You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लोकसभा 2019 : मावळ मतदारसंघात पार्थ पवारांसमोर कुठली आव्हानं आहेत?
- Author, हलिमा कुरेशी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मावळ मतदारसंघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना लोकसभेसाठी उमेदवारी मिळणार, हे आता स्पष्ट झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवीन पिढीला संधी देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं.
पार्थ पवार यांनी कार्ला गडावर जाऊन एकवीरा देवीच दर्शन घेत मावळ दौऱ्याला सुरुवातही केली आहे.
"एकाच कुटुंबातून किती जणांनी निवडणूक लढवायची याबद्दल आम्ही चर्चा केली. माझी राज्यसभेची मुदत शिल्लक आहे. त्यामुळे स्वतः निवडणुकीला उभं न राहता नव्या पिढीतले जे लोक काम करताहेत त्यांना संधी द्यावी असा निर्णय मी घेतला," असं शरद पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.
मावळ मतदार लोकसभा मतदार संघात पार्थ पवार गेले सहा महिने संपर्क दौरे करत आहेत. अनेक स्थानिक कार्यक्रमांमध्ये हजार राहिले आहेत. या भागात त्यांचा चांगला जनसंपर्क तयार झाला आहे.
"गेल्या सहा महिन्यांपासून पार्थ पवार यांनी मावळ मतदार संघ पिंजून काढलाय. तरुण कार्यकर्त्यांनी पार्थ पवार यांच्या नावाची शिफारस करण्याविषयी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार शेतकरी कामगार पक्षाने शरद पवार यांना त्यासंबंधी सांगितलं. शरद पवार यांनी या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता," असं शेकापचे राज्य अध्यक्ष जयंत पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
मावळ मतदारसंघातील राजकीय गणितं
मावळ लोकसभा मतदार संघातील सहा विधान सभांपैकी पाच विधानसभा मध्ये शिवसेना भाजपाचे आमदार आहेत. भाजपाचे तीन आणि शिवसेनेचे दोन आमदार आहेत. तर केवळ कर्जत विधानसभेत राष्ट्रवादीचे सुरेश लाड आमदार आहेत.
"मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचा उमेदवार असेल की भाजपचा हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. हा मतदारसंघ जर भाजपला मिळाला तर लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त आहे. लक्ष्मण जगताप पार्थ पवारांना जोरदार टक्कर देऊ शकतात," असं मत ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केलं."
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. शेकाप आणि मनसेच्या पाठिंब्यावर उभे राहिलेले अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप यांना ३ लाख ५४ हजार ८२९ मते मिळाली होती. शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे तब्बल ५ लाख १२ हजार २२६ मतांनी विजयी झाले होते.
मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पुणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. रायगडमधील पनवेल, उरण आणि कर्जत तर पुण्यातील मावळ, पिंपरी आणि चिंचवडचा समावेश मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये होतो. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बऱ्यापैकी प्रभावी आहे, तर रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव आहे.
"उमेदवार जर शेतकरी कामगार पक्षाचा असेल तर त्याला शेकाप समर्थकांची एकगठ्ठा मतं मिळतात. मात्र दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला अशी एकगठ्ठा मतं मिळत नाहीत," असं मत ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केलं.
जर ही जागा शिवसेनेला मिळाली तर श्रीरंग बारणे उमेदवार असतील. मात्र नाराज लक्ष्मण जगताप बारणेंना सहकार्य करतील का याबद्दलही देशमुख यांनी शंका व्यक्त केली.
युतीच्या उमेदवारांमध्ये समन्वय राखण्यासाठी दोन्ही पक्षांकडून समन्वयक नेमण्यात आले आहेत. मावळसाठी शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट काम पाहत आहेत.
"राष्ट्रवादी एवढी हतबल झाली आहे की त्यांना स्वत: च्या कुटुंबातील माणूस दिल्याशिवाय पर्याय नव्हता. गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या राहुल नार्वेकरांना आयात करण्यात आलं होतं. आम्ही व्यक्ती म्हणून प्राधान्य देण्यापेक्षा पक्ष म्हणून उमेदवारांकडे पाहतो, असं नीलम गोऱ्हे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या.
राष्ट्रवादीला पार्थ यांच्या उमेदवारीचा किती फायदा होणार?
"गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये आम्ही मावळ मतदारसंघातून हरलो होतो. 2014 च्या निवडणुकीत तर आम्हाला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. त्यामुळे यावेळी तरुण उमेदवार दिल्यानंतर तरुणाईचा पाठिंबा आम्हाला निश्चित मिळेल," असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केला.
"एकाच कुटुंबातून किती जणांनी निवडणूक लढायची हा प्रश्न आहे. त्यामुळे नवीन नेतृत्वाला संधी द्यायला हवी, असं मत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं होते. त्यांनी त्याप्रमाणेच निर्णय घेतला," असंही नवाब मलिक यांनी म्हटलं.
"मावळमध्ये पवार घराण्यातील उमेदवार देणं हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी निश्चितच फायद्याचं ठरू शकेल. या भागात राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत गटबाजी आहे. मात्र पवार कुटुंबातील उमेदवार असल्यानं सर्वच जण एकत्र येऊन काम करणार. पक्षाला एकसंध ठेवण्यासाठी याचा निश्चित फायदा होईल," असं मत ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार यांनी व्यक्त केलं.
मात्र मावळमध्ये पार्थ पवार यांच्यासमोर आव्हानही तेवढंच आहे. महानगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समित्यांमध्ये गेल्या पाच वर्षांत भाजप-शिवसेनेचं बळ वाढल्याचं चित्र आहे. अजित पवार यांनी केलेली विकासकामं आणि जनसंपर्क यांच्या बळावर पार्थ पवार यांना मावळची जागा लढवावी लागणार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)