श्रीदेवी यांच्या मृत्यू प्रकरणाची दुबईतली केस संपली, बुधवारी अंत्यसंस्कार

श्रीदेवी यांचं पार्थिव भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यांच्या कुटुंबीयांनी मुंबईत उद्या होणाऱ्या अंत्यसंस्कारांविषयीदेखील माध्यमांना माहिती दिली.

श्रीदेवी यांचा शनिवारी रात्री दुबईत मृत्यू झाला होता. त्यांचं पार्थिव भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्याचं दुबई पोलिसांनी म्हटलंय. तसंच दुबईच्या कायद्यानुसार सर्व प्रक्रिया पार पाडल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

दुबई पोलिसांनी दुबईस्थित भारतीय वाणिज्य दुतावास आणि श्रीदेवी यांच्या कुटुंबीयांकडे आवश्यक कागदपत्रं सुपूर्द केली आहेत. ही प्रक्रिया सुरू झाल्यामुळे श्रीदेवी यांच्या पार्थिवावर लेप लावण्याचं काम सुरू होऊ शकेल.

दरम्यान श्रीदेवी यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं की, बुधवारी मुंबईतल्या लोखंडवाला कॉम्प्लेक्स मधल्या त्यांच्या निवासस्थानात सकाळी 9.30 वाजता त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.

विलेपार्ल्याच्या स्मशानभूमीत बुधवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असंही कपूर आणि अय्यप्पन कुटुंबीयांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

सुरुवातीला कपूर कुटुंबीयांच्या निकटवर्तियांशी बोलल्यानंतर श्रीदेवी यांच्या मृत्यूचं कारण कार्डिअक अरेस्ट असं सांगण्यात आलं.

मात्र सोमवारी दुबई पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार श्रीदेवी यांच्या मृत्यू हॉटेलच्या खोलीतील बाथरुममधील बाथटबमध्ये बुडून झाल्याचं सांगण्यात आलं.

श्रीदेवी यांचं पार्थिव भारतात आणण्यासाठी एक विशेष विमान दुबईला आधीच रवाना झालं आहे. मात्र मृत्यूप्रकरणाच्या चौकशीची सूत्रं दुबई प्रॉसिक्युशन विभागाकडे असल्यानं पार्थिव कुटुंबीयांकडे सुपुर्द करून भारतात येण्यास किती वेळ लागेल हे स्पष्ट होत नव्हतं.

दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमधील प्रॉसिक्युशन एजन्सी आणि दुबई पोलीस हे दोन स्वतंत्र विभाग आहेत आणि त्यांचं कामकाज स्वतंत्ररीत्या चालतं.

मंगळवारी दुबईतल्या भारताच्या वाणिज्य दूतावासाच्या अधिकृत हँडलवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दुबई पोलिसांनी वाणिज्य दूतावास आणि श्रीदेवी यांच्या कुटुंबीयांना श्रीदेवी यांचं पार्थिव सोपवण्यासंदर्भात अनिवार्य कागदपत्रं पुरवली आहेत. यामुळे पार्थिव योग्य स्थितीत राहण्यासाठी आवश्यक लेप लावण्याचं काम सुरू होऊ शकेल.

दुबईत नक्की काय झालं?

गल्फ न्यूजच्या संकेतस्थळानुसार दुबई पोलिसांनी मंगळवारी याप्रकरणी श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांची पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली.

पोलिसांनी त्यांचं जबाब नोंदवून घेतला आहे. त्यानंतरच त्यांना हॉटेलमध्ये परतण्याची अनुमती देण्यात आली.

खलीज टाइम्सनुसार श्रीदेवी यांचा मृत्यू झाल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून त्यांचं पार्थिव दुबईतील शवागृहात आहे.

पोलिसांनी याप्रकरणाची सूत्रं दुबई प्रॉसिक्युशन ऑफिसकडे सोपवली आहेत.

सौदी अरेबियातील भारताचे राजदूत नवदीप सुरी यांनी केलेल्या ट्वीटनुसार श्रीदेवी यांच्या आकस्मिक निधनानं प्रसारमाध्यमांना याप्रकरणात स्वारस्य आहे. मात्र अफवांमुळे खरी विश्वासार्ह माहिती वाचक तसंच प्रेक्षकांसमोर येऊ शकलेली नाही.

"श्रीदेवी यांचं पार्थिव लवकरात लवकर भारतात पाठवण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीनं आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही श्रीदेवी यांचे कुटुंबीय आणि हितचिंतकांच्या संपर्कात आहोत. त्यांची मनस्थिती आम्ही समजू शकतो. अशा प्रकरणांमध्ये प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात असा आमचा अनुभव आहे," असं त्यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

तुम्ही ही क्विझ सोडवलीत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)