श्रीदेवी जेव्हा पुण्याच्या गोडबोले बाई होतात तेव्हा...

    • Author, अरुंधती रानडे जोशी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

'नवराई माझी लाडाची लाडाची गं...' हे गाणं कमालीचं लोकप्रिय झालं होतं काही वर्षांपूर्वी. इंग्लिश विंग्लिश चित्रपटातली ती बावरलेली, लाजाळू, मध्यमवयीन शशी गोडबोले आजही जशीच्या तशी सगळ्यांना आठवते. तमाम मराठी मनांना शशी गोडबोलेचा तो इंग्रजीच्या धास्तीमुळे आलेला भिडस्तपणा आपला वाटला होता तेव्हा.

नवऱ्याची, मुलांची, सासूची निगुतीनं काळजी घेणारी, गृहकृत्यदक्ष आणि मुख्य म्हणजे सतत गृहित धरलेली गृहिणी 'इंग्लिश विंग्लिश'मध्ये समोर आली आणि घराघरातल्या, सर्व वयोगटातल्या स्त्रिया तिच्याशी कनेक्ट झाल्या. श्रीदेवीनं साकारलेली शशी गोडबोले नावाची मराठी गृहिणी एकही मराठी संवाद न बोलताही अस्सल मराठी वाटली, हेच तिच्यातल्या ताकदवान अभिनेत्रीचं यश.

इंग्रजी बोलता न येणारी एक गृहिणी एवढीच ही भूमिका मर्यादित नव्हती. कॉर्पोरेट कल्चरमध्ये काम करणाऱ्या नवऱ्याची मराठी मध्यमवर्गीय बायको आणि तिचं बावचळलेपण शशीच्या भूमिकेत श्रीदेवीनं पुरेपूर उतरवलं होतं. तिचा भिडस्त स्वभाव, चारचौघांत बोलताना कायम घाबरणारी, विमानातसुद्धा घरचे खाऊचे डबे, पाण्याची बाटली नेऊ देण्याची विनंती करणारी, वाईनची कडवट चव पहिल्यांदा विमानात चाखताना कसनुसा चेहरा करणारी, सार्वजनिक ठिकाणी नवऱ्याला मिठी मारायलाही लाजणारी शशी अनेक मराठी स्त्रियांना आपल्यासारखी वाटली. प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवी नव्हतीच त्या पडद्यावर जणू.

दिग्दर्शिका गौरी शिंदे यांनी त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी श्रीदेवी यांना विचारलं तेव्हाचा अनुभव एका मुलाखतीत सांगतात, "चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकवायला गेले तेव्हा पहिल्या वाचनाच्या वेळीच श्रीदेवी यांच्या चेहऱ्यावरच्या रिअॅक्शन्स बघता मला माझी शशी इथेच सापडल्याचं स्पष्ट झालं. चित्रपट बघणाऱ्या सर्वांना हे कास्टिंग योग्य असल्याचं जाणवलं असेल."

जवळपास पंधरा वर्षांनी मुख्य प्रवाहातल्या चित्रपटात मुख्य भूमिका करणं हे एखाद्या प्रथितयश अभिनेत्रीसाठी कसं असू शकतं, याचं विश्लेषण चित्रपट सिने पत्रकार ठाकूर करतात. "श्रीदेवी यांनी चित्रपटातून ब्रेक घेतला त्या दरम्यान एक संपूर्ण नवी पिढी सिनेमात आली होती. या नव्या पिढीला श्रीदेवींचा फिटनेस आवडला आणि त्यांची नव्या गोष्टी जाणून घेण्याची वृत्तीदेखील भावली असावी."

इंग्लिश विंग्लिशच्या दिग्दर्शक गौरी शिंदे सांगतात, "शशीच्या भूमिकेसाठी मला चेहऱ्यावर ते नवखेपण असलेली अभिनेत्री हवी होती. श्रीदेवींसारख्या अभिनेत्रीचा अनुभव एवढा प्रचंड आहे की, त्याचं तेज, तो आत्मविश्वास चेहऱ्यावर असतोच. पण श्रीदेवी यांच्याबाबतीत तसं झालं नाही. त्यांच्या चेहऱ्यावर निरागसता अजूनही टिकून आहे, ती त्यांनी जपली आहे. शशी गोडबोलेच्या भूमिकेसाठी ती खूप आवश्यक होती."

"स्विच ऑन स्विच ऑफ करू शकणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक श्रीदेवी आहे", ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी सांगतात. हट्टंगडी यांनी काही हिंदी चित्रपटांत श्रीदेवी यांच्याबरोबर काम केलं आहे. चालबाज या श्रीदेवी यांच्या गाजलेल्या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी सहकलाकार होत्या. श्रीदेवी यांच्या गुणवैशिष्ट्यांबद्दल सांगताना त्या म्हणतात, "क्षणार्धात भूमिकेत शिरायची कला त्यांना अवगत होती. सेटवर अगदी शांत, गंभीर असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं, पण चित्रपटांतून किती अवखळपणा दाखवला त्यांनी. अॅक्शन म्हटल्यावर इलेक्ट्रिफाय झाल्यासारखी ही अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर वावरायची."

चालबाजमध्ये वेळी रोहिणी हट्टंगडी यांचा एक विचित्र मेक-अप केलेला प्रसंग आहे. तो मेकअप श्रीदेवीनीच केला असल्याचं त्या म्हणाल्या. सहकलाकारांबरोबर श्रीदेवी मिळून मिसळून असायच्या पण तरीही थोडं अंतर राखून असं त्यांचं वागणं असे, असं रोहिणी सांगतात.

श्रीदेवी यांच्या घरी पत्रकारांची फार ऊठ-बस कधीच नसायची. त्या फटकून वागायच्या असं नाही, पण अंतर राखून असायच्या, असं पत्रकार दिलीप ठाकूरही सांगतात. "आम्ही गेल्या जमान्याचे सिने पत्रकार सेट व्हिजिट खूप वेळा करायचो. अशा सेट व्हिजिटच्या वेळी बघितलेली श्रीदेवी अगदी वेगळी असायची. खूप शांत असायची. माध्यम प्रतिनिधींशी फारशी जवळीक साधायची नाही. मीडिया सॅव्हीदेखील नव्हती. निवडक मुलाखती द्यायची. पण मधल्या काळात माध्यमं बदलली आणि श्रीदेवीनं हा बदल आत्मसात केला. इंग्लिश विंग्लिशच्या वेळी मुलाखती देताना किंवा सेटवर वावरताना श्रीदेवी खूपच कॉन्फिडंट वाटली."

रोहिणी हट्टंगडी शशी गोडबोले या श्रीदेवी यांच्या भूमिकेविषयी सांगतात, "मुळात काही दाक्षिणात्य अभिनेत्रींची ठेवण, समज अशी असते की त्या कुठल्याही भूमिकेत चपखल बसू शकतात. श्रीदेवी यांचा चेहरा तसा होता. डोळे विलक्षण बोलके. इतके की त्यातूनही खूप संवाद साधला जायचा. आधुनिक आणि पारंपरिक, ग्लॅमरस आणि नॉन ग्लॅमरस कुठलीही भूमिका श्रीदेवी जिवंत करू शकत असे ती यामुळे. इंग्लिश विंग्लिशमधली शशी गोडबोले मराठमोळी वाटली ती तिच्या पॅराफर्नेलियामुळे आणि अभियनक्षमतेमुळे. अर्थमधली माझी भूमिका मला आठवते इथे. ती नऊवारी साडी, बोलण्याची ढब यातून मराठीपण व्यक्त झालं पाहिजे. तसं श्रीदेवींनी केलं इंग्लिश विंग्लिशमध्ये. साधी साडी, केसांचा शेपटा आणि अशा छोट्या गोष्टी यातून प्रांत, भाषा यापलीकडच्या एका गृहिणीच्या भावना व्यक्त केल्या."

श्रीदेवी यांचं पडद्यामागचं आयुष्य कधीच पडद्यावर जाणवलं नाही. ती जनसामान्यांची आवडती अभिनेत्री होती. तिच्या निधनाची वार्ता कळल्यावर घराबाहेर जमलेल्या चाहत्यांकडे बघून त्यांच्यातलं हे 'मास अपील' दिसून येतं.

'मी आज श्रीदेवीमुळे जिवंत आहे' असं LGBT कार्यकर्ते हरीश अय्यर का म्हणतात?

पण ही अभिनेत्री क्लासिक सिनेमाच्या चाहत्या जाणकारांनाही तेवढीच भावली हे विशेष. या दक्षिण भारतीय अभिनेत्रीला उत्तर भारतानंही 'आपलं' मानलं. कुठल्याही भाषेच्या, प्रांताच्या आणि भूमिकेच्या चौकटीत न अडकल्यानेच या अभिनेत्रीला भारतभर लोकप्रियता मिळाली असावी. इंग्लिश विंग्लिशमध्ये ती म्हणूनच ती मराठमोळी वाटली.

पण गौरी शिंदे यांनी ही भूमिका श्रीदेवींना मग कशी दिली? त्यांच्या तोंडी एकही मराठी संवाद का नाही दिला? एका मुलाखतीत दिग्दर्शिका शिंदे सांगतात, "श्रीदेवीसारख्या अभिनेत्रीला बळजबरीनं मराठी संवाद म्हणायला लावले असते तर ते अनैसर्गिक वाटलं असतं, खोटं वाटलं असतं. त्यातून आम्ही सिंक साउंडचं तंत्र वापरलं होतं. डबिंग फार कमी केलं. त्यामुळे चित्रपटातली शशी 'अगं बाई'पुरतंच मराठी बोलते. पण त्यामुळे काही मोठा फरक पडला नाही."

2012 साली 'इंग्लिश विंग्लिश'च्या पुण्यातल्या प्रीमियरच्या वेळी श्रीदेवी उपस्थित होत्या. तेव्हा त्यांनीही या भूमिकेचं हे स्पष्टीकरण दिलं होतं - "घरात वावरताना आपलेपणानं सगळं करणारी शशी गोडबोले मला जवळची वाटली. पुढे ती मराठी वाटणं न वाटणं मी दिग्दर्शिकेवर सोडलं. गौरीनं सांगितलं तसं केलं. या भूमिकेचा लुक गौरीनं ठरवला होता. तिनं खूप चांगलं काम केल्यानं माझ्यासाठीही सोपं गेलं."

"इंग्रजी न येणारी गृहिणी यापेक्षा अधिक काही या भूमिकेतून सांगायचं होतं. इंग्लिशबद्दल हा सिनेमा नाही, भावनांबाबत आहे. घरातल्यांनी एकमेकांना द्यायच्या आदराविषयी आहे," असंही श्रीदेवी तेव्हा म्हणाल्या होत्या.

या चित्रपटातून पुनरागमन करताना श्रीदेवी एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या, "भूमिकेशी रिलेट करणं महत्त्वाचं. मी स्वतः त्या भूमिकेशी एकरूप तेव्हाच होते, जेव्हा मी अशी रिलेट होऊ शकते. प्रेक्षकही जेव्हा त्या भूमिकेशी रिलेट होतात, तेव्हा ते यश मानायचं."

सगळ्यांना आपलंसं करणाऱ्या, क्लासपासून मासपर्यंत पोहोचलेल्या या अभिनेत्रीचं हे रिलेट होणं, भूमिकेचं होऊन जाणं यामुळेच तिची अचानक एक्झिट सगळ्यांना चटका लावून देणारी ठरली.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)