You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नीला विखे -पाटील यांची स्वीडन पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून निवड
नीला विखे-पाटील यांची स्वीडन पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांनी ट्वीट करून या बाबीला दुजोरा दिला आहे.
कोण आहेत नीला विखे-पाटील?
नीला विखे-पाटील(32) या काँग्रेस नेते बाळासाहेब विखे-पाटील यांची नात आहेत. बाळासाहेब विखे-पाटील यांचे पुत्र अशोक-विखे पाटील यांच्या त्या कन्या आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, अशोक एकदा एका बिझनेस ट्रिपसाठी स्टॉकहोमला गेले. तेव्हा त्यांची आणि ईवा लील यांची भेट झाली. नंतर या दोघांनी लग्न केलं. नीला या अशोक आणि ईवा-लील यांच्या कन्या आहेत.
अशोक विखे-पाटील याबाबत सांगतात, "माझं आणि ईवाचं लग्न स्वीडनमध्ये झालं. विखे साहेबही आमच्या लग्नाला उपस्थित होते. रिसेप्शन मात्र भारतात झालं. अगदी सत्यनारायणाची पूजा करून. नीलाचा जन्म स्वीडनमध्ये झाला. एक वर्षाची असताना ती भारतात आली. त्यानंतर वयाच्या आठव्या वर्षापर्यंत ती इथेच होती."
काही कालावधीनंतर अशोक आणि ईवा एकमेकांपासून वेगळे झाले. नंतर ईवा स्वीडनला परत गेल्या. तेव्हा नीलासुद्धा आईबरोबर स्वीडनला गेल्या.
अशोक विखे-पाटील हे Vikhe Patil Foundationचे अध्यक्ष आहे. या Foundationच्या माध्यमातून 102 शैक्षणिक संस्था महाराष्ट्रात चालवल्या जातात.
नीला यांचं शिक्षण
Gothenburg School of Economicsमधून नीला यांनी MBAचं शिक्षण घेतलं आहे.
अशोक विखे-पाटील सांगतात, "नीला खूपच निश्चयी आहे. तिनं इंग्रजी, स्वीडिश आणि स्पॅनिश असं तीन भाषांमध्ये मिळून MBA केलं. शिक्षणानंतर तिनं पुण्यात एक वर्ष कामंही केलं."
नीला यांचं राजकारण
वयाच्या 16व्या वर्षी नीला यांनी स्वीडनमधील ग्रीन पार्टीमध्ये प्रवेश केला. 2016मध्ये वयाच्या 30व्या वर्षी त्यांना पहिल्यांदा पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून नेमण्यात आलं.
"माझ्या नातीची पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून निवड झाल्यामुळे मला आनंद झाला आहे. ती कुटुंबाची राजकीय परंपरा पुढे नेत आहे, याचा मला अभिमान वाटत आहे," असं त्यावेळी बाळासाहेब विखे-पाटील यांनी म्हटलं होतं.
नीला यांच्या राजकारणाविषयी अशोक सांगतात, "नीला ग्रीन पार्टीची सदस्य आहे. Stockholm city council साठी तिची सदस्य म्हणून निवड झाली आहे. नीला आता स्वीडनचे नवनिर्वाचित पंतप्रधान आणि सोशल डेमोक्रॅट पक्षाचे नेते स्टीफन लोफव्हन यांच्यासोबत काम करणार आहे.
"सोशल डेमोक्रॅट पक्षानं ग्रीन पार्टीशी आघाडी करून स्वीडनमध्ये सरकार स्थापन केलं आहे. स्वीडनच्या संसदेत तिच्या पक्षाकडून ती फर्स्ट रिझर्व्ह आहे. म्हणजे संसदेतील तिच्या पक्षाचा एखादा खासदार आजारी पडला अथवा निवृत्त झाला, तर त्याची भूमिका ती निभावू शकते. सध्या तिच्याकडे फायनान्शियल मार्केट, घटनात्मक समस्या आणि हाऊसिंग या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत."
'बाळासाहेब विखे-पाटील आदर्श'
आजोबा बाळासाहेब विखे-पाटील आणि भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम त्यांचे आदर्श आहेत.
"माझे आजोबा एक आदर्श माणूस होते. त्यांच्याबरोबर मी अनेकदा राजकारण आणि एकंदरीत आयुष्यावर चर्चा केली आहे," नीला सांगतात.
बाळासाहेब विखे-पाटील यांचं 30 डिसेंबर 2016ला निधन झालं.
तर अब्दुल कलाम यांच्याविषयी त्या सांगतात, "कलाम यांचं व्यक्तिमत्व भारावून टाकणारं आहे. प्रचंड बुद्धिमान असं त्यांचं व्यक्तित्व होतं."
बाळासाहेबांचा नीलामध्ये खूप जीव होता, असं अशोक सांगतात. ते म्हणतात, "बाळासाहेब शेवटच्या दोन-तीन वर्षांमध्ये दर आठवड्याला तिला फोन करायचे. ती त्यांच्या खूप जवळ होती. त्यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमालासुद्धा ती आली होती. आज बाळासाहेब असते, तर त्यांना खूपच आनंद झाला असता की, नात त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांच्या विचारानं काम करतेय."
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे नीला यांचे काका आहेत. नीला यांच्याबाबत ते सांगतात, "नीलाची स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात निवड झाली आहे. ही आमच्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. खरं तर नीलाची तिच्या आजोबांशी खूप जास्त अटॅचमेंट होती. आज जर बाळासाहेब असते, तर त्यांना खूप आनंद झाला असता."
देशाशी नाळ कायम
"आमच्या आईला भेटायला ती वर्षातून एकदा येते. तिला मराठी थोडफार येतं. शिवाय मराठमोळा स्वयंपाकही जमतो," असं अशोक सांगतात.
तर "मला भारत आवडतो आणि आजही मी माझ्या देशासोबत जोडलेली आहे. मला पिठलं भाकरी आणि वरणभात आवडतं," असं नीला सांगतात.
"मी अनेकदा भारतात येत असते. भारतीय पौराणिक कथा आणि इतिहास वाचायला मला आवडतो. याशिवाय मी योगाही करते," त्या पुढे सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)