You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जिग्नेश मेवाणींचं राजकारण बालिशपणाचं : प्रकाश आंबेडकर
- Author, मयूरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी
गुजरात विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर , 31 डिसेंबरला दलित नेते जिग्नेश मेवाणी पुण्यातील 'एल्गार' परिषदेनिमित्त महाराष्ट्रात आले. त्यांच्या तिथल्या भाषणाची चर्चा झाली. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, नंतर मुंबईतल्या कार्यक्रमातही वाद झाला आणि आता दिल्लीतल्या 'हुंकार रॅली'नंतर जिग्नेश मेवाणी देशभर चर्चेचा विषय झाले आहेत.
'भारिप बहुजन महासंघा'चे अध्यक्ष आणि दलित चळवळीचे ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर हे मात्र जिग्नेश मेवाणींवर नाराज आहेत.
"जिग्नेश यांचं राजकारण अजून बालिश आहे. त्यामुळे हवेत जाणं त्याच्यासाठी योग्य नाही", असं आंबेडकर यांनी 'बीबीसी मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
'एल्गार' परिषदेत जिग्नेश मेवाणींसोबत एकाच व्यासपीठावर असणारे प्रकाश आंबेडकर हे एकाएकी मेवाणींवर नाराज का झाले आहेत? हा कुतुहलाचा विषय आहे.
प्रकाश आंबेडकर यांची सविस्तर मुलाखत इथे पाहू शकता.
भीमा कोरेगांव प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी 'बीबीसी मराठी'च्या 'फेसबुक लाईव्ह'मध्ये बोलतांना जिग्नेश यांना अनेक सल्लेही दिले.
'ही सगळी उतावळी मंडळी'
जिग्नेश यांच्या गुजरातमधल्या विजयानंतर दलित तरुणांमध्ये त्यांचं एक नवं नेतृत्व तयार होत आहे, अशी चर्चा आहे. त्यांना महाराष्ट्रातही पाठिंबा मिळतोय असं वाटतं का? हे विचारल्यावर आंबेडकरांचं सांगतात, "नाही. ही सगळी अजून उतावीळ मंडळी आहेत. त्यांचे हेतू चांगले आहेत. त्यांनी त्यांच्याबरोबर काही विचारवंत ठेवले पाहिजेत. जे काही त्यांनी दिल्लीत सांगितलं मनुस्मृती आणि राज्यघटनेबद्दल, हा बालिशपणा आहे असं मी मानतो."
"या बालिशपणाचे परिणाम तात्पुरते असतात, ते चिरंतन नसतात. त्यामुळे या मंडळींनी चिरंतन राजकारण केलं पाहिजे. त्यापेक्षा उत्तर प्रदेशमध्ये आत्ता जे घडतंय, त्यातून एक परिपक्व लीडरशीप तयार होईल असं मला दिसतंय," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
जिग्नेश मेवाणी 'बीबीसी मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत बोलतांना असं म्हणाले होते की, दलित संघटना आणि पक्षांमध्ये जे वेगवेगळे गट आहेत, त्यांना एकत्र आणण्यासाठी ते प्रयत्न करतील.
मेवाणींचं नेतृत्व मान्य नाही?
मग तरीही आंबेडकरांना असं का वाटतं की ते उतावीळ आहेत आणि त्यांना विचारवंतांचा सहवास मिळायला पाहिजे? ते मेवाणींना सोबत घ्यायला तयार नाहीत की त्यांचं नेतृत्व आंबेडकरांना मान्य नाही?
"सोबत घेण्याचा प्रश्न नाहीये. एक लक्षात घ्या की मी प्रस्थापित आहे. माझ्याकडून प्रस्थापित ते होऊ शकतात. इथं अनेक जण येऊन गेले आणि अनेक जण आहेत. मी चाळीस वर्षं या राजकारणात आहे. आहे तिथेच आहे. ज्यावेळेस मला पाहिजे असतं तेव्हा मी उभा राहतो, ज्यावेळेस मला शांत रहायचं असतं तेव्हा मी शांत राहतो", प्रकाश आंबेडकर म्हणाले.
'जिग्नेशने प्रसिद्धीमुळे निवडणूक जिंकली'
"ही जी त्यांची भाषा आहे, त्याच भाषेमुळं ते अनेकांना दुखावतात. मला त्यानं काही फरक पडत नाही. पण मी मोठा नेता आणि मी तुम्हाला एकत्र करतो, असं म्हटलं की मग उरलेले सगळे म्हणतात की कोण टिकोजीराव तू? त्यामुळंच म्हटलं की हे उतावळं नेतृत्व आहे, पब्लिसिटीचं नेतृत्व आहे, ग्रॅबिंगचं नेतृत्व आहे. हे फार काळ टिकत नाही. मी त्याच्याशी बोलतो आहे, सांगतो आहे की, तू या भेगा बुजव (ग्राऊटिंग कर). ज्या मतदारसंघातून तो निवडून आलाय तो मतदारसंघ त्याचा नाही. प्रसिद्धीनं निवडून आणलं आहे त्याला. निवडून आलेली टर्म ही पाच वर्षांची असते. पाच वर्षांनंतरचं काय याचा विचार कर असं मी त्याला म्हटलं," आंबेडकर पुढे सांगतात.
'माध्यमांच्या तालावर नाचतो म्हणून कानउघाडणी'
तुम्ही जिग्नेश मेवाणींवर नेमके का नाराज आहात, असं विचारल्यावर आंबेडकर म्हणाले, "मी त्याच्यावर नाराज नाही. आम्ही देशात तरुणांची नवी फळी तयार करतो आहोत. जिग्नेश त्यातलाच एक आहे. पण तो सध्या माध्यमांच्या तालावर नाचतो आहे. त्यामुळे आम्ही ही अशी कानउघाडणी करत राहणार."
गुजरात निवडणुकीतल्या विजयाबद्दल, ज्यानंतर मेवाणींचं नेतृत्व उदयाला आलं असं म्हटलं जातं, त्याबद्दल आंबेडकरांना काय वाटतं?
'झिरो जिग्नेशला आम्ही निवडून आणलं'
"गुजरातच्या निवडणुकीत जिग्नेश मेवाणी झिरो होता. त्याला आम्ही जिंकून आणलं. माझ्यासारखे 3000 कार्यकर्ते सहा महिने गुजरातमध्ये काम करत होते. त्यात केवळ दलित कार्यकर्ते नव्हते आणि ना भाजपा वा संघ विरोधक होते", प्रकाश आंबेडकर म्हणतात.
"ज्यांना मोदींची कार्यशैली पसंत नाही असे लोक काम करत होते. सौराष्ट्रात त्यांचा गड होता, म्हणून तिथे भाजपला कमी करायचं होतं आणि ते झालंही," आंबेडकर सांगतात.
जिग्नेशला दलितांचा एक नवा तरूण नेता मानलं जातं, आपण ते मान्य करत नाही का, असं विचारल्यावर प्रकाश आंबेडकर म्हणतात,
"माध्यमांना काहीही म्हणू द्या. जर कोणाला नेता व्हायचं असेल, तर ज्या भेगा आहेत त्या बुजवाव्या लागतात. ते दोन प्रकारचं काम असतं.
एक विचारधारेच्या बाबतीत आणि दुसरं जे असतं ते लोकसंग्रहामध्ये करावं लागतं. असे हवेत उडणारे अनेक नेते आले आणि निघून गेले."
"माझी अपेक्षा आहे की, हे तरुण नेते आहेत, त्यांनी हवेत उडू नयेत. म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलून त्यांना जमिनीवर ठेवायचा प्रयत्न करतो आहोत. यशस्वी झालो तर तो भविष्यात नेता होऊ शकतो, जर तसं नाही झालं तर तो इतरांसारखा हवेत उडून जाईल." आंबेडकर पुढे सांगतात.
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)