You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मराठीच्या आधुनिकतेची कदर करा'
- Author, चिन्मय धारूरकर
- Role, भाषावैज्ञानिक
आपण उत्सवप्रिय किंवा उत्सववेडे झालो आहोत. मराठीसाठी 'अभिजात' हा दर्जा मिळवून आपल्याला तो दर्जा मिळाला हे साजरे करायचे आहे. यापलीकडे या मागणीबाबत लोकांना एवढा लोभ असण्याचे दुसरं तरी कोणते कारण दिसत नाही.
मुळात ज्याप्रकारे एकामागून भाषांना अभिजात ठरवण्यात आले आहे, तेच हास्यास्पद आहे आणि आपण त्या स्पर्धेचा केवळ एक भाग बनलो आहोत. अभिजात हे बिरुद मिळवलेल्या भाषांनी आणि भाषकांनी ते मिळवून कोणतेही तीर मारलेले नाहीत. त्यांच्या भाषिक समस्या यामुळे सुटलेल्या नाहीत.
याबाबत जे स्वतःला जाणकार समजतात ते खरेतर आंधळे भाषाभिमानी आहेत किंवा हा दर्जा मिळाल्यावर आपल्याला भरमसाठ निधी मिळणार आहे, त्यातून एखादं विद्यापीठ उभं राहील आणि त्यात आपण कोणतंतरी पद भूषवू अशा कल्पनाविलासातील लोक आहेत. त्यांना जाणकार म्हणावे की भाबडे की धोरणी हा बिकट प्रश्न आहे.
अभिजात म्हणजे काय?
मुळात एखाद्या भाषेस 'अभिजात' दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारने काही निकष घालून दिलेले आहेत ते असे:
- भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा हवा (१५००-२००० वर्षं या काळातील हवा).
- प्राचीन साहित्य हवे, जो त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतो.
- दुसर्या भाषासमूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी.
- 'अभिजात' भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.
या निकषांमध्ये आपापल्या भाषा बसवण्याचा प्रपंच गेली दोन दशकं भारतभर चालू आहे. आधी संस्कृत आणि तामीळ या भाषांना हा दर्जा होता. त्यानंतर एकामागून इतर तीन प्रमुख द्रविड भाषा (कन्नड, तेलुगू आणि मल्याळम) या अभिजात म्हणून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.
संस्कृत ही एक अभिजात भाषा आहे, कारण त्या भाषेत अनेक प्राचीन ज्ञानपरंपरा, साहित्य, शास्त्रे यांचे जतन केलेले आहे. त्याच बरोबर या ज्ञानपरंपरांची साखळी खंडित होत किंवा अखंडपणे आजवर टिकलेली आहे. तीच परिस्थिती तामीळची आहे.
मराठीचा उगम कधी?
गेल्या काही वर्षांत चार प्रमुख दाक्षिणात्य भाषांना अभिजात दर्जा मिळाला, म्हणून महाराष्ट्रातूनही अभिजातपणाची मागणी जोर धरू लागली. पुरातनत्व कमी पडलं की अनेकदा अत्यंत दूरान्वयाने संबंधित पुरावा किंवा लागूच न होणारा पुरावा म्हणून कोणत्यातरी प्राचीन भारतीय कालखंडातील ग्रंथाचे नाव आद्यग्रंथ म्हणून पुढे केले जाते.
तसाच काहीसा 'महाराष्ट्री प्राकृता'शी मराठीचा संबंध प्रस्थापित करून तिसऱ्या शतकातील 'गाथासप्तशती' (गाथासत्तसई असे महाराष्ट्री प्राकृतातील नाव) हा ग्रंथ आदिग्रंथ म्हणून पुढे करण्यात आला. यात गंमत अशी की तिसरे शतक इतका काळ मागे नेल्यावर मध्यंतरीच्या या काळात नेमक्या कोणत्या कोणत्या ग्रंथांची वर्णी लावायची हा प्रश्न पडतो.
आपण अकराव्या शतकातला श्रवणबेळगोळचा शिलालेख आणि मग संतसाहित्य असा प्रवास ऐकलेला असतो. 'महाराष्ट्री प्राकृत' आणि मराठीचा संबंध लावणे हे केवळ अटीत बसवण्याचा अट्टाहास होय. मुळात केवळ नावात 'महाराष्ट्री' असल्याने संबंध प्रस्थापित झाला, इतकी ती सहज सोपी गोष्ट नाही.
महाराष्ट्री प्राकृतची नाळ ज्या निकषांवर मराठीशी जोडता येते, तशीच ती गुजरातीशी देखील जोडता येईल. आणि उद्या ज्या निकषांवर मराठीला अभिजात ठरवले जाईल, त्याच निकषांवर गुजरातीदेखील हा दर्जा मागू शकेल.
[यावर अधिक वाचण्यासाठी पाहा ब्लोख, झूल (१९१४) 'फ़ॉर्मेशन आव मराठी लॅंग्विज' (इंग्रजी भाषांतर: देव राज चनाना) नवी दिल्ली: मोतीलाल बनारसीदास. मराठी भाषांतराचा तपशील: परांजपे, वासुदेव गोपाळ (१९४१) मराठी भाषेचा विकास. पुणे: वासुदेव गोपाळ परांजपे. मूळ फ्रेंच : La Formation de la Langue Marathe यातील उपोद्घातातील $ 10, 11, 19-24 हे भाग अवश्य पाहावेत.]
जुनं तेच सोनं का?
मला वाटतं वासाहतिक आधुनिकतेला सामोरे जाताना भारतीयांनी आपली अस्मिता इतिहासात शोधण्याचा प्रयत्न केला. औद्योगिक आधुनिकता पश्चिमेची तर आध्यात्मिक, ऐतिहासिक वारसा भारताचा असे भाबडे द्वैत आपल्या मनात अजूनही रुजलेले आहे का?
इंग्रजीसारखी अजिबात अभिजात नसलेली आधुनिक भाषा आज जग गाजवत आहे आणि आपण आपल्या भाषांच्या आधुनिकतेची कदर न करता, तिची व्यवहार्यता कशी वाढेल यावर गंभीर उपाययोजना न करता तिला अभिजात म्हणवून घेण्यात धन्यता मानीत आहोत, हे निव्वळ दुर्दैवी आहे.
मराठी अभिजात आहे हे सांगण्यासाठी चांगला पुरावा हवा. अस्सल प्राचीन साहित्यपरंपरा हवी, शास्त्रपरंपरा हवी. मराठी अभिजात नाही, कारण या परंपरा फारफारतर अकराव्या बाराव्या शतकानंतर जोरकसपणे दिसून येतात. त्या आधीच्या प्राकृतांच्या अवस्था अपभ्रंश, पैशाची, महाराष्ट्री, शौरसेनी, अर्धमागधी इत्यादी आहेत. यापैकी एकीला मराठीची आदिम अवस्था ठरवणं हे कठीण आहे. तो कालविपर्यास आणि तर्कदुष्टता आहे.
मराठीसाठी पैसे मिळतील?
यातला सगळ्यांत मोठा भ्रमाचा भोपळा हा की, अभिजात दर्जा दिल्यावर फार मोठ्या प्रमाणात निधी केंद्राकडून राज्याला भाषिक विकासासाठी मिळतो. मल्याळमला हा दर्जा यूपीए-२चे सरकार जाता जाता मिळाला, परंतु अभिजात भाषा निधीच्या अंतर्गत दमडीही केरळ सरकारला मिळालेली नाही. तेलुगूची वेगळी परिस्थिती नाही.
त्यामुळे पैसा मिळण्याची तरतूद आहे, पण प्रत्यक्ष मिळालेले असे तरी आपल्या पाहण्यात नाहीत. पैसा मिळाला, तरी त्यातून जे संशोधन होणे अपेक्षित आहे त्यासाठीचे मनुष्यबळच आपल्याकडे नाही. त्यामुळे सुमार, तथाकथित अभ्यासकांचे ते कुरण ठरू शकते.
आजघडीला परिस्थिती अशी आहे की भाषाविज्ञानात किंवा मराठीच्या विभागांमधून प्राकृतभाषा, ऐतिहासिक भाषाविज्ञान, भाषिक पुनर्रचना या गोष्टींची नीट माहिती असलेले फार कमी लोक आहेत. प्राचीन मराठीवर बोलू शकेल, काही शोधप्रकल्प चालवू शकेल असे विद्यार्थी आणि शिक्षक यांची पिढी तयार करण्यास आपण वाईटरीत्या असफल ठरलो आहोत.
अभिजातपणाचं राजकारण
मल्याळम कोणत्याही तार्किक आधाराने अभिजात ठरावी, अशी ऐतिहासिक पुराव्यांची परिस्थिती अजिबातच नाही. पण राजकीय सलगीतून मल्याळमला काँग्रेसने दर्जा मिळवून दिला, असा अनेकांनी आरोप केला.
भाषांना मिळणारा दर्जा हा आताशा सपशेल राजकीय विषय आहे. त्यात विद्वानांचे, अभ्यासकांचे वस्तुनिष्ठ मत काय आहे, हे फारसे लक्षात घेतले जात नाही. अभिजात दर्जा मिळावा यासाठी बसवलेल्या समित्यांचे अभ्यासवृत्त मोठे मनोरंजक असते.
भारतीय प्रादेशिक अस्मिता या आजही भाषिक अस्मितेवर बेतलेल्या आहेत. आपली एथनिक ओळख आपल्याला भाषेतून जोरकसपणे होते असे वाटते. त्यामुळे राज्यासाठी काही केले की नाही, हे दाखवताना भाषेसाठी काही केले का हे दाखवण्यावर राजकरणाचा भर असतो.
अभिजात दर्जाने मराठीचं भलं होईल?
मुळात एखादी अभिजात भाषा ही अभिजात म्हणून का ओळखली जावी असा प्रश्न आहे. त्याचे साधे कारण असे की त्या भाषेत उपलब्ध ज्ञानपरंपरांचे जतन होणे आवश्यक आहे म्हणून. त्यातील समृद्ध शास्त्र, तत्त्वज्ञान यातून आपल्याला इतिहास, संस्कृती यांबद्दल ठोस मर्मदृष्टी मिळू शकते. हे सगळे उपलब्ध व्हावे म्हणून त्यांचा अभ्यास होणे महत्त्वाचे आहे.
पण आज आपल्याला अभ्यास, चिकित्सा, समीक्षा यांत रस राहिलेला नसून उत्सवप्रियता प्रधान वाटते!
म्हणूनच मला वाटते की मराठीला अभिजात दर्जा मिळाला तरी तिचे अजिबात भले होणार नाही. आजघडीला भारतात राज्यागणिक एक तरी संस्कृत विद्यापीठ आहे. त्यातून संस्कृतचे कसलेही भले होताना दिसत नाही.
आपल्याला मराठीचे प्रश्न सोडवायचे असल्यास तशी सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्ती हवी. अभिजात दर्जा मिळाला, तर फुकाचा हर्षवायू होऊन पुढील काही वर्षे आपण त्याच्या जल्लोषात घालवत राहू आणि आपल्याकडून अभिजात मराठीवर तर काहीच संशोधन झाले नाही, हे कळून येण्यास दोन दशके तरी सहज वाया जातील!
(लेखक केरळ केंद्रीय विद्यापीठ, कासरगोड येथे भाषाविज्ञान विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत. लेखातील विचार त्यांचे वैयक्तिक विचार आहेत.)
या लेखावर काही मान्यवरांच्या आलेल्या प्रतिक्रिया तुम्ही इथे वाचू शकता - 'अभिजात दर्जामुळे मराठी माणसाचा अभिजात न्यूनगंड दूर व्हायला मदत होईल'
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)