You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महिलांच्या छळांची 'ती' यादी तिने का बनवली?
माध्यमांमध्ये काम करणाऱ्या महिलांना छळणाऱ्या व्यक्तींची ऑनलाईन यादी बनवणारी स्त्री अखेर जगासमोर समोर आली आहे.
आपली व्यथा मांडणाऱ्या महिलांना कोणीही कमी लेखू नये किंवा मत बनवू नये, म्हणून मी ही यादी बनवली होती, असं मॉईरा डोनेगन यांनी सांगितलं आहे.
ऑक्टोबरमध्ये त्यांनी एक ऑनलाईन स्प्रेडशीट बनवली होती, ज्यात त्यांनी माध्यमांमध्ये काम करणाऱ्या महिलांना त्यांचा छळ करणाऱ्या पुरुषांची नावं टाकायला सांगितलं होतं. या महिला निनावीपणे त्यात नाव टाकू शकत होत्या.
ही स्प्रेडशीट 12 तास ऑनलाईन होती आणि त्यात 70 पेक्षा अधिक पुरुषांची नावं समोर आली. मग जाहीर झालेली ही यादी लगेच व्हायरल झाली होती.
त्यातल्या पुरुषांवर छळवणूक ते बलात्कारसारखे अनेक आरोप होते.
अनुभवाचा अभाव होता तरी...
'द कट' मॅगझीनमध्ये लिहिताना डोनेगन म्हणाल्या की ही यादी बनवणं त्यांचा बालिशपणा होता. त्यांनी त्या स्प्रेडशीटला Shitty Media Men list असं नाव दिलं होतं.
या यादीत मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रांतल्या अनेक लोकांची नावं समोर आली. त्यात हॉलिवूड निर्माते हार्वे वाईनस्टाईन यांचाही समावेश होता.
ही यादी बाहेर आल्यावर तिच्यावर स्तुतीवर्षाव आणि टीका, असा संमिश्र प्रतिसाद आला. अनेक माध्यमांनी लेखाच्या माध्यमातून टीका केली.
आणि डोनेगन यांनी ही यादी तयार केली आहे, असा हापर्स मॅगझिन लवकरच जाहीर करेल, असा तर्क शिगेला पोहोचला होता.
'द कट'मध्ये लिहिलेल्या लेखात त्या पुढे म्हणाल्या की, क्राऊडसोर्स करून निनावीपणे तयार केलेली ही यादी, लैंगिक छळाच्या समस्येला वाचा फोडण्याचा एक मार्ग होता. "हा त्रास संपतच नव्हता. महिलांना कुठे तरी यातून मार्ग काढता यावा, म्हणून हे केलं."
"मला एक अशी जागा निर्माण करायची होती जिथे छळल्या गेलेल्या स्त्रियांविषयी कोणीही उगाच मतं बनवणार नाहीत, किंवा त्यांना कमी लेखलं जाणार नाही," त्या सांगत होत्या.
"अशा प्रकारच्या वागणुकीविरुद्ध निर्भयपणे आवाज उठवायला एक नवा मार्ग तयार करण्याचा माझा प्रयत्न होता, जिथे लोक सूड घेण्याचा प्रयत्न नाही करतील."
'द न्यू यॉर्कर'मध्येही लेखन केलेल्या डोनेगन सांगतात की त्यांना अपेक्षा नव्हती की या यादीला इतका प्रतिसाद मिळेल आणि ती इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरेल. काही तासांतच Buzzfeed वर आणि Reddit या ऑनलाईन फोरममध्ये ती झळकली.
प्रचंड प्रतिसाद
"मला वाटलं होतं की स्त्रिया यात छळाची माहिती देतील, जे त्या कधीही कुणालाही सांगू शकल्या नाही, अशा दस्तावेज असावं, अशी माझी कल्पना होती. पण या क्षेत्रात आपल्याकडे असलेल्या हक्कांचा गैरवापर किती प्रमाणात केला जातो हे मला कळलं," त्या सांगतात.
त्या सांगतात की जशी ही यादी वाढत गेली तसा त्यांना आनंद झाला पण त्याच वेळी आपल्या करिअरचं काय होईल, या विचाराने त्या घाबरल्याही.
त्यांनी ही यादी काढून घ्यायचं ठरवलं खरं, पण ही यादी म्हणजे तमाम स्त्रियांसाठी एक आधार होता, हे सांगायला देखील त्या विसरल्या नाहीत.
"मी खूपच भाबडेपणात ही यादी तयार केली होती. माझा भाबडेपणा असाही होता कारण ती यादी अशा काही अदृश्य गोष्टींमुळे व्हायरल होऊ शकते, याचीही मला कल्पना नव्हती," त्या सांगतात.
"मला आधी माहिती नव्हतं की ही स्प्रेडशीट सार्वजनिक होणार होती. पण ते होतील असंही लगेचच स्पष्ट झालं. मला असं वाटलं की या कागदपत्रापेक्षा त्यात उल्लेखीत वागणुकीचं महत्त्व जास्त आहे. आता इतकं सगळं झाल्यावर विश्वासच बसत नाही की मी असा विचार केला होता. पण मी हे केलं."
हार्पर्स मॅगझीननं जेव्हा नाव जाहीर करण्याचं ठरवलं, तेव्हा या मॅगझीनसाठी लिहिणाऱ्या इतर लेखकांनी त्यात यापुढे न लिहिण्याचा इशारा दिला. ते म्हणाले की जर या यादीच्या मागच्या व्यक्तीचं नाव जाहीर झालं, तर तर त्या व्यक्तीला धमक्या येतील, तिचा छळ होईल.
हार्पर्स त्या प्रस्तावित लेखाच्या लेखिका केटी रॉफी यांनी अमेरिकेतल्या प्रसारमाध्यमांना सांगितलं की यादीमागे कोण होतं, हे आम्ही सांगणार नव्हतोच. हार्पर्सने न्यूयॉर्क टाईम्सला सांगितलं की, "संपादन कसं करायचं आता हे आम्ही सांगणार नाहीत."
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)