तुम्ही काळी लक्ष्मी आणि काळी सरस्वती पाहिली आहे का?

आजवर पाहण्यात आलेले हिंदू देवी-देवतांचे सर्व चित्रं, नाटक आणि चित्रपटांमधले पात्र गोरे का होते? देव काळा असू शकत नाही का? असा प्रश्न विचारत चेन्नईमधल्या एका ग्रुपने एक अभिनव प्रयोग केला आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

'Dark is Divine' अर्थात 'काळंही दैवी' असं थीम असलेला एक फोटोशूट त्यांनी केला आहे. त्यांच्यानुसार ही त्यांची त्वचेच्या रंगावरून होणाऱ्या भेदभावाविरोधात लढाई आहे.

त्यांनी ही छायाचित्रं नंतर त्यांच्या फेसबुक पेजवरही अपलोड केली आहे, ज्यात देवी-देवतांना कृष्णवर्णीय दाखवण्यात आलं आहे.

काळी त्वचा असलेले किंवा सावळे लोक आकर्षक नसतात, हा समज बदलणं या कँपेनचं उद्दीष्ट असल्याचं ते सांगतात.

चेन्नईस्थित एका निर्मिती संस्थेचे सहसंस्थापक भारद्वाज सुंदर आणि त्यांचे मित्र फोटोग्राफर नरेश नील यांनी हा फोटोशूट केला.

सुंदर भारद्वाज म्हणाले, "नववधूंची तुलना सामान्यतः लक्ष्मीशी केली जाते, किंवा तसं मानलं जातं. पण लक्ष्मी देवीला नेहेमी गौरवर्णीयच दाखवतात. आम्हाला हेच बदलायचं आहे. लक्ष्मी देवी काळ्या रंगाचीसुद्धा असू शकते, हे लोकांना दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणूनच आम्ही तसा फोटोशूट केला."

"या विषयावर आधारित फोटोशूट करण्यासाठी कृष्णवर्णीय मॉडेल शोधताना आम्हाला थोडा वेळ लागला," असंही ते म्हणाले.

"आमच्या टीमधल्या ब्यूटिशियनला या संकल्पनेतून प्रेरणा मिळाली. तिलाही या फोटोशूटमध्ये मॉडेल म्हणून सहभागी व्हायचं होतं. मग आम्ही सीता आणि लव-कुश या संकल्पनेवर आधारित एक फोटो काढला," असं फोटोग्राफर नरेश यांनी सांगितलं.

देवी लक्ष्मीसाठी मॉडेल झालेल्या सुरुथी पेरियासामी हिने आपला अनुभव सांगितला. "माझी एक मैत्रीण गुटगुटीत आणि काळी आहे. तिच्यासारख्या अनेकांना मॉडेलिंग करायचं आहे. पण त्यांच्या त्वचेच्या रंगामूळे सगळीकडं त्यांना नकार मिळतो. अगदी तामिळनाडूतही."

"माझे फोटो बघितल्यानंतर माझ्या मैत्रिणीनं अशी संधी जर कुठं असेल तर तिला कळवावं, असं आता मला सांगितलं आहे," असं सुरुथी म्हणाली.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)