लोकसभा 2019: काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार नाही : पृथ्वीराज चव्हाण यांची कबुली #राष्ट्रमहाराष्ट्र

यापुढे जेव्हाही लोक चौकीदार वाचतील तेव्हा त्यांना 'चौकीदार चोर हैं' आणि रफाल असे शब्द आठवतील, हेच आमचं यश आहे, असं वक्तव्य काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. बीबीसी मराठीच्या राष्ट्र महाराष्ट्र कार्यक्रमात ते बोलत होते.

बीबीसी मराठीच्या या निवडणूक विशेष कार्यक्रमात राज्यातील प्रमुख राजकीय नेते आपापली मतं आणि येत्या निवडणुकांमधली स्वतःची, स्वतःच्या पक्षाची भूमिका मांडत आहेत.

संविधान अस्तित्वात राहणार नाही

बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना या कार्यक्रमात बोलतं केलं. यावेळी नरेंद्र मोदींवर त्यांनी निशाणा साधला.

"मोदींना पुन्हा निर्विवाद सत्ता मिळाली तर लोकशाही आणि संविधान अस्तित्वात राहणार नाही. नरेंद्र मोदींनी ED, CBIशी आघाडी केली आहे. आणि प्रत्येक ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाऱ्यांशी डील केलेली आहे," असा आरोप त्यांनी केला.

पुलवामा आणि बालकोट हल्ल्याबाबत मोदी सरकारच्या भूमिकेबाबतही भाष्य करताना ते म्हणाले, "मोदींनी राष्ट्रीय सुरक्षा हा मोठा मुद्दा केला, ते चांगलं आहे. पण विरोधकांनी किंवा मीडियानं प्रश्न विचारले म्हणजे त्यांना देशद्रोही म्हणणं योग्य आहे का? विरोध करणे आणि प्रश्न विचारणे हे विरोधीपक्षांचं काम आहे. आमचे प्रश्न आर्मीला नाही तर सरकारला आहेत."

नरेंद्र मोदींनी चंद्राबाबू नायडूसारख्या नेत्यांना घमेंडीपणामुळे गमावलं," असं ते म्हणाले.

भाजपनं केलंय स्वत:चं हसं

बहुचर्चित 'मैं भी चौकीदार' मोहिमेबाबतही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "'चौकीदार' कॅम्पेनद्वारे भाजपने स्वतःचं हसं करून घेतलंय. बाहेरच्या देशातले लोक हसताहेत. उद्या जाऊन ट्रंप यांनी आपल्या नावासमोर The Wall-builder Trump असं लावलं तर कसं वाटेल...?" असं ते म्हणाले.

"ज्या ज्या वेळी चौकीदार नरेंद्र मोदी हे येईल तेव्हा तेव्हा चौकीदार चौर है, मोदी, रफाल, हे सगळे शब्द आठवतील," अशा शब्दात त्यांनी चौकीदार मोहिमेचा समाचार घेतला.

काँग्रेससमोरची आव्हानं

आगामी निवडणुकांतील काँग्रेससमोरच्या आव्हानांबाबत बोलताना ते म्हणाले, "आमच्या पक्षासमोर राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय आव्हानं वेगळी आहेत. पक्ष संघटन योग्य पद्धतीनं बांधणं, रस्त्यांवर उतरून आक्रमक आंदोलन करणं, ही पक्षासमोरची आव्हानं आहेत.

"विरोधी पक्ष म्हणून काम करताना सुरुवातीला जड गेलं. आम्ही त्यात कमी पडलो. आम्ही आंदोलनं करायला पाहिजे होती," असंही त्यांनी कबूल केलं.

पाहा संपूर्ण मुलाखत इथे

मराठा आरक्षणाबाबत...

"मराठा आरक्षण लागू होणार नाही, असं मला नक्कीच वाटतं. सरकार एवढं काळ काय झोपलं होतं का? सरकारनं मी केलेला कायदा जशाचा तशा संमत केला. त्यामुळे तो टिकला नाही. त्यात अगदी एक स्वल्पविराम, पूर्णविरामसुद्धा बदलला नाही," असा आरोप त्यांनी केला.

'स्पष्ट बहुमत मिळणार नाही...

"आम्हाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, हे मान्य आहे. पुढचं सरकार हे काँग्रेसच्या नेतृत्वातलं आघाडी सरकार असेल, एवढं मात्र नक्की," असंही ते म्हणाले.

त्याचवेळी, हिंदी भाषिक राज्यात भाजपच्या 100 जागा कमी होतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

लोकसभा लढवण्यासाठी जागा नाही, त्यामुळे मी विधानसभा लढवणार असल्याचंही चव्हाण म्हणाले. "मला काँग्रेसनं खूप काही दिलं आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती मी स्वीकारेन," असं ते म्हणाले.

राज्यातील स्थिती

राज्यातल्या राजकारणाबाबतही ते या मुलाखतीत विस्तृतपणे बोलले. "राज्यातल्या बऱ्याच जागा अशा आहेत, ज्या आम्ही लढवल्या तर त्या आम्ही नक्की निवडून आणू. हे पवार साहेबांना सुद्धा माहिती आहे की अहमदनगर काँग्रेसनं निवडून आणली असती," असं मत त्यांनी व्यक्त केलं.

सुजय विखे पाटील प्रकरणाबाबत ते म्हणाले, "विखेपाटलांनी अहमदनगरमध्ये प्रचार केला नाही तर ती भाजपला अप्रत्यक्ष मदत ठरू शकते हे नक्की.

"प्रकाश आंबेडकर काँग्रेसबरोबर आले नाहीत, ते वेगळे गेले त्यामुळे भाजपला फायदा होईल," असं त्यांनी सांगितलं.

कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे -

  • सकाळी 11 वाजता : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा
  • दुपारी 12 वाजता : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतयांच्याशी चर्चा
  • दुपारी 2 वाजता : महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी बातचीत
  • दुपारी 3 वाजता : प्रकाश आंबेडकर, नेते, बहुजन वंचित आघाडी, यांच्याशी चर्चा
  • दुपारी 4 वाजता : धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद, यांच्याशी चर्चा
  • संध्याकाळी 5 वाजता : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी बातचीत

यांपैकी कुठल्याही नेत्याला तुम्हाला प्रश्न विचारायचा असल्यास मुलाखत सुरू असताना त्या लाईव्ह व्हीडिओच्या खाली कमेंट्समध्ये प्रश्न विचारू शकता. ट्विटरवर #राष्ट्रमहाराष्ट्र असा हॅशटॅग वपारूनही तुम्ही मत व्यक्त करू शकता किंवा प्रश्नही विचारू शकता.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)