लोकसभा निवडणूक 2019 : रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपमध्ये जाऊन काय साध्य करतील?

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेतील माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी दुपारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांचे वडील माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील काय भूमिका घेतात याची राज्यात उत्सुकता आहे. काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तिच पुनरावृत्ती आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाली आहे.

शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे मोहिते पाटील भाजपमध्ये गेल्याने सोलापूर जिल्हा आणि माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीसाठी मोठा झटका मानला जात आहे. तर दुसरीकडे स्थानिक भाजपचे पदाधिकारी सावध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

"आज (बुधवार) साडेबारा वाजता वानखेडे स्टेडियमच्या इथे गरवारे जिमखाना म्हणून भाग आहे. त्याठिकाणी आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी वेळ दिलेली आहे. साडेबारा वाजता आपण सर्वांनी तिथं यावं, ही विनंती करतो," असं रणजितसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलं होतं.

अकलूजमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी मंगळवारी हे आवाहन केलं. 'यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश करायचा का?' असा प्रश्न रणजितसिंह यांनी विचारल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकाच घोषात 'हो' असं म्हटलं.

माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सोलापुरात मंगळवारी दिवसभर सुरू होती. विजयसिंह मोहिते पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना मेळाव्यात निर्णय होईल, असं मोघम उत्तर दिलं होतं.

राज्याच्या राजकारणात जी काही मातब्बर घराणी आहेत, त्यात मोहिते-पाटील घराण्याचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. विजयसिंह मोहिते पाटील सध्या या मतदारसंघात खासदार आहेत. याच मतदारसंघात 2009साली शरद पवार खासदार होते.

विजयसिंह मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री, पर्यटनमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम अशी खाती सांभाळलेली आहेत. तर त्यांचे पुत्र रणजितसिंह राष्ट्रवादीचे राज्यसभेवर खासदार होते.

यावेळी माढ्यातून स्वतः शरद पवार निवडणूक लढवणार होते. पण नंतर त्यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली. माढ्यातून जर शरद पवार लढणार नसतील, दुसरा उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता.

राष्ट्रवादीने आतापर्यंत अजूनही माढ्यातून उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यातच निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार, अशा चर्चाही माढ्यात सुरू होत्या. तर राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या मतदारसंघावर हक्क सांगितला आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांचा गट मोहिते पाटील यांना कडवा विरोध आहे. बबन शिंदे यांचे बंधू संजय शिंदे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. तसेच जिल्ह्याच्या राजकारणात परिचारक गटही मोहिते पाटील यांच्या विरोधात आहे.

जिल्ह्यात एकमेकांना शह-काटशह देण्याच्या प्रयत्नातून मोहिते पाटील यांना एकटे पाडण्याचा प्रयत्नही गेल्या काही वर्षांत सातत्याने झाला, त्यातून मोहिते-पाटील नाराज झाले, अशी माहिती मोहिते-पाटील यांच्या एका निकटवर्तीयाने दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांच्याशी बीबीसी मराठीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

तत्पूर्वी, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी यासंदर्भात माहिती नसल्याचं सांगितलं. "वरिष्ठांच्या पातळीवर काही निर्णय झाला असेल तर त्याची कल्पना मला नाही. पण आम्ही पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते आहोत, पक्ष देईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल. त्यांना जर पक्षात घेतलं तर त्यांनाच तिकीटही द्यावं."

"विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू दिवंगत प्रतापसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये होते. पण 2004ला त्यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला. ही पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये, अशी अपेक्षा आहे," असं शहाजी पवार बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.

मोहिते पाटील घरण्याचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील यांना निर्णय घ्यावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती, अशी माहिती दैनिक पुण्यनगरीच्या पुणे आवृत्तीचे संपादक श्रीकांत साबळे म्हणाले. साबळे यांनी सोलापुरात पत्रकारिता केली आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "मोहिते पाटील घराण्याची पश्चिम महाराष्ट्रात जी ताकद होती, तिला गेल्या काही वर्षांत ओहोटी लागली होती. त्याला मोहिते पाटील यांचे दुसऱ्या फळीतील नेतृत्व अधिक जबाबदार आहे. घराण्याची राजकीय प्रतिष्ठा आणि ताकद पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)