You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पोटच्या पोरांनाच असं कोण घरात साखळीनं बांधून ठेवतं?
तेरा लहानग्या मुलांना घरात डांबून ठेवणाऱ्या एका दांपत्याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्यांपैकी सर्वांत लहान मूल 2 वर्षांचं आहे तर सगळ्यांत मोठं 29 वर्षांचं आहे.
लॉस एंजेलिस शहराच्या उत्तर-पूर्वेस 95 किमी दूर एका घाणेरड्या घरात या 13 मुलांना डांबण्यात आलं होतं, असं पोलिसांनी सांगितलं आहे. यापैकी काहींना साखळ्यांनी बांधून ठेवण्यात आलं होतं, तर सगळेच कुपोषित अवस्थेत आढळले आहेत.
या प्रकरणी डेव्हीड एलेन तुर्पिन (57) आणि लुईस ऐना तुर्पिन (49) या दोघांना, मुलांचं शोषण करून त्यांचा जीव धोक्यात घालण्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे.
रिव्हरसाईड शेरिफ विभागानं दिलेल्या माहितीनुसार, "गेल्या रविवारी त्या घरातून पळालेल्या एका मुलीनं पोलिसांना याबाबत माहिती दिली. याच घरात सापडलेल्या एका फोनवरून तिनं इमरजंसी नंबरला फोन केला होता."
कुपोषित मुलं अन् गलिच्छ घर
सुटका झालेल्या एका मुलीनं दिलेल्या माहितीनुसार, या आई-वडिलांनी तिच्यासहीत 13 बहीण-भावांना बांधून ठेवलं होतं. "ती मुलगी 10 वर्षांची असावी आणि ती खूपच अशक्त वाटत होती," असं पोलिसांनी सांगितलं आहे.
काही मुलांना तर काळवंडलेल्या, घाणेरड्या बेडरूममध्ये खाटेला साखळी-कुलुपाने बांधून ठेवलं होतं. त्यांच्यापैकी काही मुलं 18 वर्षं आणि 29 वर्षांचे प्रौढ होते, हे पाहून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
"ते घर खूपच गलिच्छ होतं आणि सर्व मुलं कुपोषित होती," असं पोलिसांनी पुढं सांगितलं. त्यांच्यावर आता स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
हे अविश्वसनीय आहे, ह्रदयद्रावक आहे, असं एका रुग्णालयाचे प्रमुख मार्क अफर म्हणाले.
मात्र या जोडीनं आपल्या पोटच्या पोरांनाच असं का ठेवलं असावं, हे गूढ अजूनही पोलीस उलगडू शकले नाहीत.
आणखी वाचा
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)