टॉयलेट, चेंजिंग रूममध्ये कुणी तरी पाहतंय तुमच्याकडे

    • Author, लॉरा बिकेर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी सोल

दक्षिण कोरियातील छुप्या कॅमेऱ्याबद्दल जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेव्हाचा प्रसंग मला अजूनही आठवतो.

मी जेव्हा सोल (दक्षिण कोरियाची राजधानी) इथल्या हॅन नदीच्या जवळ बाईकवर एका मैत्रिणीसोबत जात होते. मला एका सार्वजनिक स्वच्छतागृहात जायचं होतं.

"तिथे कॅमेरा नाहीये ना हे एकदा तपासून बघ," ती ओरडली. मी तिच्याकडे वळून पाहिलं आणि हसायला लागले. पण ती विनोद करत नव्हती.

दक्षिण कोरियात गेल्यावर अनेक स्त्रियांनी सांगितलं आहे की त्या प्रसाधनगृहात गेल्यावर तिथे छुपं छिद्रं किंवा कॅमेरा आहे का हे आधी तपासतात.

कारण या देशात अशा छुप्या कॅमेरे बसवण्याची जणू साथच पसरली आहे.

हे छुपे कॅमेरे महिलांच्या आणि कधी पुरुषांच्या हालचाली टिपतात. कधी कपडे काढताना, कधी प्रसाधनगृहात जाताना, कपड्यांच्या दुकानात ट्रायल रूममध्ये जाताना, जिम आणि स्विमिंग पूलमध्ये जाताना हालचाली टिपल्या जातात. नंतर हे व्हीडिओ पॉप अप पॉर्न साईटवर टाकले जातात.

छुपे कॅमेरे आणि पॉर्न हा आजार आणखी न पसरण्यासाठी काही केलं नाही तर हा धोका आणखी वाढेल आणि ते रोखणं कठीण जाईल, असा इशारा इथल्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

दरवर्षी अशा जवळपास 6000 तक्रारी पोलिसांकडे येतात. या पीडितांमध्ये 80 टक्के महिला आहेत.

असं असलं तरी हजारो लोक अजूनही आपली व्यथा सांगण्यासाठी पुढे येत नाही, असंही सांगितलं जातं. काही प्रकरणांत मित्रांनी किंवा जवळच्या व्यक्तींनीच छुप्या कॅमेऱ्यांनी हालचाली टिपण्याचे प्रकार उघडकीला आले आहेत.

बीबीसीने किम नावाच्या एका स्त्रीशी संपर्क साधला. हॉटेलच्या एका टेबलखाली ठेवलेल्या कॅमेऱ्याने तिचं शुटिंग केलं होतं. तिचा स्कर्टचा आतला भाग दिसेल अशा पद्धतीने तो कॅमेरा लावला होता. त्यांना तो दिसला आणि त्यांनी त्याचा फोन हिसकावला. फोनमध्ये त्यांना तिचे इतर फुटेज दिसले आणि इतर पुरुष त्यावर चर्चा करत होते.

"मी जेव्हा ती चॅटरूम पाहिली तेव्हा मला प्रचंड धक्का बसला आणि मी रडायला लागले," किम म्हणाल्या.

त्यांनी पोलिसात जाऊन तक्रार केली. पण त्यानंतर त्या जास्तच अस्वस्थ झाल्या.

"लोक काय म्हणतील याचा मी विचार करत बसले. माझे कपडे खूपच तंग होते असं पोलिसांना वाटणार नाही का? मी फार उथळ आहे का?" असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले होते.

"मला पोलीस ठाण्यात एकटं वाटत होतं. सगळे पुरुष मी एखादा मांसाचा गोळा असल्यासारखे किंवा एखादी लैंगिक उपभोगाची वस्तू असल्यासारखं माझ्याकडे बघत होते," असं त्या म्हणतात.

"मी कोणालाच सांगितलं नाही. माझ्यावरच सगळे आरोप करतील अशी भीती मला वाटत होती. मला माझ्या कुटुंबाची, मित्रमैत्रिणींची आणि माझ्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या लोकांची भीती वाटत होती. ती माणसं माझ्याकडे जसं बघत होती," असं त्या म्हणाल्या. त्या माणसाला शिक्षाच झाली नाही, असंही त्यांनी सांगितलं.

हा फक्त कोरियाचा प्रश्न नाही

दक्षिण कोरिया आधुनिक आणि तंत्रज्ञानात अग्रेसर असलेल्या देशांपैकी एक म्हणून ओळखला जातो. स्मार्टफोनची सगळ्यात मोठी बाजारपेठ या देशात आहे. इथल्या 90 टक्के लोकांकडे स्मार्ट फोन असून आणि 93% लोकांकडे इंटरनेट आहे.

या सगळ्यांमुळे गुन्ह्यांचा आणि गुन्हेगारांचा शोध घेणं जास्तच कठीण होत आहे.

पार्क सो यून यांनी 'डिजिटल सेक्स क्राईम आऊट' नावाचा एक गट स्थापन केला. 2015ला सोरानेट नावाची अश्लील वेबसाईट बंद करण्यासाठी त्यांनी हा गटाची स्थापन झाली होती.

या वेबसाईटचे लाखो युजर्स होते आणि त्यावर हजारो व्हीडिओ होते. यातील बहुतांश व्हीडिओ त्यात दिसत असलेल्या स्त्रियांच्या परवानगीशिवाय घेतले होते. वेबसाईटवर दिसत असलेले छुप्या कॅमेऱ्याने घेतलेले व्हीडिओ प्रसाधनगृहात, ट्रायल रुममध्ये गुप्तपणे घेतले होते. तर जोडीदारावर सूड घेण्याच्या उद्देशानेसुद्धा काही व्हीडिओ तयार केले होते.

या व्हीडिओत दिसणाऱ्या काही स्त्रियांनी आत्महत्याही केली आहे.

"हे व्हीडिओ काढून टाकणं सोपं आहे. परंतु नवीन व्हीडिओ येत राहातात, ही खरी समस्या आहे," असं पार्क म्हणाल्या.

"व्हीडिओच वितरण हे सगळ्यांत मोठं आव्हान आहे. ज्या वेबसाईटवर हे व्हीडिओ आहेत ते हे व्हीडिओ बेकायदेशीर आणि गुप्तपणे काढले आहेत, हे माहितच नसल्याची सबब पुढं करतात. पण खरंच असं शक्य आहे का? त्यांना माहिती नाही हे कसं शक्य आहे?" असं त्या म्हणाल्या.

वितरकांवर कारवाई व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न व्हावे लागतील असं त्या म्हणतात.

डिजिटल सेक्स क्राईम हा फक्त कोरियाचा प्रश्न नाही. स्वीडन आणि अमेरिकेतसुद्धा ही प्रकरणं झाली आहेत. पण दक्षिण कोरिया तंत्रज्ञानाच्या बाबतीत अतिशय अग्रेसर आहे आणि सगळ्यात वेगवान इंटरनेटची सेवा त्यांच्याकडे आहे.

"स्त्रियांविरुद्ध होणाऱ्या ऑनलाईन गुन्ह्यांचा हा प्रकार इथे फार फोफावला आहे. नजीकच्या काळात इतर देशांतही ही समस्या मोठी होणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर हा प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र काम करण्याची गरज आहे,"असं त्या म्हणाल्या.

या गुन्हेगारांना पकडणं आणि त्यांना शिक्षा करणं या दोन मुख्य समस्या दक्षिण कोरियाच्या पोलिसांसमोर आहे.

सार्वजनिक ठिकाणी छुपा कॅमेरे शोधण्यासाठी पोलिसांचं विशेष पथक स्थापन करण्यात आलं. पण त्यांना एकही कॅमेरा आढळून आलेला नाही.

पोलीस निरीक्षक पार्क ग्वांग माय यांनी गेल्या दोन वर्षांत 1500 प्रसाधनगृहाचा शोध घेतला.

बीबीसीचे प्रतिनिधी त्यांच्याबरोबर एका शोध मोहिमेत सहभागी झाले. एका भिंतीवर छुपा कॅमेरा लावल्याचा संशय त्यांना आला. त्याच भिंतीवर कुठे छिद्र दिसतंय का याचा शोध त्या घेत होत्या.

"गुन्हेगारांना शोधणं किती कठीण आहे हे आम्हाला कळतंय. पुरुष कॅमेरा लावतात आणि 15 मिनिटांच्या आत तो काढून टाकतात," असं त्या म्हणाल्या.

गेल्या वर्षी अशी 6465 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. त्यात 5437 लोकांना अटक करण्यात आली. यांपैकी 119 लोक तुरुंगात गेले. याचा अर्थ असा की जितक्या लोकांना पकडलं त्यांच्यापैकी फक्त 2 टक्के शिक्षा झाली.

पद्धतीत सातत्याने बदल

दक्षिण कोरियातील अनेक स्त्रियांना सोलच्या मध्यवर्ती भागात निदर्शनं केली झाली. या आठवड्याच्या शेवटी आणखी निदर्शनं होण्याची शक्यता आहे.

पार्क मी हाये या सोल पोलिसांच्या विशेष गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्रमुख आहे. विदेशात सर्व्हर असतील तर गुन्हेगारांचा माग घेणं आणखी कठीण होतं, असं त्यांनी सांगितलं.

अनेक देशांत अशा प्रकारे पॉर्नोग्राफीचं वितरण हा गुन्हा समजला जात नाही. त्यामुळे दक्षिण कोरियात जरी तो गुन्हा असला तरी इतर देशांत ते कायदेशीर आहे का किंवा परदेशात त्याचं वितरण होतंय का शोधणं अवघड आहे, असं ते म्हणाल्या.

"जरी आपण वेबपेज बंद केलं तरी अॅड्रेसमध्ये फेरफार करून ती पुन्हा उघडता येते. आम्ही बदलेलल्या अॅड्रेसवर लक्ष ठेवतो पण त्यांची पद्धत सतत बदलत असते," असं त्यांनी सांगितलं.

"या गुन्ह्यांसाठी शिक्षा फारशी कठोर नाही. अशा क्लिप्स वितरणासाठी 1 वर्ष तुरुंगवास आणि 609783 रुपये इतका दंड ठोठावण्यात येतो. शिक्षा कठोर झाली तर या फरक पडू शकतो," असं त्या म्हणाल्या.

या गुन्ह्यांबाबतीत सजगता आहे असं तुम्ही म्हणू शकता. हजारो बायका या आठवड्याच्या शेवटी, 'माझं आयुष्य म्हणजे पॉर्न नाही," असा नारा देणार आहेत. यावर्षी हे चौथं आंदोलन आहे.

या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त कठोर शिक्षा होईल, शिक्षेचं प्रमाण वाढेल आणि गुन्हे अन्वेषणाच्या पद्धतीत सुधार होईल अशी त्यांना अपेक्षा आहे.

तोपर्यंत आपण आपल्याकडे कोणी बघतंय का हे आपण तपासून पाहूया.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)