श्रीदेवींचं पार्थिव भारतात आणण्यासाठी उशीर का झाला?

सुपरस्टार श्रीदेवी यांचं पार्थिव एक विशेष विमानाने दुबईहून भारतात अखेर आलं. मात्र शनिवारी झालेल्या मृत्यूनंतर त्या विमानाला उड्डाण करायला मंगळवारची दुपार का लागली?

यामागे दुबईच्या प्रशासनाअंतर्गत होणाऱ्या तपासाचं कारण होतं.

श्रीदेवी यांचं मृत्यू प्रकरण दुबई पोलिसांनी दुबईच्या पब्लिक प्रॉसिक्यूटरकडे वर्ग केलं होतं. अशा प्रकरणांच्या कायदेशीर पडताळणीची प्रक्रिया ते पाहतात. या प्रकरणीही हीच प्रक्रिया केली जात असल्याने त्यांचं पार्थिव आणण्यास उशीर झाला.

गल्फ न्यूजचे UAEमधले संपादक बॉबी नकवी यांनी याबाबत बीबीसीचे प्रतिनिधी फैजल मोहम्मद अली यांना माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, "प्रॉसिक्युशन एजन्सी आणि दुबई पोलीस या स्वतंत्र संस्था असून या संस्था वेगवेगळं काम करतात."

पार्थिव मिळण्यापूर्वी त्यांनी बीबीसीला सांगितलं होतं की, "या प्रकरणी दुबई पोलिसांनी तपास करून एक न्यायवैद्यकीय अहवाल तयार केला आहे. प्रॉसिक्यूशन एजन्सी या अहवालांची पडताळणी करून पार्थिव पाठवण्याची परवानगी देईल. सध्या पार्थिव पोलिसांच्या शवागारात आहे. मृतदेह संरक्षित ठेवण्यासाठी त्याला लेप लावण्यात येतो आणि त्यासाठी पार्थिव दुसरीकडे पाठवलं जातं. पण, याप्रकरणी ही प्रक्रिया पोलिसांच्या शवागारात केली जाईल."

याआधी दुबई पोलिसांनी श्रीदेवींच्या मृत्यूमागच्या कारणाबाबत माहिती दिली नव्हती. दुबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीदेवींच्या शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू हॉटेलमधल्या खोलीतल्या बाथटबमध्ये बुडून झाला.

संयुक्त अरब अमिरातीच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या सर्टिफिकेटमध्ये त्यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असं त्यांनी केलेल्या ट्विटमध्येही नमूद करण्यात आलं आहे. याआधी मृत्यूचं कारण हृदयक्रिया बंद पडल्याचं सांगितलं जात होतं.

अखेर मंगळवारी दुपारी दुबईच्या पब्लिक प्रॉसिक्यूशन यांनी श्रीदेवींचं पार्थिव भारतात पाठवण्यासाठीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्याचं सांगितलं. आणि अखेर तपास पूर्ण करून केस बंद करण्यात आल्याचंही सांगितलं.

तुम्ही हे वाचलं का?

हे पाहिलं आहे का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)