You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'श्रीदेवीमुळे मी आज जिवंत आहे' असं हरीश अय्यर का म्हणतात?
- Author, हरीश अय्यर
- Role, LGBTQ हक्कांचे कार्यकर्ते
मी एका दाक्षिणात्य कुटुंबात जन्माला आलो. म्हणून जन्मापासूनच मी श्रीदेवीचं नाव ऐकत होतो.
पुढे वयाच्या सातव्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला आणि त्यानंतर लैंगिक अत्याचाराची मालिकाच सुरू झाली. यातून बाहेर येण्यासाठी मला कुणीतरी आदर्श म्हणून हवं होतं... असं कुणीतरी ज्याच्याकडे बघून मला उमेद मिळेल, संघर्ष करण्याची एक प्रेरणा मिळेल.
त्यावेळेस श्रीदेवीनं खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्यात प्रवेश केला तो तिनं भूमिका केलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून. कलेद्वारे एखादी व्यक्ती सर्वसामान्य माणसाचं आयुष्य कसं बदलू शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री श्रीदेवी.
तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. तिचे सर्वच चित्रपट मला आवडले, असं अजिबात नाही. पण तिच्या काही चित्रपटांनी मात्र मला माझं अस्तित्व शोधण्यासाठी प्रवृत्त केलं. आयुष्याच्या पडत्या काळात मला उभं राहायचं धैर्य दिलं.
पडद्यावर श्रीदेवी भूमिका करत होती आणि तिच्याकडे बघून माझं आयुष्य बदलत होतं. तिच्याकडे बघून मी आयुष्यातल्या संकटांना सामोरं जात होतो. तिच्या विविधांगी आणि धाडसी भूमिकांमुळे माझं आयुष्य बदलत होतं. नुसतं बदलतच नव्हतं तर आज मी जिवंत आहे, त्याचं श्रेयही तिला द्यावं लागेल.
श्रीदेवीनं काही चित्रपटांत केलेल्या भूमिका इतक्या स्ट्राँग होत्या की त्यातून मला नवीन ऊर्जा मिळायची. मग तो चित्रपट 'गुमराह' असो, 'मिस्टर इंडिया' असो वा 'हिम्मतवाला'.
श्रीदेवीनं नेहमीच वेगळ्या भूमिका स्वीकारल्या. ती ज्या प्रकारच्या भूमिका स्वीकारायची आणि ज्या पद्धतीनं पडद्यावर त्यांना साकारायची, त्यातून मला प्रेरणा मिळायची. त्यामुळे जेव्हा तिचा चित्रपट बघताना मी त्यातल्या हिरोच्या नव्हे तर श्रीदेवीच्या भूमिकेत स्वत:ला बघायचो.
श्रीदेवी म्हणजे प्रेरणा
त्या काळी फक्त श्रीदेवीच नव्हे तर अशा बऱ्याच अभिनेत्री होत्या ज्यांचा माझ्या आयुष्यावर प्रभाव होता. पण मोठेपणी काही व्हायची इच्छा असेल तर मला श्रीदेवी व्हायचं होतं.
श्रीदेवी ज्या प्रकारचं आयुष्य पडद्यावर जगायची ते मला प्रत्यक्षात जगायचं होतं. त्यामुळे मी अनेकदा तिच्या भूमिकेची नक्कल करायचो.
'नगीना' बघत असताना पांढरी लुंगी घालून मी जमिनीवर लोळून अक्षरश: सापासारखी, म्हणजेच पडद्यावरल्या श्रीदेवीसारखी वळणं घेत होते. कुणी दरवाजा उघडला तर मी सापाप्रमाणं त्याला डंख मारेन, असं वाटायचं.
इतकी आग, घुसमट माझ्या आत होती आणि या आगीला श्रीदेवीच्या भूमिका स्पर्शून जायच्या. त्यामुळेच मला वाटतं की श्रीदेवीसारखी ना कुणी अभिनेत्री होती, ना कुणी होईल.
पहिली भेट
(आमिर खानचा शो) 'सत्यमेव जयते'चं शूट सुरू होतं आणि आम्ही मेकअप रूममध्ये बसलो होतो. तेव्हा तिथं राखाडी रंगाची एक साडी ठेवलेली होती आणि काही जण तिला इस्त्री करत होते. उत्सुकतेपोटी मी त्यांना विचारलं की, "ही साडी कुणाची आहे?" तर त्यांनी उत्तर द्यायचं टाळलं.
तेव्हा ते लोक मला उत्तर का देत नाही, हे कळालं नाही, थोडं आश्चर्यही वाटलं. नंतर मनात विचार आला की, बाल लैंगिक शोषणावर कार्यक्रम असल्यानं या क्षेत्रात काम करणारी कुणीतरी व्यक्ती असेल.
त्यानंतर आमिर (खान) माझ्याजवळ आला. तो म्हणाला की, "हरीश तुझ्या आयुष्यात चित्रपटसृष्टीचं योगदान खूप मोठं आहे, असं तू सांगितलं होतं. त्यातही श्रीदेवी तुझ्या आदर्श आहेत असंही तू सांगितलं होतं. तर आज श्रीदेवी यांनी खास तुझ्यासाठी एक मॅसेज रेकॉर्ड केला आहे."
त्यानंतर तो म्हणाला की, "श्रीदेवींचा मॅसेज मी तुला काय म्हणून ऐकवू? श्रीदेवी स्वत:च तो तुला ऐकवायला येणार आहेत."
त्यानंतर श्रीदेवींची एन्ट्री झाली आणि त्यांनी माझ्याकडे बघून स्मितहास्य केलं!
हे सर्व मला आश्चर्यचकित करणारं होतं. जे काही मी डोळ्यांनी बघत होतो त्यावर माझा विश्वास बसत नव्हता - हे सगळं खरंच घडतंय ना, की मी स्वप्न बघतोय?
मी विनंती करून श्रीदेवीच्या हाताला स्पर्श केला. तेव्हा कुठं माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला. पटलं की साक्षात श्रीदेवी आपल्यासमोर उभी आहे म्हणून.
श्रीदेवीचा हिरो 'मी'!
शो सुरू असताना श्रीदेवी आणि माझी चर्चा सुरू होती. त्यावेळी तिनं मला सांगितलं की, "ज्या पद्धतीचं जीवन मी जगलो ते पाहिल्यास मी तिच्यासाठी हिरो आहे."
माझ्या स्वप्नातली राणी स्वत:हून मी तिचा हिरो आहे, असं मला सांगत होती.
त्यानंतर श्रीदेवीनं मला तिची स्वाक्षरी असलेल्या तिच्या काही चित्रपटांच्या काही सीडीज दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी राम संपथ यांच्या गाण्याचा कार्यक्रम होता. ते गाणं ऐकूण आमिर, मी आणि उपस्थितांचे डोळे पाणावले होते. तेव्हा श्रीदेवी माझ्या शेजारी बसली होती. माझी अवस्था बघून तिनं माझ्या हातावर हात ठेवून मला धीर देण्याचा प्रयत्न केला.
"हिमतीनं घे, सर्व काही ठीक होईल," असं तिनं मला सांगितलं.
समाजकार्य
श्रीदेवीपासून प्रेरणा घेत मी LGBT समुदायाच्या हक्कांसाठी काम सुरू केलं. त्यासाठी 'बराबरी' नावाची संस्था स्थापन केली.
आता या संस्थेच्या माध्यमातून मी लवकरच 'Sridevi Cinema for Social Transformation' हा उपक्रम सुरू करणार आहे. या माध्यमातून मी एक फिल्म सिरीज लोकांसमोर घेवून येणार आहे.
फक्त श्रीदेवींचेच नव्हे तर इतरही चित्रपट या अंतर्गत दाखवण्यात येईल. आपण बघायलाच हवेत अशा चित्रपटांचा यात समावेश असेल. असे चित्रपट असतील ज्यांच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळेल.
(हरीश अय्यर यांच्यासोबत बीबीसी मराठी प्रतिनिधीअभिजीत कांबळे यांनी साधलेल्या संवादावर आधारित हा लेख आहे.)
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)