You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सावधान! 'इबोला' रोगाचा पुन्हा एकदा उद्रेक होतोय
डेमोक्रॅटीक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये पुन्हा इबोलाची लागण झाल्यानं जागतिक आरोग्य संस्थेनं (WHO) तातडीची बैठक बोलावली आहे.
WHOच्या बैठकीत आंतरराष्ट्रीय पातळीवर 'सार्वजनिक आरोग्य आणीबाणी' घोषीत करायची की नाही? या बाबत निर्णय घेतला जाणार आहे. असं झालं तर इबोला आटोक्यात आणायला मोठी तयारी केली जाईल.
काँगोत कमीत कमी 44 लोकांना इबोलाचा संसर्ग झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर इथं 23 जणांचा मृत्यू नेमका कशानं झाला याची चौकशी केली जाणार आहे.
काँगोच्या ग्रामिण भागात उद्भवलेला इबोला आता एमबंडाका शहरात परसला असल्याचं सांगितलं जात आहे.
काँगो नदीच्या काठावर असलेल्या एमबंडाका शहराची लोकसंख्या ही 10 लाखाच्या आसपास आहे. त्यामुळे काँगोची राजधानी किन्शासा आणि शेजारच्या देशात इबोलाचा प्रसार होऊ शकतो.
इबोला हा संसर्गजन्य आजार असून त्यामुळे शरीरांतर्गत रक्तस्त्राव झाल्यानं मृत्यू ओढावू शकतो. या रोगाची लागण झाल्यावर एक वेगळ्या प्रकारची सर्दी होते.
2014 ते 2016 दरम्यान पश्चिम आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्रेकात 11,000 लोकांचा मृत्यू झाला होता. हा रोग आटोक्यात आणण्यासाठी आम्ही तेव्हा कमी पडलो असं जागतिक आरोग्य संघटनेनं मान्य केलं आहे.
ही चिंतेची बाब का आहे?
एमबंडाका शहरात इबोलाची लागण झाली तर तो मोठ्या प्रमाणावर पसरू शकतो, अशी माहिती WHO चे वरिष्ठ अधिकारी पीटर सलामा यांनी बीबीसीला दिली.
"या घटनेमुळे इबोलाचा मोठा उद्रेक होऊ शकतो. ग्रामिण भागापेक्षा शहरी भागात पसरलेला इबोला हा भयानक आहे. शहरात त्याचा वेगानं प्रसार होऊ शकतो," असं त्यांनी सांगितलं.
सलामा पुढे सांगतात, "एमबंडाका शहर हे काँगो नदीच्या काठावर आहे. त्यामुळे काँगो-ब्राझाविल भाग, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक देश आणि काँगो नदीवरच्या किन्शासा शहरात याचा प्रसार होण्याची दाट शक्यता आहे. किन्शासा शहराची लोकसंख्या 10 लाख आहे."
"ही समस्या काळजीपूर्वक हाताळावी लागणार आहे. त्यासाठी एमबंडाका शहरातला इबोलाचा प्रसार लवकर थांबवण्यासाठी ताबडतोब योजना आखाव्या लागणार आहेत," असंही ते सांगतात.
2014-16 मधला पश्चिम आफ्रिकेतला इबोलाचा उद्रेक हा सिएरा लिओन, गिनी आणि लायबेरिया देशात पसरल्यानं हा रोग जिवघेणा ठरला होता.
इबोला आटोक्यात आणण्यासाठी काय केलं जात आहे?
WHOनं दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत इबोलाच्या 44 केसेसची नोंद झाली आहे. त्यापैकी 3 लोकांना प्रत्यक्ष इबोलाची लागण झाली आहे. आणखी 20 रुग्णांचं निदान सुरू आहे. तर 21 रुग्ण संशयित आहेत. काँगोमधल्या इक्वाटूर राज्यात याचा पहिला रुग्ण सापडला.
एमबंडाका भागात योग्य ती व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती सलामा यांनी बीबीसीला दिली.
"एमबंडाका शहराच्या दक्षिणेकडे बिकारो हे ठिकाण आहे. तिथं इबोला रुग्णाच्या अंत्यविधीसाठी गेलल्या लोकांना त्याची लागण झाल्याची शक्यता आहे," असं ते पुढं म्हणाले.
बुधवारी (16 मे) रोजी WHOनं पाठवलेले प्रायोगिक लसीचे 4000 डोस किन्शासाला पोहोचले आहेत.
एमबंडाका शहरात इबोला व्हायरसच्या संपर्कात आलेल्या लोकांना ही लस प्राधान्यानं दिली जाणार आहे. त्यानंतर ती इतर भागात पाठवली जाणार आहे, असं सलामा म्हणाले.
मर्क फार्मा कंपनीची लस याआधी पश्चिम आफ्रिकेतल्या उद्रेकात प्रभावी ठरली होती. पण या लसीला लायसन्स मिळालं नाही. या लसीला -60 ते -80 डिग्री तापमानात ठेवावं लागतं आणि काँगोमधला वीज पुरवठा बेभरवशाचा आहे.
WHOच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी या आजाराच्या संपर्कात आलेल्या 430 संशयितांना ओळखलं आहे. तसंच काँगोच्या इतर भागातल्या 4000 संशयित रुग्णांचा ते शोध घेत आहेत. त्यापैकी बहुतेक रुग्ण दूर भागात राहतात.
इबोला परत परत का उद्भवतो?
2014 -2016 दरम्यान डेमोक्रॅटीक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये तीन वेळा इबोलाचा उद्रेक झाला आहे. वटवाघुळामुळे इबोला खूप लांब अंतरावर पसरू शकतो.
आफ्रिकेतल्या बुश प्राण्याचं दूषित मांस खाल्ल्यामुळे माणसाला इबोला होऊ शकतो.
इबोलाची लागण झालेल्या प्राण्याचं रक्त किंवा अवयवाच्या संपर्कात आलेल्या माणसाला इबोला होतो. यामध्ये चिंपाझी, गोरिला, काळवीट या प्राण्यांचा समावेश होतो.
इबोला झालेल्या सगळ्याच प्राण्यांचा नायनाट करणं शक्य नाही. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांना इबोला होत राहणार आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)