'रूप की रानी' श्रीदेवी यांची अचानक एक्झिट

    • Author, सुप्रिया सोगळे
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेत्री श्रीदेवी (54) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी रात्री दुबईत निधन झालं. त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली.

त्यांच्या निधनाने शोक व्यक्त होत आहे. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार त्या अमिरातीमध्ये त्यांच्या नातलगाच्या लग्नासाठी गेल्या होत्या.

त्यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963ला झाला होता. 4 वर्षांच्या असल्यापासून त्या सिनेसृष्टीत आहेत. कंधन करुणई या तामिळ सिनेमात त्यांनी बालकलाकाराची भूमिका केली होती. हा त्यांचा पहिला सिनेमा होता. बालकलाकार म्हणून त्यांनी तामिळ आणि मल्याळी सिनेमात भूमिका केल्या आहेत.

दक्षिणेत काम केल्यानंतर त्यांनी हिंदीत पदार्पण केलं. 1979ला आलेला 'सोलवा सावन' हा त्यांचा पहिला हिंदी सिनेमा होता. 1980चं दशक हे श्रीदेवीचं दशक म्हणून ओळखलं जातं. हिंमतवाला, तोहफा, मिस्टर इंडिया, नगिना असे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या श्रीदेवींची ओळख 'लेडी अमिताभ बच्चन' अशी झाली होती.

1997ला त्यांनी 'जुदाई' या सिनेमात भूमिका केली. पण त्यानंतर तब्बल 15 वर्ष त्या सिनेमापासून दूर होत्या. 2012ला आलेला 'इंग्लिश-विंग्लिश' हा सिनेमाही सुपरहिट ठरला होता. 2017मध्ये आलेल्या 'मॉम' या सिनेमात त्यांची भूमिका होती. अभिनेते जितेंद्र यांच्यासोबत त्यांची जोडी विशेष गाजली. हिंमतवाला, तोहफा, जस्टीस चौधरी, मवाली असे हिट सिनेमे या जोडीने दिले आहेत.

आतापर्यंत त्यांनी जवळपास 300 सिनेमात भूमिका केल्या आहेत.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)