You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात महिलांचे गर्भाशय का काढले जात आहेत?
- Author, प्राजक्ता धुळप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
पाहा व्हीडिओ
बीबीसीने सर्वात प्रथम वाचा फोडलेल्या महिलांच्या गर्भाशयाविषयीच्या बातमीची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली. त्यानंतर बीडमध्ये किती महिलांची गर्भाशयं काढली गेली याविषयीची माहिती प्रशासनामार्फत गोळा केली जाणार आहे.
मराठवाड्यासह दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात महिलांची गर्भाशयं काढण्याच्या प्रकरणांत गेल्या काही वर्षांत वाढ झालेली दिसते. बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड मजूर महिला आजाराला कंटाळून गर्भाशय काढतात, यावर बीबीसी मराठीने जानेवारी 2018 मध्ये सविस्तर बातमी केली होती.
सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीतसुद्धा हा मुद्दा आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी नांदेडमध्ये बोलताना "बीडमध्ये महिलांची गर्भाशयं काढून विकली जात असल्याचा प्रकार समोर आलाय, टोळी पकडली गेली, मग हा चौकीदार नेमका करतोय काय?" असं म्हणत भाजप सरकारवर हल्ला चढवला.
वैद्यकीय नीतिनियमांना धाब्यावर बसवून मराठवाड्यातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात अनेक तरुण महिलांची गर्भाशयं काढून टाकण्यात येत आहेत. त्याचे दुष्परिणाम हजारो महिला दररोज भोगत आहेत. गर्भाशय काढण्याच्या हिस्ट्रेक्टॉमीच्या बहुतांश शस्त्रक्रिया अनावश्यक असल्याचं तज्ज्ञ डॉक्टरांनी म्हटलंय. महिलांनी गर्भाशय काढल्याने आरोग्याची वाताहत झालेल्या आपल्या कहाण्या बीबीसी मराठीला सांगितल्या.
बीड जिल्ह्यातलं वंजारवाडी गाव. जिथे निम्म्याहून अधिक महिलांची गर्भाशयं नाहीत.
वंजारवाडीतल्या 30 वर्षं वयाच्या शैला यांचं गर्भाशय तीन वर्षांपूर्वी काढलं गेलं. ऊसतोड मजूर असलेल्या शैला सानप यांचं कमी वयात लग्न झालं. आणि वयाच्या पंचवीशीतच तीन मुलं झाली.
कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन झाल्यावर अंगावरून पांढरा पदर (white discharge) जायचा म्हणून त्या हैराण होत्या. अंगावरून पांढरं पाणी जाणं किंवा पांढरा पदर जाणं म्हणजे योनीतून पाण्यासारखा, पांढरट स्त्राव येणं.
'दहा-पंधरा दिवसांनी पाळी यायला लागली होती. त्रास वाढला म्हणून सरकारी दवाखान्यात गेले. पण काही फरक पडला नाही म्हणून खासगी डॉक्टरकडे गेले', शैला यांनी सांगितलं.
'आम्हाला शरीरातलं काही कळतं का? डॉक्टरांनी मला सांगितलं ऑपरेशन करावं लागेल. औषधाने उपयोग होणार नाही. आता नाही केलं तर दोन महिन्यांनी करावच लागेल. त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मी गर्भाशय काढलं.'
गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेला हिस्टरेक्टोमी म्हणतात.
हिस्टरेक्टोमी कधी करणं योग्य?
ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार, हिस्टरेक्टोमी ठरावीक परिस्थितीच करता येते. पाळी दरम्यान अतिरक्तस्त्राव, ओटीपोटात सारखं दुखणं, ओव्हरी कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, सर्व्हिकल कॅन्सर, फॅलोपियन ट्युबचा कॅन्सर अशा परिस्थितीतच गर्भाशय काढणं योग्य ठरतं.
स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. शुभांगी अहंकारी आणि त्यांचे पती डॉ शशिकांत अहंकारी हॅलो मेडिकल फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षांपासून ग्रामीण महिलांच्या आरोग्यासाठी काम करत आहेत. त्यांच्या मते, भारतात ग्रामीण महिलांमध्ये गर्भाशयाचे आजार अधिक प्रमाणात असून पांढरं जाणं ही सर्वसाधारण समस्या पाहायला मिळते.
शैलाने या गर्भाशयाच्या आजारासाठी उपचार घ्यायचा प्रयत्न केला. गर्भाशय योनीच्या बाहेर येतं, त्याला अंग बाहेर येणं असं ग्रामीण भागातील महिला म्हणतात. त्या सांगत होत्या, 'माझं थोडं अंग बाहेर यायचं. लोकं भीती घालायचे. त्याला हवा लागेल. असं होईल, तसं होईल. कॅन्सर होईल.'
कॅन्सरची भीती इथल्या अनेक महिलांच्या मनात घर करून आहे. आणि गर्भाशयाच्या आजाराविषयी त्यांना काहीही माहिती नाही.
डॉ. शुभांगी अहंकारी यांच्या मते, 'वयाच्या तिशीमध्ये पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर असेल तरच डॉक्टर पिशवी काढण्याचा निर्णय घेऊ शकतात. केवळ कॅन्सरच्या भीतीने हिस्टरेक्टोमी करता येत नाही.'
पण वंजारवाडीतल्या ४० वर्षं वयाच्या आतील अनेक महिलांनी 'पिशवी' काढून टाकली आहे. ग्रामीण भाषेत गर्भाशयाला 'पिशवी' म्हणतात.
बीड प्रशासनाच्या म्हणण्यानुसार हिस्ट्रेक्ट्रोमीची जी ऑपरेशन अनावश्यक आहेत, त्यावर नियंत्रण ठेवायची गरज आहे.
खासगी डॉक्टरांवर नियंत्रण
बीडच्या सरकारी आरोग्य यंत्रणेचे प्रमुख असलेले सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात यांनी सांगितलं, "ज्या हिस्टरेक्टोमीच्या शस्त्रक्रिया खासगी किंवा किंवा सरकारी हॉस्पिटल्समधून करायच्या आहेत, त्यावर आम्ही देखरेख ठेवणार आहोत. ३५ वर्षांच्या आतील महिलेची शस्त्रक्रिया गरजेचं असेल तरच आम्ही खासगी डॉक्टरना परवानगी देऊ. तसे निर्देश आम्ही दिले आहेत.'
खासगी दवाखान्यात हिस्टरेक्टोमीच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना 40 हजार रुपये इतका खर्च आला. हे 40 हजार शैला यांच्या कुटुंबाची वर्षभराची कमाई होती.
डॉ. अहंकारी यांच्या मते, "काही डॉक्टर गरज नसताना ही केवळ पैशासाठी करतात."
शैला सानप यांची शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरांवर स्त्रीभ्रूणहत्येचा आरोप असल्याने त्याची केस चालू आहे. त्यामुळे त्यांची वैद्यकीय प्रॅक्टीसही प्रशासनाने बंद केली आहे.
आम्ही खासगी डॉक्टरांशी याविषयी संपर्क साधला तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं, "खूप मोठ्या प्रमाणात या महिला आमच्याकडे उपचारासाठी येतात. आम्ही ऑपरेशन नाही केलं तर ते इतर कोणी करेल. म्हणून आम्हीच करतो."
महिलांनाही गर्भाशय काढणं सोयीचं वाटतं, कारण ऊसतोडमजूरसाठी त्यांना स्थलांतर करायचं असतं. ऊसतोडीच्या ठिकाणी त्यांची परिस्थिती बिकट असते. ऊसतोडीसाठी वंजारवाडीतील गावातले ८० टक्के लोक ऑक्टोबर ते मार्च यादरम्यान हंगामी स्थलांतर करतात.
ऊसतोड मजुरांची कैफियत
वंजारवाडीतल्या इतर महिलांनीही ऊसतोडमजुरांची कैफियत मांडली. "शेतामध्ये खोपटं बांधून राहावं लागतं. ऊसतोडीच्या वेळा रात्री-अपरात्रीही असतात. झोपेची वेळ ठरलेली नसते. अशात पाळीचा त्रास सुरू झाला की जीव हैराण होतो. म्हणून कारखान्यावर जाण्याआधी अनेक बाया 'पिशवी' काढतातच."
गर्भाशय काढल्यानंतर काय होईल, याविषयी डॉक्टर महिलांना काही सांगत नाहीत. त्यामुळे आरोग्याची वाताहत झाल्यानंतर काय करावं, हे त्यांना कळत नाही.
कमी वयात गर्भाशय काढल्याने शैला सानप यांचा त्रास आणखीनच वाढला. ऑपरेशन झाल्यावर एक महिनाभर घरी थांबल्या. नंतर ऊस तोडायला गेले. तिथे त्रास व्हायला लागला.
शैला यांच्या ऑपरेशनला तीन वर्षं होऊन गेली आहेत. पण आता त्या कंबरदुखी, मानदुखी, गुडघेदुखी यामुळे हैराण असतात.
"टाचा दिवसभर दुखतात. सकाळी झोपून उठले की तोंड, हात, पाय सुजलेले असतात. हातातल्या बांगड्या हलत नाहीत. इतकं अंग सुजतं."
वंजारवाडीतल्या मंगल विघने यांचीही हीच कहाणी आहे. त्यांचं वय आज 39 वर्षं आहे.
'जगण्याचा भरवसा वाटत नाही'
मंगला सांगत होत्या, "आता वाटतं हात टेकून पुढे सरकावं. काम करण्याची इच्छाच होत नाही. किती दिवस जगेन याचा भरवसाही वाटत नाही. रानात मोळी आणायला गेलं की वाटतं तिथेच चक्कर येऊन पडेन."
मंगल यांनी ऑपरेशननंतर वर्षभरातच ऊसतोडीला जाणं बंद केलं.
बीड, उस्मानाबाद, सांगली सोलापूरमध्येही केसेस
बीडमध्ये वंजारवाडीसारखी अनेक गावं आहेत जिथे तरुण महिला गर्भाशयाविना आयुष्य जगत आहेत. बीड, उस्मानाबाद, सांगली, सोलापूर या चारही जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात आम्ही काही गावांना भेटी दिल्या. या गावांमधील स्थलांतर करणाऱ्या महिलांसोबतच इतर शेतकरी महिलांमध्येही गर्भाशय काढण्याचं प्रमाण मोठं असल्याचं आढळलं.
पण याचा कोणताही अधिकृत आकडा उपलब्ध नाही.
महाराष्ट्रासह कर्नाटक, बिहार, राजस्थान, गुजरातमधील ग्रामीण भागात अनावश्यक हिस्टरेक्टोमीचं प्रमाण वाढत असल्याचं आरोग्यविषयक संस्था हेल्थ वॉच ट्रस्टने नोंदवलं आहे. याविषयीची राष्ट्रीय परिषदही त्यांनी UNFPAच्या मदतीने 2013 मध्ये भरवली होती.
स्थलांतर आणि हिस्टरेक्टोमी
सामाजिक कार्यकर्त्या आणि तथापी या संस्थेच्या मेधा काळे यांच्या मते, "ऊसतोड मजूरच नाही तर कामासाठी स्थलांतर करणाऱ्या महिलांमध्येही हे प्रमाण आहे. कारण स्थलांतर करणाऱ्या महिलांमध्ये गर्भाशयाचे आजार जास्त असतात. या महिलांच्या अनारोग्याचा फायदा डॉक्टर घेताना दिसतात. या महिला गरीब आहेत हे आणखी एक वास्तव."
मेधा काळे यांनी काही वर्षांपूर्वी लातूर आणि उस्मानाबादमधील हिस्टरेक्टोमी ऑपरेशन झालेल्या महिलांचा अभ्यास केला होता. त्यात त्यांनी निरीक्षणं नोंदवली आहेत.
गर्भाशय काढण्याचा प्रश्न किती मोठा आहे, याविषयी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला काहीही माहीत नाही.
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "कोणत्याही प्रकारची अनावश्यक सर्जरी करणं हा कायद्याने गुन्हा आहे. विनाकारण हिस्टरेक्टोमीची सर्जरी करणाऱ्या डॉक्टरांविरोधात कोणतीही व्यक्ती, संस्था वा तक्रार करू शकतात. मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी असलेल्या कोणत्याही डॉक्टरविरोधात अशी तक्रार आली तर त्याच्या विरोधात कारवाई होऊ शकते."
अशा परिस्थितीत सामाजिक संस्थाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. सांगलीमध्ये येरळा प्रोजेक्ट कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून गर्भाशय आणि हिस्टरेक्टोमी विषयी जागृतीचं काम करत आहेत.
"सांगलीचा जत हा भाग दुष्काळी भाग आहे. ज्या भागात हिस्टरेक्टोमीचं प्रमाण अधिक आहे हा सगळा दुष्काळी पट्टा असल्याचं आमच्या लक्षात आलं", सांगलीच्या येरळा प्रोजेक्टच्या कार्यकर्त्या अपर्णा कुंटे यांनी माहिती दिली.
हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे डॉ. शशिकांत अहंकारी यांच्या मते, "हिस्टरेक्टोमीची ऑपरेशन्स करण्याचं प्रमाण गेल्या आठ-दहा वर्षांमध्येच वाढलं आहे. यात केवळ डॉक्टरांना दोष देऊन चालणार नाही तर परिस्थिती बदलणं गरजेचं आहे."
गर्भाशयाच्या आजारांविषयीचं अज्ञान दूर करण्यासाठी आता ही संस्था महिलांसोबतच पुरुषांमध्येही गर्भाशयाची योग्य माहिती पोहचवण्याचं काम करतेय.
पुरुषांमध्येही जागृतीची गरज
पुरुष आरोग्यवैद्यक तयार केल्यामुळे गर्भाशयाच्या आजारावरील उपचारासाठी महिलेसोबत नवराही यायला सुरुवात झाली आहे.
डॉ. शुभांगी अहंकारी याचं म्हणणं आहे की, "मायांगातील पिशवीच्या तोंडाचा तसंच गर्भाशयाचा कॅन्सर, अंडकोश फायब्रॉईड आजार चोरपावलाने येतात. त्यामुळे लवकरात लवकर निदान होणं गरजेचं असतं. अनेकदा लैंगिक संबंधात संसर्गामुळेही काही आजार वाढू शकतो. बायकांना घरामध्ये दुय्यम स्थान असल्याने त्या मोकळेपणाने बोलत नाहीत. त्या कोणताही आजार निमूटपणाने सहन करत राहतात."
त्यामुळेच नवरा-बायकोने जोडीने तपासणीसाठी करण्यावर डॉ. अहंकारी भर देतात.
हॅलो मेडिकल फाऊंडेशनचं काम १४० गावांमध्ये सुरू आहे. संस्थेने प्रशिक्षित केलेल्या भारतवैद्य कार्यकर्ते, आशा सेविका आणि आरोग्य कार्यकर्त्या गावातल्या आरोग्याच्या प्रश्नावर काम करत आहेत. या कामाचा परिणाम म्हणून महिला वेळीच उपचार करण्यासाठी पुढे येत आहेत.
अशाच प्रकारच्या जनजागृतीमुळे महाराष्ट्राच्या शेजारील राज्य असलेल्या कर्नाटकमध्ये हजारो लमाणी महिलांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रस्त्यावर येऊन निदर्शनं केली होती. त्यांची गर्भाशयं खासगी डॉक्टरांनी काढली होती. या महिलांना संघटित करणारी कर्नाटक जनारोग्य चलवली ही संस्था काही खासगी डॉक्टरांच्या विरोधात कायदेशीर लढा देत आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)