवर कोरोना व्हायरसच्या बातम्या प्रसारित होतायत. त्यामुळे याकाळात कुणीही लग्नकार्य करण्यास धजावत नाही. तर अनेकांचे पाहुणेही परदेशातून येत असतात यामुळेही या वातावरणात लग्न समारंभ टाळले जात आहेत."
तर मेकअप आर्टीस्ट आरती यांनी सांगितलं, "ग्रामीण भागातून मेकअपसाठी आलेल्या बुकिंग तशाच आहेत. पण मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी अनेकांनी रिसेप्शन रद्द केली आहेत. मॉल बंद असल्याने बँक्वेट उपलब्ध होत नसल्यामुळेही लग्नकार्य थांबवावी लागत आहेत. 15 दिवस वाट पाहून काहीजण निर्णय घेणार असल्याने अशांनी बुकिंग नक्की नसल्याचं कळवलं आहे."
'मोबाईलवरून लग्नाच्या शुभेच्छा द्या'
या लग्नसराईच्या काळात तुम्हालाही आपल्या निकटवर्तीयांकडून 'लग्नाला यायचं हं' असा आग्रह केला जात असेल. एकाबाजूला कोरोना व्हायरसच्या संसर्गाची भीती आणि दुसऱ्या बाजूला जवळचं लग्नकार्य टाळायचं कसं? असा प्रश्न समान्यांना पडला आहे.
यावर उपाय म्हणून मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा सांगतात, "आपल्याकडे एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबाच्या लग्नाला हजर राहीलं तर त्यांच्या कुटुंबातल्या लग्नाला हजेरी लावलीच पाहिजे असा अघोषित नियम आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता कोणत्याही व्यक्तीने लांबचा प्रवास करणं, गर्दीत जाणं हे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतं.
लग्नाच्या ठिकाणीही सभागृहात गर्दी तर असतेच पण कोणती व्यक्ती कुठून आलीय याचीही आपल्याला कल्पना नसते. त्यामुळे आपण कुणाच्या संपर्कात येतोय हे देखील आपल्याला कळत नाही. त्यापैकी कुणी परदेशाहून आलंय का, कुणामध्ये कोरोनाची लक्षणं आहेत का, याची कल्पना लग्न समारंभात येणं शक्य नसल्याने अशा ठिकाणी जाणं नागरिकांनी नक्कीच टाळायला हवं. अशावेळी आपण संबंधितांना शुभेच्छा देणारा व्हीडिओ पाठवू शकतो. तसंच त्यांना डिजिटल माध्यमातूनही शुभेच्छा देऊ शकतो."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)