विखे पाटील निष्ठावान आहेत का हे पाहायचंय - बाळासाहेब थोरात #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. विखे निष्ठावान आहेत का हे पाहायचंय: बाळासाहेब थोरात

"राधाकृष्ण विखे हे काँग्रेसशी निष्ठावान आहेत का, हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे," असं वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

"काँग्रेस पक्षानं विखे-पाटील कुटुंबाला भरभरून दिल. बाळासाहेब विखेंना खासदार, राधाकृष्ण विखेंना मंत्री, विरोधीपक्ष नेते, शालिनीताई विखे यांना जिल्हा परिषद अध्यक्ष केलं. त्यामुळं सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश करायला नको होता. खरंतर सुजय यांच्या या निर्णयाचा राधाकृष्ण विखे यांनी सर्वप्रथम निषेध करायला हवा," असं थोरात यांनी म्हटलं आहे.

"भाजपचं कमळ हातात येताच सुजय विखेंचे सूर बदलले आहेत. भाजपवर टीका करणारे आता त्या पक्षाची विचारधारा आवडल्याचं सांगत आहेत. खरंतर मुलानं हट्ट केला होता तर वडिलांनी त्याला समजावायला हवं होतं," असंही थोरात यांनी म्हटलंय.

2. कॉल मी राहुल....असं राहुल यांनी म्हटलं आणि...

"कायद्याची अंमलबजावणी निवडकपणे व्हायला नको. रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी होऊ शकते, त्याप्रमाणे रफालप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचीही चौकशी व्हायला हवी," असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

चेन्नई येथील विद्यार्थिनींशी राहुल गांधी यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

"काँग्रेस सत्तेवर आल्यास महिला आरक्षण विधेयक मंजूर केलं जाईल," असं आश्वासनही राहुल गांधी यांनी दिलं आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांना एक तरुणी प्रश्न विचारत असताना तिनं राहुल सर... अशी सुरुवात केली. तेव्हा तिला मध्येच थांबवत राहुल यांनी मला सर म्हणून नकोस, फक्त राहुल म्हण. मला जास्त कंफर्टेबल वाटेल, असं म्हटलं.

यानंतर त्या तरुणीनं 'ओके राहुल,' असं म्हणत तिचा प्रश्न विचारला.

3. पक्षानं जबाबदारी द्यावी, बारामती जिंकून दाखवेल : गिरीश महाजन

"पक्षानं जबाबदारी द्यावी, माझ्याकडे स्किल आहे, बारामती जिंकून दाखवेल," असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

महाजन म्हणाले की, "आज अशक्य काहीच नाही. कुणाची मक्तेदारी कुठेच नाही. आम्ही ज्या ठिकाणी काहीच नव्हतो त्या ठिकाणी सत्ता प्राप्त केली आहे."

दरम्यान, गिरीश महाजन यांचा पळवापळवी हाच धंदा असून ईव्हीएममध्ये घोटाळा झाला तरच हे लोक बारामती जिंकू शकतात. कारण लोकांच्या बळावर बारामती जिंकणे यांना शक्य नाही, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलं आहे.

4. फेब्रुवारी महिन्याचं कर्मचाऱ्यांचं वेतन देण्यात BSNL अपयशी

आर्थिक संकटामुळे सरकारी कंपनी बीएसएनएल फेब्रुवारी महिन्यात 1.76 लाख कर्मचाऱ्यांचं वेतन देऊ शकली नाही. द इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

सरकारनं लवकरात लवकर वेतन देण्यासाठी निधी जाहीर करावा, अशी विनंती पत्राद्वारे बीएसएनएलच्या कर्मचारी संघटनेनं दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांना केली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांनी निदर्शनंही केली आहेत.

"रिलायन्स जिओमुळे मिळणाऱ्या स्पर्धेमुळे कंपनी आर्थिक संकटात आहे. इतर कंपन्यांनाही नुकसान होत आहे, पण मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून ते यातून मार्ग काढत आहेत," असं या पत्रात म्हटलं आहे.

5. नंतर पश्चाताप करण्यापेक्षा मतदान करा - नरेंद्र मोदी

"मतदार यादीत नाव नोंदणी, नाव मतदार यादीत आहे की नाही याची खात्री, मतदानादिवशी इतर कोणताही प्लॅन न करणे आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देणं," या महत्त्वाच्या बाबी लक्षात घेण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्लॉगच्या माध्यमातून केलं आहे. सकाळनं ही बातमी दिलीय.

"पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांसाठी हा सेलिब्रेशनचा दिवस असला पाहिजे. मतदानासाठी सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मतदानपत्र मिळणे आणि मतदान करणे ही सर्वंना गर्वाची गोष्ट वाटावी अशी वातावरण निर्मिती व्हावी," असंही मोदींनी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)