You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लोकसभा 2019 : पंकजा मुंडे 'चौकीदार' झाल्या नाहीत कारण...
देशभरात सध्या 'चौकीदार' शब्दभोवती राजकीय घमासान सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या नावामागे 'चौकीदार' हे विशेषण लावल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी तसा बदल स्वतःच्या नावात केला. पण मंत्री पंकजा मुंडे यांनी मात्र स्वतःच्या नावात तसा बदल केलेला नाही. बीबीसी मराठीच्या 'राष्ट्र महाराष्ट्र' या कार्यक्रमात बोलताना त्यांनी यावर खुलासा केला. ट्विटवर होत असलेल्या ट्रोलिंगमुळे हे टाळल्याचं त्यांनी सांगितलं.
या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध प्रश्नांना उत्तर दिली.
"आमच्या सरकाच्या काळात चांगल्या वाईट गोष्टींचं जे अमृतमंथन झालं, त्यातलं विष माझ्या वाट्याला आलं," असं विधान राज्याच्या महिला बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं. बीबीसी मराठीच्या 'राष्ट्र महाराष्ट्र' कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
बीबीसी मराठीच्या या निवडणूक विशेष कार्यक्रमात राज्यातील प्रमुख राजकीय नेते आपापली मतं आणि येत्या निवडणुकांमधली स्वतःची, स्वतःच्या पक्षाची भूमिका मांडत आहेत.
येत्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाची भूमिका, अंगणवाडी सेविका, घोटाळ्यांचे आरोप, सोशल मीडियावरचं ट्रोलिंग मुख्यमंत्रीपदाची शक्यता अशा अशा अनेक विषयांवर बीबीसी मराठीच्या मयुरेश कोण्णूर यांनी पंकजा मुंडे यांच्याशी बातचीत केली.
आपल्यावर होणाऱ्या आरोपांबाबत त्या म्हणाल्या, "मला होणाऱ्या त्रासाची कारणं काय आहेत, याचा विचार मी करत नाही. सामाजिक जीवनात असे शिंतोडे उडणार याची कल्पना मला आहे. ज्या दिवशी विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा झाली, त्याच दिवशी मला पुढच्या काळामध्ये कशी वाटचाल होईल, ते समजलं होतं. माझ्यावर आरोप होणार याची चुणूक तेव्हाच लागली होती. त्यामुळे माझ्यावर आरोप का होतात, लोक कोणत्या मानसिकतेतून आरोप करतात, याचा विचार मी करत नाही," असंही त्यांनी सांगितलं.
तसंच येत्या निवडणुकांमध्ये काही पक्ष रडारवरून दूर होतील आणि माझा विषप्राशनाचा काळ संपेल, अशी टीका त्यांनी धनजंय मुंडे यांचं नाव न घेता केली.
युतीवर बोलताना...
शिवसेना-भाजपा यांच्या युतीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यामध्ये सापा-मुंगसाचं नातं कधीच नव्हतं. आम्ही 25वर्षं व्यवस्थित संसार केला आहे. त्यामुळं दोन्ही पक्षांमध्ये कोणताही बेबनाव नाही."
"मुख्यमंत्री आणि माझ्यामध्येही उत्तम मैत्री आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि भाजयुमोच्या प्रदेशात अध्यक्षपदी काम केलं आहे. माझ्या कोणत्याही निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी दबाव टाकलेला नाही. त्यांनी माझ्या कामात ढवळाढवळ केलेली नाही," असंही ते म्हणाले.
पाहा संपूर्ण मुलाखत इथे
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात आपल्या कार्यकाळात दोन वेळा वाढ झाली, असं त्यांनी आवर्जून सांगत, धनगर समाजाला आमच्या कॅबिनेटच्या निर्णयानं दिलासा मिळेल, असंही मुंडे यांनी सांगितलं.
'मुख्यमंत्री होण्याची मनिषा नाही'
पंकजा मुंडे या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार का, असा प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या, "मला मुख्यमंत्री होण्याची कोणतीही इच्छा नाही. मी जिथे जाते तिथे मला मुख्यमंत्रिपदाचा आशीर्वाद दिला जातो. पण मुख्यमंत्री होण्याची ताकद माझ्यामध्ये नेहमी असावी, ही माझी इच्छा आहे."
मुंडे आडनाव असल्यामुळे माझ्यावर लोकांचं विशेष लक्ष होतंच, शिवाय मी लोकांसाठी लक्ष्यही झाले, असं त्या म्हणाल्या. मात्र राजकारणातल्या घराणेशाहीवर त्या म्हणाल्या, "लादलेल्या घराणेशाहीला माझा विरोध आहे. मात्र चांगले सुशिक्षित तरुण नेते राजकारणात येत असतील आणि त्यांना जनाधार मिळत असेल तर त्यात काहीच वाईट नाही."
'चौकीदार टॅगमुळे ट्रोल'
"पंतप्रधान प्नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात पायाभूत सुविधांचा भरपूर विकास झाला. जलसिंचन योजना, उज्ज्वला योजना, जनधन योजना, सौभाग्य योजना अशा यशस्वी योजना राबवल्या गेल्या आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच देशाचे चौकीदार म्हणून त्यांनी गेली चार वर्षं काम केलं आहे," असं त्या म्हणाल्या.
"सुरुवातीला मी सुद्धा 'मैं भी चौकीदार' मोहिमेमध्ये सामील झाले होते. मात्र ट्रोल झाल्यामुळे मी तो टॅग नंतर वापरला नाही. मला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात असल्यामुळं त्याचा तोटा चौकीदार मोहिमेला होईल, असं वाटल्यामुळं मी या मोहिमेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
"सोशल मीडिया वापरण्यासाठी काही परिपक्वता असावी तसंच त्याचे काही नियमही असावेत. सोशल मीडियाचा मी दररोज 10 मिनिटांपेक्षा जास्त वापर करत नाही," असे सांगून पंकजा यांनी ट्रोलिंगवर चिंता व्यक्त केली. मात्र "मी ट्रोल्सना घाबरत नाही," असंही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे -
- सकाळी 11 वाजता : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा
- दुपारी 12 वाजता : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतयांच्याशी चर्चा
- दुपारी 2 वाजता : महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी बातचीत
- दुपारी 3 वाजता : प्रकाश आंबेडकर, नेते, बहुजन वंचित आघाडी, यांच्याशी चर्चा
- दुपारी 4 वाजता : धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद, यांच्याशी चर्चा
- संध्याकाळी 5 वाजता : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी बातचीत
यांपैकी कुठल्याही नेत्याला तुम्हाला प्रश्न विचारायचा असल्यास मुलाखत सुरू असताना त्या लाईव्ह व्हीडिओच्या खाली कमेंट्समध्ये प्रश्न विचारू शकता. ट्विटरवर #राष्ट्रमहाराष्ट्र असा हॅशटॅग वपारूनही तुम्ही मत व्यक्त करू शकता किंवा प्रश्नही विचारू शकता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)