You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महिलांनो, आपलं हृदय जपा! कार्डिअॅक अरेस्टचा धोका नेमका कधी जास्त?
- Author, सरोज सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
श्रीदेवी यांनी अचानक जगाचा निरोप घेतला तेव्हा त्यांचा मृत्यू कार्डिअक अरेस्टने झाला, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. केवळ 54 व्या वर्षी श्रीदेवींचं हृदय कसं काय बंद पडू शकतं, म्हणून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली.
पण काल बाहेर आलेल्या एका शवविच्छेदन अहवालानुसार त्यांचा मृत्यू बुडून झाला आहे. पाण्यात बुडाल्याने त्यांचा श्वास गुदमरून हृदय बंद पडलं.
पण प्रथम बातमीनंतर अनेकांच्या मनात ही धडकी भरली - असं कसं अचानक हृदय बंद पडलं? या वयात महिलांना हृदयविकाराची शक्यता जवळपास नसतेच, असा प्रचलित समज आहे. त्यात किती सत्य?
इंडियन मेडिकल असोसिएशननं सांगितलं की महिलांमध्ये हृदयाचं आरोग्य जपण्यासाठी जागरूकतेची गरज आहे. यासाठी अभियान चालवण्यात यावं.
महिलांना सगळ्यांत जास्त धोका?
इंडियन मेडिकल असोसिएशनशी संलग्न डॉक्टर के.के. अग्रवाल यांच्या मते महिलांमध्ये रजोनिवृत्ती आधी हृदयविकाराचा धोका संभवत नाही. याचं कारण महिलांच्या शरीरात विशिष्ट प्रकारच्या हॉर्मोनची निर्मिती होते. या हार्मोनमुळे महिलांना असलेला हृदयविकाराशी संबंधित धोका कमी होतो.
मात्र गेल्या काही महिन्यांत महिलांमध्ये रजोनिवृत्तीआधीच्या काळातही हृदयविकाराच्या घटना घडू लागल्या आहेत. हृदयाशी संबंधित विकार महिलांमध्ये वाढू लागले आहेत.
डॉ. अग्रवाल यांच्या मते, हृदयविकार धक्क्यांच्या दहापैकी तीन घटना महिलांसोबत घडतात.
महिलांमध्ये हृदयविकार वाढण्याची कारणं
महिलांना हृदयाशी संबंधित विकार जडतो, तेव्हा पुरुषांच्या तुलनेत त्यांना असलेला अधिक धोका गंभीर असतो.
महिलांमध्ये हृदयविकाराचा धक्का कमी तीव्रतेचा असतो. पण त्याचा झटका आल्यास त्यांना श्वास घ्यायला अडचण निर्माण होऊ शकते.
डॉ. अग्रवाल यांच्या मते महिलांमध्ये आजाराचं निदान आणि उपचार उशिरानेच सुरू होतात. कारण बहुतांश महिला छातीतलं दुखणं गंभीरपणे घेत नाहीत.
हे दुखणं जीवावर बेतू शकतं याची त्यांना कल्पना नसते. यामुळेच त्या रुग्णालयातही उशिराने जातात. यातुलनेत पुरुषांच्या दुखण्यावर लवकर उपचार सुरू होतात.
महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो. मात्र आकडे वेगळीच परिस्थिती मांडतात. डॉ. अग्रवाल यांच्या मते जगभरात स्तनाच्या कर्करोगामुळे महिलांच्या मृत्यूचं प्रमाण हृदयविकाराच्या धक्क्यांनी होणाऱ्या घटनांच्या तुलनेत कमी आहे. यामुळेच महिलांमध्ये हृदयविकाराशी संदर्भात जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
हृदयाच्या आजाराचं निदान उशिरा का होतं?
महिलांमध्ये ECG अर्थात इलेक्ट्रो कार्डियोग्रॅमची माहिती अचूक नसते. याचं कारण महिलांमध्ये ECG दरम्यान इलेक्ट्रोड वेगळ्या ठिकाणी लावले जातात.
अमेरिकेतील फ्रैमिंघममध्ये महिला आणि हृदयविकारासंदर्भात संशोधन सुरू आहे. या संशोधनानुसार
- महिलांमध्ये कार्डिअॅक अरेस्टचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी आहे.
- रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये हृदयरोगाची शक्यता वाढते.
- वयाची चाळिशीनंतर कोरोनरी हार्टचा आजार दर दोन पैकी एका पुरुषाला आणि दर तीनपैकी एका महिलेला होऊ शकतो.
कोरोनरी हार्टच्या आजाराने जीव गमावणाऱ्या महिलांचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेत अधिक आहे.
दुबईहून प्रकाशित होणाऱ्या खलीज टाइम्सनुसार संजय कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीदेवी यांना याआधी हृदयविकाराचा कोणताही त्रास नव्हता.
हृदयरोगासंदर्भात जागरूकता कशी आणणार?
डॉ. अग्रवाल यांच्या मते अजूनही उशीर झालेला नाही. काही सोप्या गोष्टींचं पालन केलं तर हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. जसं की...
- 6 मिनिटांची वॉक-टेस्ट. एखाद्या महिलेने सहा मिनिटांत 500 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर चालल्यास हृदयात ब्लॉकेज होण्याची शक्यता कमी असते.
- वयाची चाळिशी पार केलेल्या महिलांनी थकवा जाणवणं, छातीत दुखणं याकडे दुर्लक्ष करायला नको.
- महिलांना आनुवंशिक असा हृदयविकाराचा त्रास असेल किंवा घरात कोणाला असा त्रास होत असेल तर त्यांनी सजग राहायला हवं. कुटुंबात कोणत्याही पुरुषाला 55 वयानंतर तर महिलांमध्ये 65 वयानंतर हृदयरोगाची लक्षणं तीव्र होतात.
तुम्ही ही क्विझ सोडवलीत का?
हे वाचलंत का?
हे पाहिलं आहे का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)