राधाकृष्ण विखे पाटील : सुजयच्या विरोधात अहमदनगरमध्ये प्रचार करणार नाही

मुलाच्या विरोधात अहमदनगरमध्ये प्रचार करणार नाही, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

"ज्या पद्धतीने माझ्या हयात नसलेल्या वडिलांवर पवारांनी इतकी टीका केली. त्यांच्या मनात अजून एवढा राग आहे तर मी अहमदनगरला कशाला प्रचार करू? मी प्रचाराला गेलो तर अजून त्यांच्या मनात काही येईल," असं स्पष्टीकरण विखेंनी दिलं आहे.

तसंच माझ्या राजीनाम्याबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असं त्यांनी म्हटलंय.

"माझ्या मुलाने वेगळ्या पक्षात जावं किंवा नाही अशी कुठलीही भूमिका मांडण्यात आली नव्हती. याबाबत माझ्याशी चर्चा झाली नव्हती. शरद पवार यांनी बाळासाहेब विखेंबाबत केलेलं विधान दुर्दैवी आहे," असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

"शरद पवार यांनी माझे वडील बाळासाहेब विखे-पाटील यांच्यावर १९९१च्या निवडणुकीचा संदर्भ देऊन टीका केली. शरद पवार यांच्या विधानामुळे दुःख झालं आहे, जे हायत नाहीत त्यांच्याबद्दल असं बोलणं योग्य नाही. अहमदनगरच्या दोन्ही जागा काँग्रेसकडे आल्या असत्या तर काही गैर झालं नसतं," असंही त्यांनी म्हटलं आहे.

पवारांनी सलग दोनवेळा असं विधान केल्याने सुजयने जो निर्णय घेतला तो त्याचा व्यक्तिगत निर्णय आहे, अशी सूचक प्रतिक्रियासुद्धा त्यांनी दिली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या महत्त्वाच्या जागा निवडून येतील हे पाहूनच जागांची मागणी कॉंग्रेसने केली होती. नगरच्या जागेवर सलग तीन वेळा राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. आघाडीमध्ये लढतोय तर जास्तीतजास्त जागा निवडून येतील हे बघितलं पाहिजे होतं, असंही ते म्हणाले.

"ते काय माझे हायकमांड नाहीत," असं वक्तव्य त्यांनी बाळासाहेब थोरत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना केलंय.

याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, "मी बाळासाहेब थोरात यांना स्पष्टीकरण द्यायला बांधील नाही. ते काही हायकमांड नाहीत. मला जे स्पष्टीकरण द्यायचे आहे ते मी हायकमांडला देईन. त्यांनी कॉंग्रेस पक्षाविरोधात काय कारवाया केल्या हे नंतर बोलूच... तो आताचा विषय नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)