ग्राउंड रिपोर्ट : भीमा कोरेगावात आग विझली, पण धग कायम!

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी

पुण्याजवळ भीमा कोरेगांवला 1 जानेवारीला झालेल्या हिंसाचाराला एक आठवडा उलटून गेल्यावरही त्याचे झालेले परिणाम समोर येत आहेत. मोठ्या पोलिसफाट्यासह दिवस आणि रात्र घालवणाऱ्या या पंचक्रोशीत तणावपूर्ण शांतता आहे.

अनेक जण आपले विस्कटलेले उद्योग, घरं परत उभी करून नेहमीचा दिनक्रम परत सुरू करू पाहत आहेत, तर काहींना घरी परतण्याची वाट आता बिकट वाटत आहे.

अशोक आणि रमा आठवले भीमा कोरेगांवपासून 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सणसवाडीचे, पण १ तारखेच्या मध्यरात्रीपासून ते आपल्या तीन मुलांसह पुण्यात राहताहेत.

अगोदर ते एका बुद्धविहारात राहिले आणि नंतर आता एका परिचितांच्या घरी पुण्यातच राहतात. पुढे काय होणार त्यांना माहित नाही. त्यांचं म्हणणं आहे की आता ते कधीच परत सणसवाडीत जाणार नाही.

"वीस वर्षांपासून आम्ही सणसवाडीत राहतोय. आजवरचा अनुभव खूप चांगला होता. मिळूनमिसळून रहायचो. आम्ही कधीही जातीयतेला थारा दिला नाही. सगळे समाज एकमेकांच्या कार्यक्रमांत सहभागी असायचे. पण आता आमच्याकडे काही नाही. आमचं सगळं जळून गेलं. आता आम्हाला सणसवाडीत परत जायचं नाही. आता विश्वास राहिला नाही. वीस वर्षं एकत्र राहतोय, तरी असं घडलं. आता परत जायचं नाही," पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणं घेऊन आलेल्या रमा आठवले पाणीभरल्या डोळ्यांनी रडत रडत सांगतात.

आठवले कुटुंबीयांनी सोमवारी पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची भेट घेतली आणि सणसवाडी सोडून अन्यत्र कुठेही त्यांचं पुनर्वसन करण्याची मागणी केली. त्यांच्या गावात त्यांच्यासोबत जे झालं ते ते विसरू शकत नाहीयेत.

"माझा छोटा व्यवसाय होता. फॅब्रिकेशन वर्कशॉप होता, एक छोटं किराणा मालचं दुकान होतं. आमचे गावातले संबंधही एकदम चांगले होते. गेल्या तीन वर्षांपासून आम्ही आमच्या 'पंचशील बौद्धशील ट्रस्ट'तर्फे अनेक कार्यक्रम करतो. मी तर गावात एक मोफत वाचनालयही सुरू केलं आहे. गावानं मला त्यात मदत केली आहे," पण तरीही असं का झालं हा प्रश्न अशोक आठवलेंना सतावतो आहे.

"या वर्षी आम्ही हा मानवंदनेला भीमा कोरेगांवला येणाऱ्या सगळ्यांसाठी मोफत न्याहरीचा कार्यक्रम घेतला होता. सकाळी सात वाजल्यापासून तो सुरू होता. गावातलेही अनेक जण येऊन गेले. ११ वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरळीत चालला. नंतर एक बातमी पसरली की कोरेगांवमध्ये दंगल झाली आणि त्यात एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर सणसवाडीतलं वातावरण बदललं. दगडफेक सुरू झाली, गाड्या जाळायला सुरुवात झाली. दोन्हीकडून उद्रेक सुरू झाला," अशोक आठवले त्या दिवशी काय झालं ते सांगतात.

"आम्ही म्हटलं की या वादात पडायचं नाही आपल्याला म्हणून शटर ओढून बंद करून बसलो. मला फोन आला की तू इकडं ये आणि तुझ्या लोकांना समजावून सांग. मी म्हटलं इतके पोलीस जर काही करू शकत नसतील तर मी काय करणार? मला सांगण्यात आलं की तू जर आला नाहीस तर तुझं घर पेटवून टाकण्यात येईल. मी फोन बंद करून गप्प बसून राहिलो. दुपारी साडे तीनच्या सुमारास हजार एक जणांचा जमाव माझ्या घरावर चालून आला आणि हल्ला केला," आठवले पुढे सांगतात.

"आम्ही मागच्या दारानं बाहेर पडलो आणि ओढ्यामध्ये जाऊन लपलो. माझ्या मुलांना मी पुढं पाठवलं आणि आम्ही तिथं लपून राहिलो. थोड्या वेळानं कोणी ओळखणार नाही या बेतानं आम्ही निघालो गावातून जायला. पण रस्त्यात एकानं मला ओळखलं आणि धरून ठेवलं. मला मारायला सुरुवात केली. तरीही मी सुटून पळालो," अशोक आठवून सांगतात.

अशोक सध्या त्यांना झालेल्या जखमांवर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत. रमा यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे, तर अशोक यांचा जबाब नोंदवून पंचनामा करण्यात आला आहे.

भीमा कोरेगावात तणाव

भीमा कोरेगांव आणि पंचक्रोशीत फिरताना आठवड्याभरानंतरही या घटनेच्या जखमा उघडपणे दिसतात. पेरणे फाट्यापासूनच पुढे पोलिसांची संख्या नजरेत भरते. प्रत्येक चौकात स्थानिक पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या अतिरिक्त कुमकीचे जवान उभे असतात. अग्निशामक दलाचे बंब आहेत, पोलीस अधिकाऱ्यांच्या गाड्या आहेत. बहुतांश दुकानं, हॉटेल्स उघडली असली आणि व्यवहार सुरू झाले असले, तरीही वातावरणातला तणाव स्पष्ट जाणवतो.

भीमा कोरेगांवच्या विजयस्तंभानंतर नदीवरचा पूल ओलांडला की त्या दिवशी नेमकं काय झालं असेल, याची कल्पना येऊ लागते. तोडलेल्या, जळालेल्या गाड्या रस्त्याच्या बाजूला आजही आहेत. त्यातच आठवडी बाजारही भरला आहे. अनेक इमारतींच्या काचा फुटलेल्या आहेत. काही ठिकाणी नुकसान झालेल्या इमारतींवर रंगकाम करून पुन्हा पूर्वीसारखं दिसण्याचा प्रयत्न सुरू आहे.

कोरेगांवच्या पुढे साधारण पाच किलोमीटर अंतरावर सणसवाडी आहे. या गावातही १ तारखेला झालेल्या हिंसाचाराचे तीव्र पडसाद उमटले. इथं बरीच औद्योगिक युनिट्स आहेत, त्यामुळे वाडीची लोकसंख्याही आता वाढली आहे.

इथे एकरभर जागेवर बुद्ध विहारासोबत इनडोअर स्पोर्ट्स काँप्लेक्स आहे. रिपब्लिकन चळवळीमध्ये सर्वांना परिचित असणारे ८६ वर्षांचे सुदाम पवार हे केंद्र चालवतात आणि इथेच वास्तव्य करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष भेटलेला आजही हयात असणारा कार्यकर्ता, अशीही त्यांची ओळख आहे.

१ तारखेला त्यांना आलेल्या धक्कादायक अनुभवानंतर ते गावाबाहेरच फिरतीवर होते. मुंबईला मंत्रालय, पोलीस अधिकारी, इतर नेते अशा भेटीगाठी होऊन जेव्हा ते परत सणसवाडीत आले, तेव्हा आम्ही त्यांना भेटलो.

त्यांच्या घराच्या काचा फुटलेल्या होत्या, दरवाजावर धक्काबुक्कीच्या खुणा होत्या, शेतातला काही ऊस जळाला होता... अशा स्थितीत पोलीस बंदोबस्तात सुदाम पवार आमच्याशी बोलले.

"साडे सहाच्या सुमारास एकदम आवाज सुरू झाला. काही लोक इकडे येत होते. घरात आमची सून, नातवंड सारे होते. आलेले लोक दार आपटायला लागले, धक्का द्यायला लागले. आम्ही आतून दार लावून घेतलं. आम्ही सगळे आत घाबरलो होतो. आलेल्या जमावानं मग बाहेरून खिडक्या फोडायला सुरुवात केली. मग मैदानामध्ये जाऊन गाड्या होत्या काही, त्यांची तोडफोड केली. त्यानंतर शेजारी जे उसाचं शेत आहे आमचं, ते जाळायला सुरुवात केली. एव्हाना पोलिसांना समजलं होतं. जसे ते आले, त्यांच्या गाडीचा सायरन वाजला, तसे हे लोक पळून गेले. ते कोण होते आम्हाला काहीच माहीत नाही," पवार म्हणाले.

पवार यांची मुंबईला राहणारी मुलं, नातवंड असा परिवारही मुक्कामाला आला होता. ते सारे अजूनही इथेच थांबले आहेत.

या आवारातल्या चाळीमध्ये १४ ते १५ जण वस्तीला होते. पवार सांगतात की आता त्यातले चार पाचच मागे राहिले आहेत. बाकी सारे भितीनं इथून निघून गेले आहेत.

"मी इथं पंचवीस वर्षांपासून जास्त काळ राहतो. गावकऱ्यांशी माझे चांगले संबंध आहेत. असं अगोदर इथं कधी काही घडलं नाही. आता हे कसं झालं हे मला अजूनही कळत नाही. मी सणसवाडीतून कुठंही जाणार नाही," सुदाम पवार भावनिक होऊन म्हणतात.

सर्वसामान्यांना बसला फटका

कोरेगांव, सणसवाडी या सगळ्या भागामध्ये या हिंसाचारामुळे स्थानिक नागरिकांचंही नुकसान झालं आहे. ज्यांचा कोणत्या आंदोलनाशी, संघटनांशी संबंध नव्हता, त्यांनाही याची झळ पोहोचली आहे.

कोरेगांव आणि सणसवाडीच्या दरम्यान एका हॉटेलमध्ये जेव्हा आम्ही थांबलो, तेव्हा सुरुवातीला बुजलेले अनेक स्थानिक नागरिक नंतर हळूहळू बोलायला लागले. पोलिसांचा मोठा फौजफाटा, सुरू असलेली चौकशी, माध्यमांचं कव्हरेज या सगळ्यामुळे वातावरणात एक दबाव होता. त्यामुळे त्यांची नावं न लिहिण्याच्या अटीवरच ते बोलले.

"त्या दिवशी इथं सगळं बंद होतं म्हणून आम्हीही आत घरातच होतो. पण नंतर दुपारहून हे सगळं सुरू झालं. आमच्या हॉटेलमध्येही लोक घुसले. तोडफोड केली. तरी शटर न उघडलं गेल्यानं आतलं सगळं वाचलं. पण काऊंटर आणि बाहेरच्या टेबलांची तोडफोड झाली," हॉटेलचा व्यवसाय करणारे एक स्थानिक सांगतात. गावातले अनेक जण त्यांचं झालेलं नुकसान मोजण्यातच सध्या व्यग्र आहेत. बाहेरून आलेल्या गाड्यांसोबतच स्थानिकांच्या गाड्यांचही नुकसान झालंय.

"एकूणच जमाव काही काळ बेकाबू झाला होता. कोणी घाबरले होते, तर कोणी स्वत:ला, मालमत्तेला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. मी स्वत: आमच्या घरात कोरेगांवच्या स्तंभाच्या दर्शनाला आलेल्या स्त्रियांच्या एका गटाला थांबवलं होतं. त्याही घाबरल्या होत्या," दुसरे एक ज्येष्ठ स्थानिक नागरिक सांगतात.

"आमचा प्रश्न असा आहे की गावातल्या अनेकांचा याच्याशी काही संबंध पण नव्हता, पण त्यांचं नुकसान झालं. गावाचं नावही अशा चुकीच्या कारणासाठी घेतलं जाऊ लागलं. यावर कुठं कोणाला काही बोलताही येत नाही," दुसरे एक जण सांगतात. या परिसरातल्या अनेकांची ही व्यथा आहे.

कोरेगांवजवळच हायवेवर एका मोकळ्या प्लॉटवर एल्डिन फर्नांडिस भेटले. फायबर माध्यमात मोठमोठी शिल्पं करणारे ते प्रसिद्ध कलाकार आहेत. फर्नांडिस यांचा स्टुडिओ या भागात सर्वांना माहीत आहे. जेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या स्टुडिओवरच आपण उभे आहोत तेव्हा पायाखाली पसरलेली राख दिसली. फर्नांडिस यांचा संपूर्ण स्टुडिओ जळून राख झाला.

"मी त्या दिवशी पुण्यात गेलो होतो कामासाठी आणि दुपारी मला फोन यायला लागले की इकडे असं होतंय. रात्री गर्दीतून वाट काढत, बारा किलोमीटर चालत मी इथपर्यंत येऊन पोहोचलो तेव्हा हे चित्र मला दिसलं. सगळं नष्ट झालं होतं. बाजूचे काही चांगले लोक होते त्यांनी काही मोजकी शिल्पं जवळच्या एका खोलीत हलवली. ती वाचली, बाकी सगळं संपलं. माझं ७० लाखांचं नुकसान झालं आहे. आता सरकारकडे मदत मागण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही," फर्नांडिस म्हणाले.

फर्नांडिस यांचा स्टुडिओ जरी तीन वर्षांपासून कोरेगावला असला तरीही महाराष्ट्रभर अनेक कामं ते करतात. पिंपरीच्या डॉ. आंबेडकर चौकातल्या बाबासाहेबांच्या स्मारकाच्या म्यूरल्सचं काम आणि जुन्या सांगवीत शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित शिवसृष्टीसाठी त्यांनी केलेलं काम सर्वांत महत्त्वपूर्ण असल्याचं ते आवर्जून सांगतात.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)