You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिवसाला तीन कप कॉफी... बिनधास्त प्या!
कॉफीत कॅफीन असल्यामुळे कॉफी प्यावी का आणि कॉफीचा आरोग्यावर काही हानीकारक परिणाम होतो का याविषयी अनेकदा उलटसुलट चर्चा होते. मात्र एका नव्या संशोधनानुसार दिवसाला तीन ते चार कप कॉफी पिणं आरोग्यासाठी चांगलं असल्याचं स्पष्ट झालं आहे.
कॉफी पिणाऱ्यांमध्ये लिव्हरचे आजार आणि काही प्रकारचे कॅन्सर यांचं प्रमाण कमी असल्याचं आढळून आलं. ह्दयविकारामुळे मृत्यू होण्याचं प्रमाणही कॉफीसेवनाशी संबंधित नसल्याचं सिद्ध झालं. पण या प्रमाणामागे कॉफी पिणं हे एकमेव कारण आहे, हे काही सिद्ध होऊ शकलेलं नाही.
दरम्यान गरोदरपणात जास्त कॉफी पिणं आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतं, असं या अभ्यासाअंती स्पष्ट झालं आहे.
कॉफीचा मानवी शरीरावर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी साऊदॅम्पटन विद्यापीठातील संशोधकांनी कॉफीसेवन करणाऱ्या दोनशेहून अधिक व्यक्तींचा अभ्यास केला.
कॉफी कारण ठरली का?
कॉफी पिणारे आणि कॉफी न पिणारे यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. दिवसाला तीन ते चार कप कॉफी पिणाऱ्यांमध्ये हद्यविकाराचं प्रमाण कमी असल्याचं सिद्ध झालं आहे.
कॉफी पिण्याने यकृताचे आजार तसंच कर्करोग होण्याचं प्रमाण कमी होतं. तसंच हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचं प्रमाणही कॉफी पिणाऱ्यांमध्ये कमी आढळतं.
पण अशा निरोगी आरोग्यासाठी आणि गंभीर आजारापासून सुटका होण्यासाठी फक्त कॉफी हेच कारण आहे, असं सर्वार्थानं म्हणता येणार नाही, असं या संशोधनातील सहअभ्यासक प्राध्यापक पॉल रोडेरिक यांनी सांगितलं.
कॉफीच्या बरोबरीनं कॉफी पिणाऱ्याचं वय, ध्रूमपान करतो की नाही किंवा पिणारा नियमित व्यायाम करतो का हे मुद्देही लक्षात घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.
या संशोधनामुळे गेल्या काही दिवसांत कॉफीसेवनाशी संबंधित विविध संशोधनं आणि अभ्यासाच्या निष्कर्षांना बळ मिळालं आहे. मर्यादित प्रमाणात कॉफीसेवन उपयुक्त ठरू शकतं. मात्र गरोदर महिलेने दिवसभरात दोनपेक्षा जास्त कप कॉफी पिऊ नये, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.
ब्रिटनच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्राशी संबंधित राष्ट्रीय आरोग्य योजना अर्थात NHS नं गरोदर स्त्रियांसाठी 200 मिलीग्रॅम कॅफीनची मर्यादा घालून दिली आहे. 200 मिग्रॅ म्हणजे दोन कप. यापेक्षा जास्त कॅफीन दरदिवशी पोटात जाता कामा नये, असं तज्ज्ञ सांगतात. कारण त्यानं गर्भपाताचा धोका वाढतो.
या अभ्यासाअंती असंही सांगण्यात आलं की, ज्यांची हाडं सातत्यानं फ्रॅक्चर होत असतात, त्यांनीही जास्त कॉफी पिणं टाळावं.
बाकी निरोगी व्यक्तींसाठी दररोज 400 मिलीग्रॅम एवढ्या प्रमाणात कॅफीन घेतलं गेलं तरी काहीच हरकत नसते. 400 मिलीग्रॅम म्हणजे तीन ते चार कप कॉफी घेतली तरी चालू शकते. पण दिवसभरात फक्त कॉफीचं प्रमाण लक्षात घेऊन भागणार नाही. इतरही पेयांमध्ये कॅफीन असतंच.
आपल्या कपात कॅफीनचं प्रमाण किती?
- एक कप इन्स्टंट कॉफी- 100 मिलीग्रॅम
- एक कप फिल्टर कॉफी- 140 मिलीग्रॅम
- एक कप चहा- 75 मिलीग्रॅम
- एक कप कोला- 40 मिलीग्रॅम
- 250 मिलीचा एनर्जी ड्रिंकचा कॅन- 80 मिलीग्रॅम
- चॉकलेट बार- 25 मिलीग्रॅमपेक्षा कमी
- मिल्क चॉकलेट बार- 10 मिलीग्रॅमपेक्षा कमी
कॉफी पिणाऱ्यांनी 'हेल्दी कॉफी' प्यावी, असंही हे अभ्यासक सांगतात. म्हणजेच कॉफीबरोबरचा चमचमीत फराळ, कॉफीत घातलेली अतिरिक्त साखर, दूध, क्रीम असं सगळं टाळावं.
कॉफीसेवनाचे फायदे तपशीलवार समजून घेण्यासाठी काही काटेकोर शास्त्रीय चाचण्या आता करण्यात येणार आहेत.
कॉफीसेवनाचे ठोस फायदे मांडणं तूर्तास अवघड असल्याचं संशोधकांनी सांगितलं. मोठ्या प्रमाणावर कॉफीसेवनामुळे काय गंभीर परिणाम होतात याबाबतही पुरेशी स्पष्टता नाही असं जॉन हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे एलिसो गुआलर यांनी सांगितलं.
मर्यादित कॉफीसेवनाला कोणतीही हरकत नाही. 18 वर्षांपेक्षा अधिक व्यक्तींसाठी सुदृढ आहारात कॉफीचा समावेश होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं.
या संशोधनाबद्दल प्रतिक्रिया देताना किंग्ज कॉलेजमधील आहारविज्ञानाचे प्राध्यापक टॉम सँडर्स म्हणाले, "काही लोक कॉफी पिण्याचं टाळतात, कारण कॉफी प्यायल्यानं डोकं दुखतं, असा अनेकांचा अनुभव आहे. कॉफी प्यायल्यानंतर वारंवार लघवीला जाण्याची भावना निर्माण होते. हेदेखील ती टाळण्यामागचं कारण आहे."
"ज्या व्यक्तींमध्ये हृदयाचे ठोके अनियमित असण्याची समस्या असते, त्यांना डिकॅफिनेटेड म्हणजेच कॅफीन विरहित कॉफी पिण्याचा सल्ला दिला जातो. कधीकधी कॅफीनमुळे रक्तदाब वाढू शकतो", असंही प्रा. सँडर्स यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)