You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवारांपुढे माढाचा पेच : उमेदवारीसाठी रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या वाटेनं जाणार?
महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, असं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं.
सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी हे ट्वीट केलं असलं, तरी आव्हाड यांच्या पक्षालाही सावध रहावं लागेल अशी चिन्हं आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हेदेखील भाजपच्या वाटेनं जाऊ शकतात.
रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मंगळवारी भाजप नेते गिरीश महाजन यांची भेट घेतल्यामुळं त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या. माढा मतदारसंघातील उमेदवारीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. माढामधून विजयसिंह मोहिते पाटील हे खासदार असून यावेळेही आपल्याच घरात उमेदवारी रहावी यासाठी रणजितसिंह मोहिते-पाटील प्रयत्नशील आहेत.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण माढ्यामधून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यासाठी शरद पवारांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला. शरद पवारांनी माघार घेतल्यानंतर माढ्यामधून कोणाला उमेदवारी मिळणार, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना माढ्यामधून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली गेल्यानं रणजितसिंह मोहिते पाटील यांनी गिरीश महाजनांची भेट घेतली. हा पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न असू शकतो, असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
रणजितसिंह मोहिते पाटलांचं दबावतंत्र?
"माढा मतदारसंघात आधीपासूनच गटबाजी होती. बबनदादा शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामध्ये अंतर्गत वाद होते. एकाला तिकीट दिलं असतं, तर दुसऱ्या गटाकडून बंड होण्याची शक्यता होती. हा वाद टाळण्यासाठी शरद पवार यांनी स्वतःच माढ्यामधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या माघारीमुळे पुन्हा एकदा ही गटबाजी उफाळून येऊ शकते," असं मत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी व्यक्त केलं.
"अशा परिस्थितीत पक्षावर दबाव टाकण्यासाठी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली असावी. वडिलांना किंवा आपल्याला उमेदवारी नाही मिळाली तर सुजय विखे पाटलांप्रमाणेच आपणही भाजपमध्ये जाऊ शकतो, असा इशारा रणजितसिंह यांनी पक्षाला दिला आहे. नगर आणि माढा मतदारसंघांमध्ये बराच फरक आहे," असंही अभय देशपांडे यांनी म्हटलं.
माढ्यामधील उमेदवारीबाबत आपला खुंटा बळकट करून घेण्यासाठी म्हणून रणजितसिंह यांनी गिरीश महाजनांची भेट घेतली असावी. यामध्ये दबावतंत्राचाच भाग अधिक आहे. अर्थात, उमेदवारी जाहीर झाल्यानंतरचं चित्र काय असेल हे पाहणंही औत्सुक्याचं असेल, असं मत लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान यांनी व्यक्त केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये जाण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली. रणजितसिंह असं कोणतंही पाऊल उचलणार नाहीत, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.
भेटीबद्दल गिरीश महाजन काय म्हणतात?
गिरीश महाजन यांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी बोलताना रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या शक्यता फेटाळून लावल्या. साखर कारखान्याच्या सबसिडीची चर्चा करण्यासाठी रणजितसिंह आले असल्याचं त्यांनी म्हटलं.
महाजनांशी झालेल्या भेटीसंबंधी अधिक माहिती घेण्यासाठी बीबीसी मराठीनं रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संवाद होऊ शकला नाही.
'...तर आम्हाला माढ्याची जागा हवी'
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीसोबतच माढ्याच्या जागेला एक तिसरा कोनही आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडे माढ्याच्या जागेची मागणी केली होती.
"शरद पवारांनी माढ्यामधून लोकसभा निवडणूक लढविण्याची मागणी केल्यामुळं आम्ही मागे हटलो होतो. मात्र जर आता शरद पवार निवडणूक लढवणार नसतील, तर माढा मतदारसंघ आमच्यासाठी सोडावा, अशी आमची मागणी आहे. अर्थात, माढ्यापेक्षाही आमचं प्राधान्य हे बुलडाण्याच्या जागेला असेल. जर बुलडाण्याची जागा नाही मिळाली, तर आम्ही माढासाठी आग्रह करू," अशी भूमिका खासदार राजू शेट्टी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केली.
नवीन पिढीची अपरिहार्यता
सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेश आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी गिरीश महाजन यांची घेतलेली भेट या पार्श्वभूमीवर राजकीय घराण्यातील नवीन पिढीच्या अपरिहार्यतेवरही संदीप प्रधान यांनी भाष्य केलं.
"खरं नेत्यांची पुढची पीढी सुशिक्षित आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातलं शिक्षण त्यांनी घेतलं आहे. मात्र तरीही राजकारणात येणं ही त्यांची अपरिहार्यता आहे. कुटुंबानं जे राजकीय साम्राज्य उभं केलं आहे, ते टिकवून ठेवण्यासाठी निवडून येणं आवश्यक असतं. त्यामुळे प्रत्येकच पक्षातील वडिलांची प्राथमिकता आपल्या मुलांची राजकीय कारकीर्द कशी स्थिर होईल, हीच असते. पक्षीय बांधिलकी, विचारधारा या गोष्टी दुय्यम ठरतात," असं संदीप प्रधान यांनी म्हटलं.
"याचा दूरगामी फटका सर्वच पक्षांना बसू शकतो. आज आपल्या विस्तारासाठी भाजप जी धोरणं अवलंबत आहे, उद्या वरचढ झाल्यानंतर काँग्रेसही हेच करू शकतो," असं मतही प्रधान यांनी व्यक्त केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)