You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुजय विखे-पाटीलः सोयीचं राजकारण करत नाही, आमच्या घराण्याची वेगळी विचारधारा
"मी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याने माझे वडील माझ्याशी बोलत नाहीत. पण मी वेळेवर त्यांना माझा निर्णय पटवून देईन" असं म्हणत सुजय विखे-पाटील यांनी आपल्या भाजपा प्रवेशाचं समर्थन केलंय.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर सुजय विखे-पाटील यांनी बीबीसीला पहिल्यांदा मुलाखत देताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
ते म्हणाले की, "मी 37 वर्षांचा आहे. आणि माझे निर्णय मी घेऊ शकतो. माझे वडील माझ्यासोबत नाहीत. पण वेळ आल्यानंतर मी त्यांना पटवून देईन. माझी पत्नी माझ्याबरोबर आहे. अर्थातच माझा निर्णय मान्य नसल्याने माझे वडील प्रचार यंत्रणेत सहभागी होणार नाहीत. पण ते बोलायला लागले तर मी त्यांचा सल्ला घेईन. शिवाय त्यांच्या विधानसभा प्रचाराची जबाबदारी माझ्यावर असायची. आता त्यांना नवा माणूस शोधावा लागेल."
राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर होती का?
राष्ट्रवादी काँग्रेसची तुम्हाला ऑफर होती, मग ती का स्वीकारली नाही? तुम्ही भाजपाचा मार्ग का धरलात? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, "मला कधीही राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर नव्हती. मला माहिती नाही की राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कुणाशी चर्चा केली. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. पण काल त्यांनी माझ्या आजोबांवर जे भाष्य केलं ते योग्य नाही. आजोबा हयात नसताना त्यांच्यावर अशी टीका करू नये"
दिलीप गांधी यांचं काय करणार?
नगर दक्षिणमधून सलग दोनवेळा दिलीप गांधी यांनी निवडणूक जिंकली आहे. आता या जागेवर सुजय विखे यांना संधी मिळणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यावर सुजय म्हणाले की, "मी दिलीप गांधींना समजावून सांगेन. ते मला नक्की समजून घेतील. भाजपात त्यांच्यासोबत आम्ही काम करू."
विखे पाटलांचं राजकाऱण सोयीचं आहे का?
याआधी सुजय विखे यांच्या आजोबांनी म्हणजे बाळासाहेब विखे-पाटील यांनीही ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करून मंत्रिपद मिळवलं होतं. त्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांना विरोधी पक्षनेतेपद मिळावं म्हणूनही दबावाचं राजकारण केल्याचं राजकीय वर्तुळातील लोक सातत्यानं म्हणत असतात. त्यावरही सुजय विखे यांनी भाष्य केलं आहे.
ते म्हणाले की, "तुम्ही म्हणता की विखे-पाटील घराण्याने कायम सोयीचं राजकारण केलं आहे. पण लोकांनी नेहमीच विखे-पाटील यांच्या बाजूनं कौल दिला आहे. माझ्या आजोबांनी पक्ष बदलला तेव्हाही लोकांनी माझ्या आजोबांनाच साथ दिली. आणि आताही मी भाजपची पूर्ण विचारधारा स्वीकारली असं नाही. कारण आमची विखे-पाटील घराण्याचीही वेगळी विचारधारा आहे."
सुजय विखे-पाटील यांची पूर्ण मुलाखत पाहा.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)