You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुण्यात आईनं दिलं मुलीला गर्भाशय; पण हे किती कठीण होतं माहितेय?
- Author, सरोज सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
गर्भाशय प्रत्यारोपण आणि त्यानंतरचं गरोदरपण हे विज्ञानासमोरचं आव्हान मानलं जातं. डॉ. शैलेश पुणतांबेकर आणि त्यांच्या चमूने हे आव्हान पेललं आहे.
'मी केवळ 28 वर्षांची आहे. या वयात माझे तीन गर्भपात झाले आहेत. एक मुलगा जन्मताक्षणी गेलेला आढळला. डॉक्टरांनी सांगितलं की मला आता मुलाला जन्म देता येणार नाही. मला स्वत:चं मूल हवं आहे. मला सरोगसीद्वारे मूल नकोय आणि मला मूल दत्तकही घ्यायचं नाहीये. तुम्हीच सांगा- काय होऊ शकतं?' आई होण्यासाठी आतूर मीनाक्षी वलांड सांगतात.
गुजरातमधल्या भरूचच्या मीनाक्षी वलांड यांनी डॉ. शैलेश पुणतांबेकर यांची भेट घेतली. त्यावेळी मीनाक्षी खूपच निराश होत्या.
ते वर्ष होतं 2017 आणि महिना होता एप्रिल. प्रचंड अशा उकाड्यात मीनाक्षी आपल्या आई आणि घरच्यांसह डॉ. शैलेश यांच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या.
गर्भाशयाच्या प्रत्यारोपणासाठी डॉ. शैलेश पुणतांबेकर संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहेत. पुण्यातल्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ते कार्यरत आहेत.
अशर्मान सिंड्रोम काय आहे?
मीनाक्षीच्या गर्भात मूल राहत नव्हतं. कारण त्यांना अशर्मान सिंड्रोम नावाचा आजार होता. या आजारात मासिक पाळी न आल्याने अडचणी निर्माण होतात. गर्भाशय अनेक वर्ष काम करत नाही. एकामागोमाग एक गर्भपात झाल्याने हा आजार होतो. याव्यतिरिक्त पहिल्या गरोदरापणानंतर गर्भाशयाला जखम झालेल्या या स्त्रियांना हा आजार होतो.
International Journal of Applied Research या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, जगात 15 टक्के महिला वेगवेगळ्या कारणांमुळे आई होऊ शकत नाहीत. यापैकी 3 ते 5 टक्के महिलांना गर्भाशयाचे आजार झालेले असतात.
दोन वर्षांपूर्वी मीनाक्षी गरोदर होत्या. तो एक क्षण होता आणि आज हा दिवस आहे.
आई होण्याचं माझं स्वप्न सत्यात साकारणार आहे. नोव्हेंबरचा पहिला आठवडा कधी एकदा उजाडतो असं मला झालं आहे. हॉस्पिटलात दाखल झाल्यानंतर तिथल्या नर्स आणि डॉक्टरांना मीनाक्षी रोज सांगत असतात.
गेल्या पाच महिन्यांपासून मीनाक्षी हॉस्पिटलमध्ये आहेत. त्या 21 आठवड्यांच्या गरोदर आहेत. मे 2017मध्ये त्यांच्या आईच्या गर्भाशयाचं त्यांच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यात आलं आहे.
गर्भाशय प्रत्यारोपण- आकडेवारी काय सांगते?
जगभरात गर्भाशयाचं प्रत्यारोपण जवळपास होत नाही. डॉ. शैलेश यांच्या मते जगात केवळ 26 महिलांत गर्भाशय प्रत्यारोपण झालं आहे. ज्यापैकी फक्त 14 प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत.
संपूर्ण जगात केवळ 42 गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्याचं एका मीडिया अहवालात म्हटलं आहे. मात्र यातील केवळ आठ महिला शस्त्रक्रियेनंतर गरोदर राहिल्या आहेत.
या आठपैकी सात शस्त्रक्रिया स्वीडनमध्ये तर एक अमेरिकेत झाली आहे. शस्त्रक्रियेनंतर गरोदर राहणाऱ्या मीनाक्षी या आशिया खंडातील पहिल्याच महिला आहेत.
मीनाक्षीला त्यांच्या आईनेच गर्भाशय दिलं आहे. त्यांच्या आई 49 वर्षांच्या आहेत. साधारणत: प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत दात्याचं वय 40 ते 60 वर्षांदरम्यान असावं लागतं.
गर्भाशय देणारी स्त्री ही आई, मावशी किंवा बहीण असावी, असं डॉ. शैलेश सांगतात.
गर्भाशय प्रत्यारोपण संदर्भात देशात कोणताही कायदा नाही. कारण विज्ञानाला आतापर्यंत यात फारसं यश मिळालेलं नाही.
दाता कोण, हे पक्कं झाल्यानंतर लॅप्रस्कोपीच्या माध्यमातून गर्भाशय काढलं जातं. जिवंत स्त्रीचं गर्भाशय काढून ते दुसऱ्या स्त्रीच्या शरीरात बसवलं जातं. हे जिवंत प्रत्यारोपण असतं. या संपूर्ण प्रक्रियेला दहा ते बारा तास लागतात.
अन्य अवयवांच्या प्रत्यारोपणात व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अवयवांचं दुसऱ्यांच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यात येतं. मात्र गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया स्त्री जिवंत असतानाच होतं. मरणोत्तर गर्भाशय प्रत्यारोपण केलं जात नाही.
धोकादायक गरोदरपण
गर्भाशय प्रत्यारोपण झाल्यानंतर साधारण एक वर्षानंतर स्त्रीला गर्भधारणा होऊ शकते. मात्र ही प्रक्रियाही सामान्य नसते.
गर्भाशय प्रत्यारोपणानंतर सर्वसामान्यपणे शरीराकडून नकाराचा धोका असतो. बऱ्याच वेळा शरीर रोपण झालेल्या अवयवाचा स्वीकार करत नाही. त्यामुळे रोपणानंतर एक वर्ष निगराणीखाली ठेवणं आवश्यक असतं.
गर्भाशय प्रत्यारोपणानंतर स्त्रीला मूल हवं असेल तर भ्रूण प्रयोगशाळेत तयार केलं जातं. त्यानंतर ते महिलेच्या गर्भाशयात सोडलं जातं.
भ्रूण तयार करण्यासाठी स्त्री बीज आणि पुरुषाचे शुक्राणू यांचा संयोग घडवला जातो. मीनाक्षी यांच्याबाबतीत हाच प्रयोग करण्यात आला आहे. यावर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेलं भ्रूण डॉ. शैलेश आणि त्यांच्या चमूने मीनाक्षी यांच्या गर्भाशयात सोडले.
गेल्या पाच महिन्यांपासून मीनाक्षी डॉ. शैलेश यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. या पद्धतीत गरोदरपणात प्रचंड धोका असतो, असं डॉ. शैलेश सांगतात. मीनाक्षी यांच्या घरचे आणि डॉक्टरांची टीम कोणत्याही स्वरूपाचा धोका पत्करण्यास तयार नाही.
"मीनाक्षी यांना प्रतिकारक्षमता वाढवणारी अनेक औषधं देण्यात आली आहेत. अशा स्वरूपाच्या गरोदरपणात डायबेटिस होण्याचा धोका असतो. ते नियंत्रणात राखणं महत्त्वाचं असतं. त्याचवेळी रक्तदाब कमी-जास्त होऊ शकतो. त्याकडेही लक्ष ठेवावं लागतं. त्यामुळे मीनाक्षी यांच्या तब्येतीवर कायम लक्ष ठेवणं अत्यावश्यक आहे," असं डॉ. शैलेश यांनी सांगितलं.
मे 2017पासून आतापर्यंत डॉ. शैलेश यांच्या टीमने देशात गर्भाशय प्रत्यारोपणाच्या सहा शस्त्रक्रिया केल्या आहेत. या सहाही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दात्याच्या गर्भाशयाला गरोदर राहण्याची सवय नसते. यामुळे गरोदरपणातला धोका वाढतो. मीनाक्षी यांच्या आई 20 वर्षांपूर्वी गरोदर होत्या. 20 वर्षांनंतर शरीरातील गोष्टी बदलल्या तर अडचणी उद्भवणं साहजिक आहे.
मीनाक्षी यांची प्रसुती ज्यावेळी होईल त्यावेळी सीझेरियन पद्धतीने होईल, असं डॉ. शैलेश यांनी स्पष्ट केलं.
सिझेरियन का?
डॉ. शैलेश यांनी सविस्तरणे प्रक्रिया समजावून सांगितली. "गर्भाशय प्रत्यारोपणावेळी फक्त गर्भाशयाचं दुसऱ्या शरीरात रोपण केलं जातं. आजूबाजूच्या शिरांचं प्रत्यारोपण होत नाही. यामुळे यास्वरूपाच्या गरोदरपणात प्रसूतीवेदना होत नाहीत," असं त्यांनी सांगितलं.
अशा प्रसूतीद्वारे जन्म होणाऱ्या बाळाच्या प्रकृतीला किती धोका असतो?
देशातलं अशा प्रकारचं हे पहिलंच प्रत्यारोपण आहे. अशा स्वरूपाच्या प्रसूतीनंतर बाळाचं आरोग्य ठीक असतं. मात्र आईला सगळ्यातून सावरण्यासाठी 12 ते 15 आठवड्यांचा वेळ लागतो. मीनाक्षी यांच्या बाबतीत सगळं सुरळीत होईल असा आम्हाला विश्वास आहे, असं ते म्हणतात.
'International journal of applied research'नुसार गर्भाशय प्रत्यारोपणासाठी सात ते दहा लाखांचा खर्च येतो.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)