मुंबई रिव्हर अँथम : पण मुंबईतल्या 4 नद्या जिवंत आहेत का?

    • Author, संकेत सबनीस
    • Role, बीबीसी मराठी

'मुंबई रिव्हर अँथम'मुळे मुंबईतल्या नद्यांचा विषय चर्चेत आला आहे. मात्र, या नद्यांची सद्यस्थिती पाहता त्यांचं अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं दिसत आहे.

'मुंबई रिव्हर अँथम' हे मुंबईतल्या नद्यांच्या पुनरुज्जीवनावर आधारेललं गाणं अमृता फडणवीस यांनी गायल्यानंतर नद्यांबद्दल उलट-सुलट चर्चेला सुरुवात झाली. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता आणि मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी देखील या गाण्यात सहभाग नोंदवल्यानं हे गाणं सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.

तीनच दिवसांत या गाण्याला 6 लाखांहून अधिक हिट्स मिळाल्यात. सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांच्या गायन आणि नृत्याबद्दल तर चर्चेला उधाण आलं आहे.

मात्र, ज्या मुंबईच्या नद्यांचं गीत म्हणून हे गाणं लोकप्रिय होत आहे, त्या मुंबईच्या नद्यांची सद्यस्थिती मरणासन्न अवस्थेत पोहोचल्याचं दिसत आहे.

26 जुलै 2005 मध्ये मुंबईत आलेल्या पूरानंतर मिठी नदीचं नाव चर्चेत आलं. पण, या नदी व्यतिरिक्त मुंबई शहरात ओशिवरा, पोईसर आणि दहिसर या देखील नद्या आहेत. ज्याची अवस्था देखील गंभीर झाली आहे. पर्यावरणवादी किंवा वैज्ञानिक या नद्यांचं वर्णन 'बायोलॉजीकली डेड' म्हणजेच 'जैविकदृष्ट्या मृत' असं करतात.

ज्या 'रिव्हर मार्च' अभियानाला सहकार्य करण्यासाठी अमृता फडणवीस यांनी गायलेलं गाणं प्रसिद्ध झालं त्या, 'रिव्हर मार्च' अभियानाचे माध्यम समन्वयक गोपाल झवेरी यांनी मुंबईतल्या नद्यांबद्दल बीबीसीशी बातचीत केली.

झवेरी सांगतात की, "मुंबईत दहिसर, पोईसर, ओशिवरा आणि मिठी या चार नद्या आहेत. या चारही नद्यांचा उगम मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून होतो. संपूर्ण मुंबई शहर हे 400 चौरस किलोमीटर असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या एक चर्तुर्थांश म्हणजे 104 चौरस किलोमीटर आहे. हा भाग जैवविविधतेने नटला असून इथून उगम पावलेल्या नद्या कांदळवन क्षेत्रातून प्रवास करत अरबी समुद्राला मिळतात."

'मुंबईतल्या नद्या बायोलॉजीकली डेड'

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हिरव्या भागातून बाहेर पडून शहरात आलेल्या या नद्या नंतर मात्र प्रदूषित होतात, असं झवेरी सांगतात. या चारही नद्या सध्या बायोलॉजॉकली डेड अवस्थेत पोहचल्याचंही ते सांगतात.

1. दहिसर नदी

लांबी - 12 किलोमीटर

मार्ग - श्रीकृष्ण नगर - कंदार पाडा - संजय नगर - दहिसर गावठाण - मनोरी खाडीमार्गे - अरबी समुद्र

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या तुळशी तलावातून ही नदी उगम पावते. उत्तर-पश्चिम वाहणारी ही नदी ज्या उपनगरातून वाहते त्याचं नाव दहिसर आहे. 1960 पर्यंत नदीत मगरी होत्या असं म्हटलं जातं.

नदीत प्रक्रिया न केलेलं औद्योगिक रसायनीक पाणी, गटाराचं आणि झोपड्यांचं सांडपाणी जात असल्यानं नदी पूर्णतः प्रदूषित झाली आहे. तसंच, नदीत आरे कॉलनीतली मृत जनावरं टाकली जात असल्यानंही प्रदूषण वाढत असल्याचं झवेरी सांगतात.

अनधिकृत बांधकामांची संख्या वाढल्यानं अनेक ठिकाणी नदीचा मूळ प्रवाह बदलण्याचे प्रकारही घडले आहेत. इथल्या लेप्रसी कॉलनीजवळ नदी अरुंद झाल्याचंही दिसून येत आहे.

2. मिठी नदी

लांबी - 25 किमी

मार्ग - विहार तलाव - साकी नाका - कुर्ला - कालिना - वाकोला - बीकेसी - धारावी - माहीम खाडीमार्गे अरबी समुद्र

मुंबईतल्या इतर तीन नद्यांपेक्षा ही नदी आकारानं आणि लांबीनं सर्वांत मोठी आहे. विहार आणि पवई तलावातलं पाणी या नदीत प्रवेश करतं. यंत्र सफाई, प्राण्यांना आंघोळ, तेलाच्या ड्रम्सची सफाई या सगळ्यामुळे ही नदी सर्वाधिक प्रदूषित झाली आहे.

2005च्या मुंबईतल्या पुरात या नदीनं रौद्ररूप धारण केल्यानं अनेकांना आपला जीवही गमवावा लागला होता. या नदीचं पुनरुज्जीवन व्हावं यासाठी जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली रिव्हर मार्च अभियानानं एका पदयात्रेचंही आयोजन केलं होतं.

मुंबईतल्या या नद्यांबद्दल जागतिक किर्तीचे जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग यांनी बीबीसीकडे आपलं मत मांडलं.

सिंग सांगतात, "सरकार तत्पर असेल तर मुंबईतल्या नद्यांचं पुनरुज्जीवन शक्य आहे. नद्यांना जिवंत करायचं असेल तर, त्यांच्या मूळ प्रवाहाची नोंदणी करणं आवश्यक असून त्या जागेत झालेली अतिक्रमणं हटवली गेली पाहिजेत. तसंच, नदीत जाणारं सांडपाणी थांबवलं पाहिजे. मात्र, या गोष्टी होताना दिसत नाहीत. त्यामुळे या नद्यांचे नाले झाले आहेत. सरकारची यासाठीची प्रतिबद्धता दिसून येत नाही. या नद्यांच्या जागेत उद्योग आणि घरं उभारली जात आहेत."

3. ओशिवरा नदी

लांबी - 7 किलोमीटर

मार्ग - आरे मिल्क कॉलनी - स्वामी विवेकानंद रोड - मालाड जवळील खाडीमार्गे - अरबी समुद्र

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या आरे मिल्क कॉलनीजवळून या नदीचा उगम होतो. गोरेगाव या उपनगराच्या काही भागातून प्रवास करत ही नदी मालाडच्या खाडीपर्यंत पोहोचते.

ओशिवरा औद्योगिक क्षेत्राजवळून ही नदी जात असल्यानं तिथलं रासायनिक सांडपाणी थेट नदीत प्रवेश करताना दिसतं. तसंच या भागातल्या झोपडपट्ट्यांमधून देखील सांडपाणी नदीत जात असल्यानं नदी प्रदूषित होते.

"या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात डेब्रिज म्हणजेच इमारतींच्या बांधकामाचा घन कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात असल्यानं या नद्यांचं क्षेत्र भरून जातं," असं झवेरी सांगतात.

4. पोईसर नदी

लांबी - 7 किलोमीटर

मार्ग - संजय गांधी राष्ट्रीय उद्यान - मार्वे खाडीमार्गे - अरबी समुद्र

ओशिवरा नदी प्रमाणे ही नदी देखील आकारानं छोटी आहे. मात्र, इतर नद्यांप्रमाणे ही नदीही प्रदूषित झाली आहे. मोठ्या प्रमाणात प्लास्टीकचा कचरा आणि अनधिकृत बांधकामांचा विळखा नदीला पडल्यानं काही ठिकाणी नदीचं पात्र शोधावं लागण्याची परिस्थिती उद्भवली आहे.

औद्योगिक सांडपाण्यामुळे पोईसर नदीतला शुद्ध पाण्याचा प्रवाह हरवून गेला आहे. या नदीतल्या प्लास्टीकच्या कचऱ्यामुळे ही नदी गायब होण्याच्या मार्गावर असल्याचंही झवेरी म्हणतात.

'सरकारचं गाणं हा दुतोंडीपणा'

नद्यांच्या या अवस्थेबद्दल मुंबईतले पर्यावरणवादी देखील नाराज आहेत. मुंबईतल्या पर्यावरणाच्या बचावासाठी काम करणाऱ्या 'स्प्राऊट्स' या संस्थेचे संचालक आनंद पेंढारकर यांनी याबाबत सरकारवर टीका केली आहे.

पेंढारकर सांगतात की, "मुंबईतल्या नद्यांचं पुनरुज्जीवन करणं सध्या आवश्यक आहे. त्यासाठी नद्यांमध्ये जाणारं सांडपाणी आणि कचरा तत्काळ थांबवला पाहिजे. सांडपाणी आणि कचऱ्याचं प्रमाण शून्यावर आलं की, या नद्या मोकळा श्वास घेऊ शकतील. तसंच, नद्यांमध्ये उभारण्यात आलेलं काँक्रीटचं बांधकाम जमिनदोस्त केलं पाहिजे. या चारही नद्यांभोवती त्यांच्या नैसर्गिक आधिवासाला पुन्हा उमलू देण्याची गरज आहे. जेणेकरून त्यावर अवलंबून असलेलं प्राणीजीवन तिथं पुन्हा अस्तित्वात येईल."

मुंबई रिव्हर अँथमबाबत पेंढारकर सांगतात, "या नद्यांवर जे गाणं आलं आहे ते पाहता असं वाटतं की, आरे कॉलनीमध्ये मेट्रो कारशेड उभारायची आणि गाण्यात म्हणायचं की नद्या वाचवा. आरे कॉलनीतून ओशिवरा नदी वाहते या नदीलाचा यामुळे धोका आहे. त्यामुळे नदीला असलेला धोका न पाहता गाण्यातून नद्या वाचवा, हे सांगणं हा दुतोंडीपणा आहे."

'मुंबईत डेब्रीज व्यवस्थापन नाही'

रिव्हर मार्च अभियानाचे गोपाल झवेरी कचऱ्याच्या समस्येबद्दल सांगतात की, "मुंबईत डेब्रीज म्हणजेच इमारतींच्या बांधकामाच्या कचऱ्याचं व्यवस्थापन केलं जात नाही. दररोज शहरात 4000 ते 5000 ट्रक डेब्रीज तयार होतं. हे डेब्रीज पाणथळ जागा किंवा नद्यांमध्ये जातं. मुंबई महापालिका दरवर्षी 700 कोटी रुपये फक्त नद्यांच्या स्वच्छतेसाठी खर्च करते. पण, नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी हा खर्च होताना दिसत नाही."

झवेरी पुढे सांगतात, "2005मध्ये मुंबईत आलेल्या पुरानंतर या नद्यांच्या पुनरुत्थानासाठी चितळे समिती नेमण्यात आली होती. मात्र, या समितीनं सांगितलेल्या एकाही मुद्द्याची आजतागायत अंमलबाजवणी झालेली नाही. तसंच नाल्यांना गटार समजून त्यात सांडपाणी सोडलं जातं. पण, हे नाले नद्यांना जाऊन मिळतात, त्यामुळे नद्या प्रदूषित होतात. हे नाले मुळात नद्यांना जोडणाऱ्या नैसर्गिक प्रवाहांच्या उपवाहिन्या आहेत. त्या गटार नाहीत हे सरकारला आम्ही समजवून सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत."

'मुंबईतल्या नद्यांचं पुनरुज्जीवन करणार'

मुंबईतील नद्यांच्या स्वच्छतेचं काम करणाऱ्या मुंबई महापालिकेशी बीबीसीनं संपर्क साधून या स्वच्छता प्रक्रियेची माहिती घेतली.

मुंबईतील नद्या आणि सर्व नाले यांच्या स्वच्छतेची जबाबदारी ही महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाची आहे.

या विभागाचे प्रमुख विद्याधर खंडकर सांगतात की, "1 एप्रिल ते 31 मेपर्यंत मुंबईतल्या नद्या आणि सर्व नाल्यांमधला गाळ काढण्याची प्रक्रिया चालते. याची निविदी प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. या काळात आम्ही 60 टक्के काम पूर्ण करतो. पावसाळ्याचे चार महिने गरजेनुसार नदी आणि नाल्यांमधलं स्वच्छतेचं काम 20 टक्के होतं."

खंडकर पुढे सांगतात की, "मुंबईतल्या नद्यांचं पुनरुज्जीवन करण्याचा पालिकेनं निर्णय घेतला आहे. ओशिवरा, दहिसर, मिठी, पोईसर या नद्यांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी आम्ही सल्लागार नेमतो आहोत आणि त्यानंतर याची निविदा प्रक्रिया होऊन कामास सुरुवात होईल. गाळ काढण्याचं काम आणि हे काम वेगळं असून मुंबईतल्या नद्यांच्या पुनरुज्जीवनाचं काम प्रथमच करण्याचा निर्णय झाला आहे."

याबद्दल मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.

तुम्ही ही क्विझ सोडवलीत का?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)