You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'भाजपच्या 200 पेक्षा कमी जागा आल्या तर घटक पक्षांना पंतप्रधान निवडण्याची संधी मिळेल' #राष्ट्रमहाराष्ट्र
भाजपच्या 200च्या वर जागा आल्या नाही तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांना पंतप्रधान निवडण्याची संधी मिळेल असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी केलं.
2014 मध्ये सरकार भाजपचं आलं होतं, पण 2019मध्ये सरकार राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं असेल, असं मत राऊत यांनी बीबीसी मराठीच्या राष्ट्र महाराष्ट्र कार्यक्रमावेळी व्यक्त केलं.
बीबीसी मराठीच्या या निवडणूक विशेष कार्यक्रमात राज्यातील प्रमुख राजकीय नेते आपापली मतं आणि येत्या निवडणुकांमधली स्वतःची, स्वतःच्या पक्षाची भूमिका मांडत आहेत.
तेव्हा राऊतांनी भाजपशी युती, नाणार प्रकल्प, राम मंदिर आणि हिंदुत्व तसंच निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे काय मुद्दे असतील, अशा अनेक विषयांवर बीबीसी मराठीच्या विनायक गायकवाड यांच्याशी बातचीत केली.
भाजपच्या किती जागा येतील?
भाजपच्या किती जागा येतील असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले, "भाजपच्या 160-175 पर्यंत जागा येतील असं आम्हाला वाटत होतं. पण पुलवामा हल्ला आणि त्यानंतर झालेली हवाई कारवाई यानंतर लोकांना या देशात स्थिर सरकार हवं आहे. हे सरकार आहे ते काही काळ चालावं असं लोकांना वाटतं. त्यामुळे भाजपच्या 210पर्यंत जागा येतील. बाकीचे मित्रपक्ष मिळून आम्ही 300 पर्यंत जाऊ. म्हणजे हे सरकार राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार राहील."
जर भाजप 210 पर्यंत पोहोचला आणि रालोआचं सरकार आलं तर तुम्हाला वाटतं की नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असं विचारलं असता राऊत म्हणाले,
"जर भाजपने त्यांना संसदीय दलाचा नेता म्हणून निवडून दिलं तर ते पंतप्रधान होतील. मी असं मानतो की मोदींच्या हातात आज सत्ता जरी असली तरी त्यांच्या पक्षात सुद्धा संसदीय दल नावाचा प्रकार असू शकतो. तो तेव्हाही असेल. मोदी हा चेहरा आजही आहे. ज्या प्रकारचा प्रचार आज चालला आहे तो मोदींच्याच नावाने चाललेला आहे. मोदींच्याच नावाने आपण सगळे मत मागत आहोत ना. तर मोदीच पंतप्रधान राहतील."
जर भाजपच्या कमी जागा आल्या तर?
जर मोदी नाही तर रालोचा घटक म्हणून पंतप्रधान कोण व्हावा असं तुम्हाला वाटतं? असं विचारलं असता राऊत सांगतात, "जर भाजपला 200 च्या खाली जागा मिळाल्या तर मित्र पक्षांना किंवा घटक पक्षांना पंतप्रधान निवडण्याची संधी मिळेल. जर त्यांना 200 च्या वर जागा मिळाल्या तर त्यांच्या पक्षाचं नेतृत्व कोणी करावं हे ठरवण्याचा अधिकार त्यांनाच आहे. मला मला तर आज त्यांच्या पक्षामध्ये असा कोणताही दुसरा नेता दिसत नाही जो मोदींची जागा घेऊ शकेल."
राऊत यांच्या वक्तव्याबद्दल भाजपला काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी बीबीसीनं भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांच्याशी संपर्क साधला ते सांगतात, "भाजपला पूर्ण बहुमत मिळेल असा आम्हाला विश्वास आहे आणि भाजपला पूर्ण बहुमत मिळालं तरी भाजप आपल्या मित्र पक्षांना बरोबर घेऊनच सरकार स्थापन करणार आहे."
'देशासाठी आम्ही एकत्र आलो'
गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्र सरकारमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने भाजप वारंवार टीका केली. युती तुटेल असं वाटत असताना हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र का आले, यावर राऊत म्हणाले, "देशासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. मतभेद असले तरी आमच्या काही भूमिका आणि मागण्या आहेत. युती झाली नसती तर दोन्ही पक्ष नेस्तनाबूत झाले असते. ज्या मुद्द्यांसाठी भांडलो त्यावर भाजपनं तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, म्हणून युती केली."
"युती का झाली, हा प्रश्न तुम्ही भाजपला का विचारत नाहीत," असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. तसंच युतीला स्वीकारायचं की नाही, हे आता लोक ठरवतील," असं ते म्हणाले.
"पण हो, 2014 मध्ये जे भाजप सरकार सत्तेत आलं होतं, पण 2019 मध्ये भाजपचं नव्हे तर NDAचं सरकार येईल. भाजपच्या 200 पेक्षा जास्त जागा आल्या तर रालोआमधल्या घटकपक्षांना पंतप्रधान निवडण्याची संधी मिळेल," असंही ते यावेळी म्हणाले.
युतीची घोषणा करताना अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावर पॉवर शेअरिंगचा अर्थ काय, या प्रश्नावर त्यांनी आधी आढेवेढे घेतले खरे मात्र निवडणुकांनंतर मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल का, ते पाहून असं म्हणाले.
शिवसेनेच्या मनात मुख्यमंत्री कोण, या प्रश्नावर नंतर त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं. आगामी निवडणुकीत भाजप-शिवसेने युतीचा विजय झाला तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
"बाळासाहेब हुकुमशाह होते, त्यांची पक्ष चालवण्याची तशी पद्धत होती तर उद्धव ठाकरे हे लोकशाही पद्धतीने शिवसेना चालवत आहेत. प्रत्येकाची नेतृत्वाची शैली वेगवेगळी असते," असं संजय राऊत म्हणाले.
पाहा संपूर्ण मुलाखत इथे
'पहले मंदिर, फिर सरकार' या मुद्द्याचं काय झालं, असं विचारल्यावर ते म्हणाले की "सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या मध्यस्थ समितीमुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे, आमचीही तशीच मागणी होती."
पण मंदिराचा विषय संपलेला नाही, तो आम्ही जिवंत ठेवला आहे, असा गर्भित इशाराही द्यायला ते विसरले नाही.
"आम्ही धर्माचं राजकारण केलंच. जोपर्यंत देशात धर्माचं राजकारण सुरू आहे, तो पर्यंत हिंदू-मुस्लीम विषय राहणारच. देशभक्तीच्या लाटेत महागाई, बेरोजगारी हे मुद्दे मागे पडतात. देशात निवडणुकांसाठी जात-पोटजात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे हा देश सेक्युलर राहिलेला नाही, सेक्युलर ही शिवी झाली आहे," असंही राऊत यावेळी बोलताना म्हणाले.
'चौकीदार नाही, आम्ही शिवसैनिकच'
बीबीसी मराठीच्या फेसबुक, ट्विटर, आणि युट्यूबवर हा कार्यक्रम शेकडो लोक लाईव्ह पाहिला. त्यापैकी एकाने 'शिवसैनिक पण स्वतःला चौकीदार समजतात का?' असा प्रश्न विचारला. त्यावर "आम्ही स्वतःला शिवसैनिक समजतो, चौकीदार नाही," असं उत्तर राऊत यांनी दिलं.
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे लोकसभा निवडणूक लढवणार का, या प्रश्नावर, "आदित्य ठाकरेंनी लोकसभा लढवायची की नाही, हे त्यांनी ठरवावं. त्यांच्यासाठी कुठलाही मतदारसंघ आम्ही मोकळा करू शकतो," असं ते म्हणाले.
निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढणार?
गेली साडेचार वर्षं ज्या भाजपवर टीका केली, त्याबरोबरच युती केली, मग निवडणुकीचे मुद्दे काय असणार, असं विचारल्यावर "शिवसेनेचा कोणत्याही जाहीरनाम्यावर विश्वास नाही," असंही राऊत म्हणाले.
"मजबूत विरोधी पक्ष हवा, त्याला पांगळं करून देश चालवावा, या मताचे आम्ही नाही," असंही ते म्हणाले.
प्रियंका गांधी यांच्या राजकारणात एन्ट्रीबाबत बोलताना ते म्हणाले, "प्रियंका या काँग्रेसच्या नेत्या आहेत. पण फक्त त्या काँग्रेसच्या आहेत, म्हणून आम्ही त्यांना विरोध का करावा?" असा प्रश्न त्यांनी विचारला.
कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे -
- सकाळी 11 वाजता : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा
- दुपारी 12 वाजता : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतयांच्याशी चर्चा
- दुपारी 2 वाजता : महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी बातचीत
- दुपारी 3 वाजता : प्रकाश आंबेडकर, नेते, बहुजन वंचित आघाडी, यांच्याशी चर्चा
- दुपारी 4 वाजता : धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद, यांच्याशी चर्चा
- संध्याकाळी 5 वाजता : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी बातचीत
यांपैकी कुठल्याही नेत्याला तुम्हाला प्रश्न विचारायचा असल्यास मुलाखत सुरू असताना त्या लाईव्ह व्हीडिओच्या खाली कमेंट्समध्ये प्रश्न विचारू शकता. ट्विटरवर #राष्ट्रमहाराष्ट्र असा हॅशटॅग वपारूनही तुम्ही मत व्यक्त करू शकता किंवा प्रश्नही विचारू शकता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)