You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चाळीशी- पन्नाशीत आई होण्याचं प्रमाण वाढलंय?
डेन्मार्कची अभिनेत्री आणि मॉडेल ब्रिजेट निल्सन यांनी वयाच्या 54व्या वर्षी बाळाला जन्म दिला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे आणि एका नव्या वादाला जन्म दिला आहे.
या अभिनेत्रीला जूनमध्ये मुलगी झाली. 54 व्या वर्षी मातृत्व स्वीकारल्यामुळे टीकेच्या धनी झालेल्या ब्रिजेट यांनी टीकेला उत्तर दिलं आहे.
त्या म्हणतात, "काही महिलांना वाटतं की बापरे, ही किती म्हातारी आहे! या वयात गरोदरपण? पण ज्या पुरुषांना साठीत किंवा सत्तरीत मुलं झालीत त्यांच्याविषयी या महिला काही म्हणत नाहीत."
"प्रत्येकाला कदाचित हे आवडणार नाही आणि मी त्यांच्या मताचा आदर करते. पण माझ्या आयुष्यात मी काय करावं हा माझा प्रश्न आहे. माझ्या नवऱ्याचं आणि माझं नात घट्ट आहे," असं त्यांनी पीपल मॅगझिनला सांगितलं.
ब्रिजेट निल्सन यांनी 39 वर्षांच्या मात्तिया देस्सी यांच्याशी 2006 मध्ये लग्न केलं. वयाच्या 40 व्या वर्षी त्यांनी आपली स्त्रीबीजं गोठवायला सुरुवात केली.
त्या सांगतात की, स्वतःची स्त्रीबीजं वापरून नैसर्गिकपणे गरोदर राहण्याची शक्यता फारच कमी होती. अगदी 3 ते 4 टक्के. पण IVF तंत्रज्ञानाव्दारे तब्बल 14 वर्षांनी त्या गरोदर राहिल्या.
फ्रिदा ही देस्सीपासून झालेली त्यांची पहिली मुलगी आहे. पण त्यांच्या आधीच्या लग्नामधून त्यांना चार मुलं झालेली आहेत.
वयस्कर मातृत्वाचं प्रमाण वाढतंय. 1990 पासून चाळीशीनंतर गरोदर राहाणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण दुप्पट झालं आहे.
मेनोपॉजनंतरचं मातृत्व
यूकेच्या नॅशनल ऑफिस ऑफ स्टॅटिस्टिक्स (ONS)च्या एका सर्वेक्षणात दिसून आलं की, 2016 मध्ये चाळीशीनंतर गरोदर राहणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण 2 टक्क्यांनी वाढलं आहे. गंमत म्हणजे इतर सगळ्या वयोगटांमध्ये गरोदर राहाण्याच्या प्रमाणाचा टक्का घसरला आहे.
पन्नाशीनंतर गरोदर राहाणाऱ्या स्त्रियांचा स्वतंत्र उल्लेख या सर्वेक्षणात केला नसला तरी वंध्यत्व निवारण केंद्रांमधले तज्ज्ञ मात्र सांगतात की, पन्नाशीनंतर गरोदर राहण्याचे उपचार घेणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे.
केअर फर्टिलिटी केंद्राच्या समूह संचालक डॉ. जेनी एल्सन सांगतात की, "पन्नाशी ओलांडलेल्या अनेक महिला गरोदर राहण्यासाठी त्यांच्याकडे उपचार घ्यायला येतात. त्यासाठी त्यांनी खास माहितीपत्रक तयार केलं आहे."
वयस्कर महिलांना होणारी मुलं निरोगी असली आणि त्यांना कुठलाही त्रास होत नसला तरी वय वाढलं की धोका वाढतो. पन्नाशी ओलांडलेल्या महिला सहसा दान केलेलं स्त्रीबीज वापरतात. काही जणीं मात्र तरुण वयातच आपली स्त्रीबीज गोठवतात जी त्यांना नंतर वापरतात येतात.
"पन्नाशी ओलांडलेल्या महिलांची निवड करताना आम्ही जास्त काळजी घेतो. कारण त्यांना डायबेटिस होण्याची शक्यता जास्त असते, कोलेस्टेरॉलचा त्रास असू शकतो आणि ब्रेस्ट कॅन्सरचीही सुरुवात असू शकते," जेनी सांगतात.
उतारवयात गरोदर राहाण्याचा ट्रेंड जरी असला तर पस्तिशीनंतर बाळांना जन्म देणं धोकादायकच समजलं जातं. याचं कारण असं की या वयात वाढतं ब्लडप्रेशर, फिट येण्याची शक्यता आणि गरोदरपणात होणाऱ्या डायबेटिसचा धोका असतो.
वयस्कर महिला गरोदर राहाण्यासाठी जर स्वतःची स्त्रीबीजं वापरत असतील तर वाढत्या वयामुळे बाळात जनुकीय दोष निर्माण होण्याचाही धोका असतो.
पन्नाशीनंतर बाळाला जन्म देणाऱ्या महिलांना स्तनपान देण्यात काही अडचण येत नाही पण बाळाला जन्म दिल्यानंतर लगेचच मेनोपॉजला सामोरे जाणाऱ्या स्त्रियांना काही अडचणींचा सामना नक्कीच करावा लागतो.
"बाळाचा जन्म झाल्यानंतर स्त्रीच्या शरीरात हार्मोनल बदल घडतात. स्त्रियांना कदाचित मेनोपॉजचा सामना करावा लागू शकतो. भावनिकदृष्ट्या त्या कोलमडू शकतात. शरीरात हॉट फ्लशेस येऊ शकतात. त्यात बाळामुळे रात्रीची जागरण झाली तर परिस्थिती आणखी बदलू शकते," जेनी सांगतात.
तरीही, पन्नाशीनंतरच्या महिला तरुण आयांच्या तुलनेत मदत मागायला संकोच करत नाहीत, असंही निरीक्षण त्या नोंदवतात.
वयस्कर आयांना पाठिंबा नाही
अजून एक मुद्दा म्हणजे उतारवयात आई होणाऱ्या महिलांना त्यांच्या स्वकीयांकडून पाठिंबा मिळत नाही. लहान बाळाची आई पन्नाशीतली असं चित्र किती वेळा तुम्हाला दिसतं? अर्थात पस्तिशी-चाळीशीच्या पुढच्या महिलाही त्यांच्या लहान मुलांना शाळेत घ्यायला आलेल्या दिसतात. पण पन्नाशीच्या पुढच्या तर फारच कमी.
डॉ झेनप गर्टीन लंडनच्या विमेन्स क्लिनिकमध्ये सिनिअर रिसर्च असोसिएट आणि केंब्रिज विद्यापिठाच्या फॅमिली रिसर्च सेंटरच्या व्हिजीटिंग रिसर्चर आहेत.
"सगळ्याच आयांना बाळ झाल्यानंतर मदत आणि पाठिंब्याची गरज असते. पण वयस्कर महिलांना मदत करणारे सपोर्ट ग्रुप्स फार कमी आहेत."
वयस्कर महिलांना वयस्कर पुरुषांच्या तुलनेत उतारवयात बाळ झाल्यानंतर प्रखर टीकेला तोंड द्यावं लागतं हे ब्रिजेट निल्सन यांचं वाक्य गर्टिन यांना मान्य आहे.
56 वर्षी बाप बनल्यावर जॉर्ज क्लुनीवर कोणी टीका केली नाही
"जॉर्ज क्लुनीला 56 व्या वर्षी जुळी मुलं झाली, पण कोणी एका शब्दाने त्यावर बोललं नाही. कोणत्याही वयात मुलं झाली तरी वडिलांच्या बाबतीत काही फरक पडत नाही. मुलं वाढवणं त्यांची जबाबदारी थोडीच आहे असं समजतात," गर्टिन म्हणतात.
"स्त्रीने मात्र उशिरा मातृत्व स्वीकारलं तर तिच्यावर स्वार्थी असल्याचा आरोप केला जातो."
लंडनचं विमेन्स क्लिनिक 54 वर्षांपर्यंतच्या महिलांवर दान केलेल्या स्त्रीबीजांव्दारे मुलं होण्यासाठी IVF उपचार करतं.
"यूकेमध्ये कोणत्या तारखेआधी जन्मलेल्या महिलांवर IVF उपचार करायचे नाहीत असं काही स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने जे योग्य असेल ते आम्ही लक्षात घेतो," गर्टिन सांगतात.
या क्लिनिकमध्ये आपली स्त्रीबीजं गोठवण्यासाठी येणाऱ्या तरुण स्त्रियांच्या संख्येत 2004 ते 20015 या काळात तिपटीने वाढ झालेली आहे.
पण यूकेच्या नॅशनल हेल्थ स्कीमनुसार IVF उपचार फक्त 42 व्या वर्षांपर्यंतच करावे अशी सूचना केली आहे.