You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : ...तर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश #5मोठ्याबातम्या
आजची विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवरील बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या.
1. ...तर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात 21 दिवस लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी तेलंगणा सरकारनं कठोर पावलं उचलायला सुरूवात केली आहे. नागरिकांनी कर्फ्यूचे पालन केले नाही तर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात येतील, असा इशारा मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिला आहे. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
तेलंगणा सरकारने संध्याकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंतही 'नाईट कर्फ्यू' लागू केला आहे. पोलीस प्रत्येक नागरिकाला थांबवू शकत नाहीत. जर नागरिकांनी आदेश पाळले नाही तर लष्कराला पाचारण करण्यात येईल आणि दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात येतील, असा इशारा राव यांनी दिला आहे. "कृपया घरीच रहा, नाहीतर सर्वांना याचे परिणाम भोगावे लागतील. परदेशातून जे नागरिक आले असतील आणि विलगीकरणाचे नियम पाळत नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल," असंही त्यांनी म्हटलं.
2. लॉकडाऊनमध्ये गरीबांना अडचणीत सोडू नका- काँग्रेसची मागणी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. पण या 21 दिवसांमध्ये देशातील गोरगरीब जनतेच्या उदर्निर्वाहाचं काय?
- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
असा प्रश्न काँग्रेसने विचारला आहे. ईटीव्ही भारतनं ही बातमी दिली आहे. "गरीबांना अडचणीत सोडू नका. 21 दिवस त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करा, अशी आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे," असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.
हातावर पोट असलेल्या लोकांच्या रोजीरोटीची व्यवस्था करा, अशी मागणी सुरजेवाला यांनी केली आहे.
3. लोकल बंदमुळे रेल्वेला सहन करावा लागणार 220 कोटींचा तोटा
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मुंबईमधील लोकलसेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेला मुंबईतून मिळणाऱ्या तब्बल 220 कोटींच्या महसुलाचा तोटा सहन करावा लागणार आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
रेल्वेतील गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची भीती व्यक्त केली जात असल्यामुळे 23 ते 31 मार्च या कालावधीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या रेल्वेगाड्याही बंद करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेवर दिवसाला सरासरी 14 कोटींचे उत्पन्न मिळते.
यात लोकलमधून सुमारे 2.45 कोटी, मेल-एक्स्प्रेसमधून 6.45 कोटी आणि माल गाड्यामधून मिळणाऱ्या 5.11 कोटी रुपयांचा समावेश आहे. पश्चिम रेल्वेवर दररोज साधारणपणे 8 कोटींची कमाई होते. यात लोकलसेवेतून मिळणाऱ्या सरासरी 2 ते 2.15 कोटी रुपयांचा समावेश आहे.
4. महाराष्ट्रात 15 जण कोरोना व्हायरसमुक्त
महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे १०७ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 15 जण हे कोरोनामुक्त झाल्याचं तपासणीतून स्पष्ट झालं आहे. त्यांना लवकरच घरी पाठवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
टोपे यांनी मंगळवारी 'फेसबुक लाईव्ह'द्वारे जनतेशी संवाद साधला. राज्यातील कोरोनाग्रस्तांची स्थिती त्याचबरोबर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचीही त्यांनी माहिती दिली.
गुढीपाडव्याच्या सणानिमित्त जनतेला शुभेच्छा देतानाच नववर्षांची सुरूवात करोनावर मात करण्याच्या दृढ निश्चयाने करा, या विषाणूवर विजय मिळविण्याचा संकल्प करा, असे आवाहन टोपे यांनी केले.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक खोटे मेसेजही सोशल मीडियावर फिरत आहेत. अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुंबई पोलिसांनी वेळा घालून दिल्या आहेत अशी पोस्ट मुंबई पोलिसांच्या नावाने व्हायरल होत आहे.
मात्र हा मेसेज फेक असल्यानं कृपा करुन ती व्हायरल करु नका असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.
5. शिवराजसिंह चौहान यांच्यावरील विश्वासदर्शक ठराव मंजूर
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी विधानसभेतील विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने जिंकला आहे. स्क्रोलने ही बातमी दिलीये.
काँग्रेस पक्षाचे आमदार यावेळी अनुपस्थित राहिले होते.
राज्य विधानसभेचे खास अधिवेशन विश्वासदर्शक ठरावासाठी बोलावण्यात आले होते. त्यात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी एका ओळीचा विश्वासदर्शक ठराव मांडला. बहुजन समाज पक्षाचे दोन आमदार तसेच अपक्ष आमदार सुरेंद्र सिंह शेरा, विक्रम सिंह राणा यांनी भाजपला पाठिंबा दिला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)