ब्लॉग : व्हॉट्सअॅपवर आलेला 'तो' व्हीडिओ तुम्ही का पाहिला?

    • Author, दिव्या आर्य
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

तुम्हाला हा व्हीडिओ कदाचित व्हॉट्सअॅप वर आला असेल, कुठल्याही फॅमिली ग्रुपवर नाही किंवा कुठल्याही मोठ्या लोकांच्या ग्रुपवरसुद्धा नाही. तुमच्या शाळा, कॉलेज, ऑफिसच्या मित्र-मैत्रिणींचा तो ग्रुप असू शकतो.

त्या व्हीडिओवर शेम असं लिहून पोस्ट केलं असेल. कदाचित राग आणि दु:खसुद्धा व्यक्त केलं असेल. पण तोच व्हीडिओ जर ते एखाद्या फक्त पुरुषांच्या किंवा फक्त स्त्रियांच्या ग्रुपवर आला असेल तर तो काही न लिहिताच पोस्ट केला असेल.

पॉर्नच्या छोट्या छोट्या क्लिप व्हॉट्सअॅपवर पोस्ट केल्या जातात. या क्लिप कधी एक मिनिटाच्या असतात तर कधी दोन मिनिटाच्या तर कधी अगदी तीस सेकंदाच्या.

मोबाईलची किमया

बिहारच्या सात मुलांनी एक मुलीचे जबरदस्ती कपडे फाडले आणि तसं करतानाचा व्हीडिओ शूट करून सोशल मीडियावर टाकला. तोही व्हीडिओ असाच पॉर्न क्लिपसारखा शेअर झाला असेल.

मोबाईलमुळे खासगीपणाला बराच वाव असतो. आपण हवं तेव्हा हवं ते बघू शकतो. इंटरनेटने पाठवल्या जाणाऱ्या व्हीडिओची माहिती गोळा करणाऱ्या विडुली या संस्थेच्या एका अहवालानुसार 2016 मध्ये मोबाईल डेटाचे दर घसरले तेव्हापासून पॉर्न व्हीडिओ पाहण्यात आणि शेअर करण्याच्या प्रमाणात 75 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

विडुलीच्या या अहवालानुसार 80 टक्के व्हीडिओ छोटे असतात आणि हे व्हीडिओ पाहणारे 60 टक्के लोक छोट्या शहरांमधले असतात. स्मार्टफोन स्वस्त झाले आहेत तसंच 3G आणि 4Gचे दरसुद्धा आता बरेच कमी झाले आहेत.

बिहारच्या जहानाबादमध्ये उजाड दिसणाऱ्या एका शेतात जी मुलं जमली होती त्यांच्याकडे स्मार्टफोनही होता आणि इंटरनेटवर काहीही अपलोड करण्यासाठी डेटा प्लॅनही होता.

पण त्यांचा व्हीडिओ पुढे पाठवण्याची ताकद फक्त आपल्यातच होती.

व्हीडिओ का शेअर होतात?

मग हा व्हीडिओ आपण का पाहिला आणि का शेअर केला? त्यात काय मजा आहे? मुलगी ओरडताना आणि मुलांना तिचे कपडे फाडताना बघण्यात कोणता आनंद मिळतो का?

खराब क्वालिटीच्या अशा व्हीडिओमध्ये आपली नजर खरंच काय शोधत असते? शरीराचे कोणते अवयव पाहण्याची ही हाव आहे का? ही मुलं किती मर्यादेपर्यंत जाणार हा कुतूहलाचा विषय आहे का?

या व्हीडिओला हिंसक पॉर्न म्हणणं कदाचित चुकीचं होणार नाही.

अनेकदा पॉर्नमध्ये अशी हिंसा दाखवली जाते आणि असं भासवलं जातं की मुलीला ते सगळं आवडतंय. त्या पॉर्नमधला माणूस तिला मारणार, जबरदस्तीने तिचं चुंबन घेणार, तिच्यावर थुंकणार, तिचे केस ओढणार, तरी या सगळ्यातून तिला 'सेक्स'मधला आनंद मिळतोय, असं पॉर्नमध्ये दाखवलं जातं.

काही लोकांच्या मते यात काही चूक नाही आणि काही महिला अशा वागणुकीला सेक्सी मानतातही.

पण हिंसक पॉर्न हा वेगळा आहे. त्यात जर-तरची सोय नसते. ज्यात पुरुष एखाद्या स्त्रीवर बलात्कार करतो, त्याला 'हिंसक पॉर्न' म्हणतात.

पॉर्नच्या नावाखाली असे व्हीडिओ तयार केले जातात आणि पाहिलेसुद्धा जातात. गुगलसारख्या कुठल्याही सर्च इंजिनमध्ये 'रेप पॉर्न' टाकलं तर कोट्यवधी मार्ग तुमच्यासमोर खुले होतात.

बाकी पॉर्न व्हीडिओसारखेच रेप पॉर्नच्या व्हीडिओंमध्येही अभिनेतेच काम करतात. पण आता तर प्रत्यक्षात होणाऱ्या लैंगिक हिंसाचाराचे व्हीडिओ तयार करून शेअर केले जात आहेत.

पॉर्नसुद्धा सुंदर असू शकतं

अगदी त्याच पद्धतीने जसं जहानाबादच्या त्या शिवारात त्या मुलीचा व्हीडिओ शेअर केला गेला. या व्हीडिओमुळे पोलीस सक्रिय झाले आणि चार लोकांना अटक केली. पण असे बरेच व्हीडिओ फक्त लोकांना उद्युक्त करण्यासाठी वापरले जातात.

आंतरराष्ट्रीय वेबसाईट 'पॉर्नहब'च्या मते पॉर्न पाहण्यासाठी लोक आता कॉम्प्युटरपेक्षा मोबाईलचा जास्त वापर करत आहेत.

या वेबसाईटच्या वार्षिक अहवालानुसार 2013 मध्ये 45 टक्के लोक पॉर्नहबवर पॉर्न पाहण्यासाठी फोनचा वापर करायचे. 2017 साली हा आकडा 67 टक्क्यांवर आला. भारतासाठी हे प्रमाण 87 टक्के आहे.

पॉर्न सुंदर असू शकतं. लैंगिक संबंध कसे प्रस्थापित करावेत, हे समजून घेण्यासाठी काही लोक याचा आधार घेतात. तर काही लोकांसाठी ते एकटेपणा घालवण्याचं माध्यम असू शकतं.

पण हिंसेचे हे व्हीडिओ 'रेप पॉर्न'सारखे वाटले आणि पाहिले गेले, तर काय परिस्थिती उद्भवेल?

जगभरात अनेक संशोधनाअंती असं लक्षात आलं आहे की पॉर्न पाहणाऱ्या लोकांमध्ये हिंसाचार, लैंगिक हिंसाचार आणि मॅसोकिझम (म्हणजे स्वत:ला वेदना देऊन लैंगिक क्रियांचा आनंद घेणं) यासारख्या गोष्टी वाढत आहेत.

लग्नात किंवा नातेसंबंधात तणाव वाढला तर लैंगिक क्रियांमधला आनंद कमी होत आहे.

मलासुद्धा बिहारचा हा व्हीडिओ दोन वेगवेगळ्या ग्रुप्समधून आला. तो पाहून मला घृणा वाटली. ज्यांनी मला हा व्हीडिओ पाठवला मला त्यांचासुद्धा राग आला. असे व्हीडिओ शेअर करून त्यांना काय मिळालं असेल?

याचं उत्तर तुम्हीच शोधा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)